उपरा,लक्ष्मण माने.(भाग २७).

उपरा, लक्ष्मण माने..

पाठिंब्यासाठी निघालेला हा मोर्चा कोल्हापुरात चर्चेचा विषय झाला होता . मोर्चे खूप निघतात , पण इतकी तरुण मुलं शिस्तीनं मोर्चा घेऊन गेली , याचीच विशेष चर्चा होती .

वाचनाची आवड लागली होतीच. सार्वजनिक कामाचीही आवड निर्माण झाली . नोकरी , अभ्यास आणि सार्वजनिक कामं यामुळं प्राचार्य सतत रागावत होते . त्याहून काही कारकून मंडळी कान फुकत होती आणि माझ्याही काही चुका होत होत्याच . पण मतभेद टोकाला गेले , ते वसतिगृहातील दलित विद्यार्थी आणि लेबरचे विद्यार्थी यावरून . प्राचार्यांना खरं – खोटं सांगितलं जाऊ लागलं आणि एकदा प्राचार्य म्हणाले , ‘ तुझ्याबद्दल फार तक्रारी आहेत .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

‘ मी गप्प बसून ऐकून घेतलं . नंतर असं समजलं , की मी पैसे खातो , असं हेडक्लार्कनं प्राचार्यांना सांगितलं आहे . त्यामुळं ते मला काढून टाकणार आहेत . मग मीही प्राचार्य , हेडक्लार्क आणि लायब्ररियन यांच्या संबंधात वाईट बोलू लागलो . राजीनामा देण्याची तयारी केली होती , पण आर्थिक बाबीचे संशय होते . ते नीट व्हायचे , तर ऑडिट झालं पाहिजे . ऑडिट करून घेतलं आणि राजीनामा ठोकला . उलट , कॉलेजकडेच माझं येणं निघालं . आणि कसलाही आर्थिक व्यवहार वाईट केलेला नाही याचा प्रत्यक्ष पुरावा प्रा . दाभोळेसर होते . ते प्राचार्यांना सतत सांगतही होते . मी राजीनामा दिल्यानंतर ते खूप रागावले . तो परत घेण्यास सांगू लागले . पण मी नकार दिला . कारण , अविश्वासाच्या वातावरणात काम करता येणं शक्य नव्हतं . आणि सगळ्यांनी ‘ कट’च केलेला सरळ दिसत होता . का ? तर मी मोर्यात गेलो होतो . आणि राजा ढालेचं विधान बरोबर नाही , असं मानणारी प्रतिगामी मंडळी कॉलेजात कमी नव्हती . त्याशिवाय इतरही कटकटी होत्याच .

राजीनामा देऊन रिकामा झालो होतो . कॉलेजची शिष्यवृत्ती मिळत होती . पण तेवढ्यानं साधं एक वेळचं जेवणही शक्य नव्हतं . मेसची कितीतरी मुलं पहिल्या सहा महिन्यांतच घरी जात होती . किंवा ज्यांच्या घरनं पैसे येतात , अशीच टिकत होती . आता तर मेसही बंद झाली . काय करावं , याचा विचार करीत होतो . पाटगावकरांना सारं माहीत होतं . खरं – खोटंही माहीत असावं . मी गावी जाण्याची तयारी करीत होतो . पण नोकरी मिळाली , तर पाहवी … पोटापुरतं मिळालं , तरी पुरे , असं म्हणून गावात जाहिराती बघून फिरत होतो . नोकरी लागत नव्हती . बा तर म्हणायचा , ‘ लवकर लगीन कर . नोकरी मिळीव … मी टकरा द्यायला दमलूय ‘ … टकरा तर मीबी देतूय ! … आपलं सारंच वावटळीत दिवा लावल्यागत . काय करणार ?

असाच जाहिरातीचा पत्ता हुडकत फिरत होतो . एस.टी. स्टँडवर चक्कर मारावी म्हणून गेलो , तर तिथं विजय सावंत नावाचा मित्र भेटला … वसतिगृहात राहत होता . पोरगा मोठा देखणा . रुबाबदार राह्यचा , ‘ घरची मिळकत लई दांडगी ‘ असं सांगायचा .त्यानंच चहा पाजला . मी कॉलेजची नोकरी सोडल्याचं सांगितलं . त्याला वाईट वाटलं असावं . त्यानं खिशातून पाचची नोट काढली आणि हातावर ठेवली . मी नको म्हणत होतो . तो म्हणाला ,

‘ असू दे . नोकरी लागल्यावर परत कर .

‘ नाइलाजानं घेतली . मनातनं धुमसत होतो . क्षणभर वाटे , या साऱ्याला आग लावावी . आणि लांब उभं राहून हसत राहवं . घरी जायला नको वाटत होतं . असं जाऊन बाला तोंड दाखवण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटे . काही होवो , कॉलेजतर संपल्याशिवाय जायचं नाही . मनात निश्चय करून भटकत होतो . लोक भेटायचे . सहानुभूतीनं बोलायचे . हळहळायचे . पण सारं वांझ असायचं . मदतीचा हात काही कुणी पुढं करीत नव्हता … मधेच एखादा धंदा करावा , असं मनातनं असे . पण भांडवल कुठून असणार ?

असाच तिरमिरीत दुपारी ऐन उन्हाचा पाटगावकरांच्याकडं गेलो . ते घरी नव्हते . बाई होत्या . माझा चेहरा सुकलेला होता . खरंतर चहाही घेतलेला नव्हता . जेवणाला दोन तीन दिवस सुट्टीच होती . भजी – पाव किंवा मिसळ – पाव खात होतो . नोकरी उगीचच सोडली , असं वाटे . पण पुन्हा नोकरी मागणंही मनाला पटत नव्हतं . बाईंच्या बरोबर इकडचं – तिकडचं बोलत होतो . पेपर समोर धरला होता . पण पोटात कावळे ओरडत होते . बाईंनी ते हेरलं असावं . त्यांनी मुद्द्यालाच हात घातला . ‘ माने , अरे , जेवणाचं काय करतोस ? ‘ मी जेवलोय असं सांगितलं , पण त्यांना पटलं नाही . त्यांनी खूप आग्रह केला , म्हणून जेवायला बसलो . खाली मान घालून जेवत होतो . आणि डोळ्यांचं पाणी वाटीत साचत होतं . बाई काही हवं का म्हणून विचारीत होत्या … मी मानेनंच नको म्हणत होतो . पण घर सोडल्यापास्नं पहिल्यांदाच कुणीतरी मायेनं विचारत होतं … पोटात भडभडून येत होतं . आईची आठवण येत होती . घरी जेवायला भीक मागून आणलेलं असायचं . पण आई वाढायची . आठवणीचे कढ दाटून यायचे .

जेवण कसंतरी उरकलं आणि पेपर वाचत बसलो .

संध्याकाळी सर बाहेरून आले . त्यांनी ओळखलं असावं . जरा रागात होते . पण अगदी हळव्या आवाजात घालवलीस ना नोकरी ? आता दुसरी शोधा . नोकऱ्या काय पिकतात काय ? ‘ अशा स्वरूपाचं बोलले . राग आला नाही . स्वत : ला चार शिव्या हासडल्या . ते म्हणाले ,

‘ शेजारी भाऊंचा बंगला आहे . भाऊ घरी आहेत का ते बघ . ‘

मी चटकन उठलो आणि शेजारच्या बंगल्यापुढं जाऊन उभा राहिलो . दार बंद होतं . दारावर पाटी होती … वि.स. खांडेकर , दारावरची बेल वाजली . जरा वेळानं एक मध्यम वयाची बाई दार उघडायला आली . मी भाऊ आहेत का , म्हणून विचारलं . बाई ‘ आहेत , बसा ‘ म्हणाली आणि आत गेली . मी चटकन उठलो आणि सरांना येऊन सांगितलं , भाऊ आहेत ‘ . परत येतो , तर दार बंद . पुन्हा बेल वाजवली . पुन्हा त्याच बाई आल्या … दार उघडताच ,

‘ काहो , काय काम आहे आणि उचल्यासारखे बाहेर काय गेलात ? कोण पाहिजे ? ‘ असा उलट तपास घेऊन टाकला . त्यांना खरं कारण सांगितल्यावर ; साधे मॅनर्स नाहीत , सांगून जायचं , म्हणून कुरकुरतच आत गेल्या . मी एका खुर्चीवर बसून राहिलो . थोड्या वेळानं सर आले . उंबऱ्याला नमस्कार केला . समोरच्या फोटोकडे पाहून नमस्कार केला . खिशात गणपतीचं चित्र होतं , त्यास नमस्कार केला आणि खुर्चीवर बसले . सर आल्याचं सांगितल्यावर भाऊ आले . सरांनी इकडच्या – तिकडच्या गप्पा मारल्या आणि शेवटी माझ्याबद्दल सांगितलं . भाऊंनी मला ‘ काय काम करणार ‘ म्हणून विचारलं . ‘ काहीही ‘ मी म्हणून गेलो . भाऊ म्हणाले , ‘ काहीही , शिपाईसुद्धा ? ‘ मी मानेनंच होकार दिला . सरांनी माझी कॉलेजमधल्या कामांची पहिल्यांदाच चांगली शिफारस केली . भाऊ म्हणाले , ‘ उद्या ये … संध्याकाळी .

‘ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेलो . दार उघडं होतं . भाऊंना हाताला धरून माझ्याच वयाचा एक मुलगा इकडून तिकडं फिरवीत होता . मी उगीच बसून राहिलो . इकडेतिकडे बघत . आपल्याला काय काम सांगणार आणि आपण इथं टिकू काय , याचाच विचार करीत होतो . भाऊसाहेबांचं नाव तर मोठं . मनात येई , ह्या माणसानं जोडे पुसायला ठेवलं तरी भारीच म्हणायचं . भाऊंचं फिरणं झालं … त्यांनीच हाक मारली .

‘ मंदा , अनंतराव येऊन गेले काय ?

‘ मंदा बाहेर आली . तिनं दार उघडलं होतं . वाटलं , आता ही काहीतरी बोलणार … ती म्हणाली ,

‘ अनंतराव आले नाहीत , पण येतो असा निरोप आहे .

‘ थोड्या वेळानं एक खादीधारी उंच असा माणूस आला . पाटगावकरांसारखाच . मी काही ओळखत नव्हतो . पण खादीची साधी पँट , खादीचा शर्ट यांमुळं आणि इतक्या सहजपणे तो मंदाताई म्हणून हाक मारून आत गेला … यावरून त्यांच्याच घरातला असावा , असं वाटलं . थोड्या वेळानं भाऊ बाहेर आले . तो माणूसही आला . आता माझ्याबद्दल भाऊंनी त्या माणसाला सांगितलं ,

‘ अनंतराव , चंद्रकांतानं ह्या मुलाला माझ्याकडं आणलाय . त्याला आपल्याकडं काही काम असेल , तर दे .

‘ अनंतरावांनी नकार दिला .

‘ भाऊ , आपल्याकडं काही जागा रिकामी नाही .

‘ भाऊ म्हणाले ,

‘ हे बघा , त्याला काम कसलं सांगायचं , ते तू ठरव . त्याला शिकता आलं पाहिजे .

‘ यावर अनंतराव ‘ बघतो ‘ म्हणाले .

मला दुसऱ्या दिवशी आंतर भारती विद्यालयात बोलावलं .

दुसऱ्या दिवशी ‘ आंतर भारती’मध्ये गेलो . शाळा साधीच आणि जुन्या इमारतीत भरलेली होती . अनंतराव देशपांडे – मुख्याध्यापक असा बोर्ड होता . मी आत येऊ का ? म्हणून विचारलं . त्यांनी ‘ ये ‘ म्हणून खुर्चीवर बसायला सांगितलं . डोळ्यांवरचा चष्मा हातात घेऊन डोळे पुसले आणि म्हणाले ,

‘ हे बघ , आमच्याकडे नोकरी नाही . आणि तुला तर भाऊंनी नोकरी दे म्हणून सांगितलंय . तेव्हा मी सांगीन , तिथे नोकरी करावी लागेल . आमच्याकडे पगार फार नाही.आमची मराठी शाळा आहे . तिथं शिक्षक म्हणून तुला काम करावं लागेल .

‘ मी होकार दिला . केव्हा एकदा हे होकार देतात , असं झालं होतं . खूप आनंद झाला होता . त्यांनी घरची माहिती विचारली . मी सांगितली . इथं खोली घेऊन राहतो , वगैरे . ते सांगितल्यावर ते म्हणाले , ‘

तुझी शाळा सुटल्यावर तुला भाऊंच्या बंगल्यावर जावं लागेल . भाऊंना दिसत नाही … त्यांना फिरवणं … त्यांना पेपर वाचून दाखवणं , ते सांगतील ती कामं करणं … ‘ हेही मी अर्थातच कबूल केलं .

कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं . नोकरीही चालू झाली होती . खाणावळीत जेवत होतो . प्रेमाच्या प्रकरणानं जोर धरला होता . गावामध्ये शशी तिच्या मैत्रिणींबरोबर येत होती . आम्ही बोलत होतो . तसे जवळ येत चाललो होतो . रंकाळ्याच्या साक्षीनं सारं चाललं होतं . शाळेत लहान मुलांना मन लावून शिकवीत होतो . बाकीची शिक्षक मंडळी शिकवण्या करीत … माझा सारा वेळ मीटिंगा , चर्चा , वाचन इत्यादी गोष्टींत जात होता . कधी बापुसाहेबांबरोबर , कधी सुरेश शिपूरकरबरोबर काम करीत होतो . संध्याकाळी बिनचूक भाऊंच्याकडे जात होतो . त्यांच्याकडे खूप मोठे लोक येत असत . ते बोलत बसले , की आपण ऐकण्याचं काम करीत होतो . पण जेमतेम पंधरा दिवस ते महिनाभरच टिकलो . भाऊंच्या शिस्तीत आपलं बेशिस्त आयुष्य काही बसवता आलं नाही . मंदाताईंच्या हाताखाली सर्व कसं व्यवस्थित आणि वेळेत व्हावं लागे . एखादी जरी चूक झाली , तरी मंदाताईंच्या कोर्टात क्षमा नव्हती . बोलणी खावी लागत . अर्थात , हे जमलं नाही . आणि भाऊंच्याकडे शिदनाळे नावाचे एक शिक्षक – मित्र जाऊ लागले . आता भाऊंच्याकडे जात होतो , पण कधीतरी चर्चेसाठी किंवा काही काम निघालं तर .

प्रा.दाभोळ्यांना मी कॉलेजची नोकरी सोडली, याचं वाईट वाटलं असावं . ते भेटतील तेव्हा – तेव्हा खूप बोलत असत. शशीशी लग्न करण्याचं पक्कं ठरलं होतं . तिच्या मनाची तयारी झाली होती . परंतु कॉलेज संपल्याशिवाय लग्न करायचं नाही , हेही ठरलं होतं . एस.वाय.चे दोन पेपर राहिले होते आणि बी.ए.चं आख्खं वर्ष संपायचं होतं . अभ्यास करीत होतो . मुख्य म्हणजे लग्नाबद्दल शब्दही तिच्या घरच्यांना कळून उपयोगी नव्हता . नाहीतर … नाहीतर काहीही होऊ शकलं असतं . अतिशय जपून वागत होतो . सारं बोलणं चिठ्यांतून असे . आणि चिठ्या , संधी मिळेल तशा परस्परांना मिळत होत्या .

कॉलेजची परीक्षा संपली होती . शाळेत मात्र अजून परीक्षा , पेपर तपासणं असली काम चालू होती . आणि शशीनं एक खलिता पाठवला होता . तो वाचला आणि अवाक्च झालो . तिच्या घरच्यांनी तिचं लग्न अन्यत्र जमविण्याचा घाट घातला होता . एक मुलगा पाहून गेला होता . आणि जर या सीझनच्या आत मी तिच्याशी लग्न केलं नाही तर … तर तिचं लग्न दुसऱ्याबरोबर होणार होतं .

मी रात्रभर विचार केला . पहिला विचार म्हणजे आपण लग्न करावं का ? ही इतकी सुखवस्तू कुटुंबातली मुलगी आपल्या वायदळीतल्या आयुष्याशी एकरूप होईल का ? हिला आपण निदान नीट तरी सांभाळू शकू का ? आपल्यामुळे हिचं नुकसान होणार , मी तिला नकार कळवण्याचं ठरवलं … रात्रभर पत्र लिहित होतो . काय लिहावं ? … नकार दिला , तर तिचा गैरसमज होणार , असा विचार करीत झोपलो . इतरांशी बोलण्यात अर्थ नव्हता .

अखेर , ‘ मी कसा झालो … भविष्यात काय आहे ? ही नोकरी सोडल्यावर फूटपाथवरही जागा मिळणार नाही . तुला दोन वेळ जेवायलाही देऊ शकेन अशी खात्री नाही . इतर बरंच लिहून कळवलं . सबब , तू इतरत्र लग्न कर म्हणून सांगितलं … त्याला तिनं उत्तर दिलं … ‘ आपण दोघं मरतानाही एकत्रच मरू या . जे व्हायचं ते होईल . मी फूटपाथची तयारी ठेवली आहे . तू नाही म्हणू नकोस . तू नाही म्हणलास तर ‘ … वगैरे … आता तिला तत्त्वज्ञान सांगण्यात अर्थ नव्हता . चूक तर माझी होती . जातिव्यवस्था , समाजवाद , सारं आता तीच ऐकवीत होती . माझ्या परीनं मोडता घालण्याचा प्रयत्न केला . पण काही उपयोग झाला नाही .

प्रा . पाटगावकर , प्रा . दाभोळे , सुरेश , बापुसाहेब , देशपांडे सर साऱ्यांना बोललो. ‘ वा – वा – फारच छान … तू आंतरजातीय लग्न करतो आहेस … चांगली गोष्ट आहे. आमच्यानं होईल ती मदत करतो ‘ इत्यादी बोलत असत . जरा धीर येत होता . सुरेश मात्र अखेरपर्यंत ‘ … तू लग्न करण्याला माझा विरोध असण्याचं कारण नाही … अतिशय चांगली गोष्ट आहे . पण तुला कोल्हापूर सोडावं लागेल . इतरत्र तुला मदत मिळणं आणि नोकरी मिळणं खरं नाही . तेव्हा तू फेरविचार कर ‘ इत्यादी गोष्टी सांगत होता . पण मला नशा चढली होती . आपण एक क्रांती करायला निघालोय … आणि हा उगीच काहीतरी सांगतोय असं वाटे . सुरेशनं शिरूभाऊ लिमये यांना फोन करून पुण्याला काय करता येईल , याची विचारणा केली .पण नुकतंच एक जोडपं सांभाळतोय,असं त्यांनी सांगितल्याचं सुरेश म्हणाला .

लग्न तर करावं लागणारच होतं. काय करावं, समजेना. बरं, पैशाचा मामला होता . काहीतरी करावं लागणार होतं . विचार करीत होतो. डॉ . सुदाम चौगुले , प्रा. माणगावकर, परितेकर, सारी मंडळी मदत करू असं म्हणत होती. ‘ आयला, लग्नाला..

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading