उपरा,लक्ष्मण माने.(भाग २८).

उपरा,लक्ष्मण माने..

वर्गणी काढावी लागणार असं दिसतंय ‘ म्हणून सारी हसत असू. लग्नाचा दिवस ठरला .११ मे १९ ७३ . ‘ आंतरभारती’च्या देशपांडेसरांनी मे महिन्याचा पगार आणि स्वत : चे असे तीन – चारशे रुपये दिले. लग्न माहुलीला करण्याचं ठरलं. बापुसाहेबांनी अनेक पावसाळे पाहिलेले . चळवळीचा अनुभव मोठा . पोलिसांशी तर त्यांचा सासरे – जावयाचा संबंध. त्यामुळे त्या खात्याची माहिती त्यांना होती आणि मुख्य म्हणजे, त्यांचंही लग्न आंतरजातीय. त्यांच्याकडे बैठक झाली. कायदेशीर सारी तयारी होतीच . शशीनं जन्मतारखेचा दाखला आणला होता . वयानं ती सज्ञान होती . बापुसाहेब म्हणाले ,

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

” ते खरं रे ? पण समज , लग्नाला माहुलीला जाणार आणि तिच्या घरचे लोक गप्प बसतील , असं का गृहीत धरता ? समजा , त्यांनी पकडलं आणि पोलिसांच्यात प्रकरण गेलं , तर पोलिस काही क्रांतीचे देवदूत नाहीत … त्यांच्या डोक्यातही ‘ हिंदू ‘ मेंदू आहेच . ते तिला आणि तुला सडकतील . विशेषतः , शशीला . हे सगळं अशा रीतीनं वागवतील , की ती तुला गोत्यात आणणारच नाहीत , असं नाही . तिचा जबाब आधीच लिहून त्याच्यावर तिची सही घेतील आणि पोरगी पळवून नेली , म्हणून तू जाशील खडी फोडायला ! तिच्या घरच्यांबद्दल मला इतरांनी सांगावं , असं नाही .

” तेव्हा इथं अगोदर अफिडेव्हिट करावं आणि मगच इथून निघावं , असं ठरलं . मी शशीच्याच घरी भाडेकरू म्हणून राहत असल्यानं मी आदल्या दिवशी घर सोडावं , असं ठरलं . शशीला सारं चिठ्ठीनं कळवलं . मी तिच्या घरी मुंबईला जातो आहे , पी.एस.आय.साठी वगैरे थापा मारल्या होत्या . नऊ तारखेला मी तिची जागा सोडणार होतो . त्या दिवशी मी पैशांची जुळवाजुळव करीत फिरत होतो . ठरल्याप्रमाणं मी माझ्या खोलीला कुलूप लावलं नव्हतं . दुपारी कुणी नाही , असं पाहून शशीनं कपडे चोरून आणून माझ्या बॅगेत ठेवले होते . पण अधिक मोह चांगला नसतो . पुन्हा दुसरं पातळ माझ्या बॅगेत ठेवताना तिला तिच्या भावानं पाहिलं आणि सारं बिंग फुटलं . शशी नुसती रडत होती . तिला आई , चुलतीनं विचारलं,

‘ तुला मान्यानं ठेवायला सांगितल्या काय ?

‘ तिनं अकलेनं उत्तर दिलं , ‘ नाही . मीच ठेवत होते . त्याला ह्यातलं काही माहीत नव्हतं . ‘ वगैरे .

तिला बराच मार बसला होता . मी गावात होतो . मला घरी काय झालंय , माहीत नव्हतं . मार खाऊनही तिनं तीन ओळींचं पत्र लिहून तिच्या लहान बहिणीकडे दिलं होतं . माने आले की त्यांना दे सांगितलं . त्या लहान पोरीनं घरापासून बऱ्याच अंतरावर मला ते दिलं . शशीवर सारं घर आग ओकीत होतं . ‘ भिकेचे डोहोळे लागलेत ‘ , इथपासनं ‘ नाक कापतीस का ? ‘ इथपर्यंत . कालवा न करता तिला जो तो बोलत होता . पहारा कडक झाला होता .चिठ्ठीत मी काय सांगावं ते लिहिलं होतं . मी घरी आलो . दाराची कडी काढली आणि आत गेलो , तोच … तिची आई आली . दोघींचे डोळे आग ओकत होते .

‘ काय केलंसा , बाबा ? आमी इसवास ठिवला आन् केसानं गळा कापलासा ! … ‘ म्हणून रडू लागल्या …

मी अगदी काहीच माहिती नसल्यासारखं , ‘ काय केलं मी ? काय झालं ? ‘ इत्यादी विचारलं . त्यावर त्यांनी बॅग उघडायला लावली .. त्यात शशीची पातळं होती . मी अवाक् झाल्यागत नाटक केलं , ‘ यातलं मला काहीच माहीत नाही ‘ असं सांगितलं . त्यांचा विश्वास बसला की नाही कुणास ठाऊक ? पण त्या मला फार बोलल्या नाहीत .

मला त्वरित घर सोडणं गरजेचं होतं . मी बॅग भरली . मलाही चार वर्षांचे ऋणानुबंध अशा रीतीनं तोडणं जीवावर आलं होतं . खरंतर , ह्या माणसांनी मला तसं खूपच चांगलं वागवलं होतं . पण इलाज नव्हता .

मी बॅग उचलली . साऱ्यांचा निरोप घेतला . निघालो . मला पोचवायला शशीची चुलती आणि बहीण आली . शशीशी काही बोलता आलं नाही की भेटताही आलं नाही . इतक्या विलक्षण वेगानं सारं घडलं होतं , की अगोदरच सारं विस्कटलं होतं ! मी तर कोल्हापुरातच थांबणार होतो आणि पोचवायला , म्हणजे घालवून द्यायला शिपाई आले होते . त्यांना मी मुंबईला जाणार , असं सांगितलं होतं . त्यामुळे मी मुंबईचं तिकिट काढून रेल्वेत बसेपर्यंत त्या दोघी थांबल्या होत्या .

रेल्वे सुरू झाली , की आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू होणार होता . तिच्या चुलतीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता . आपण सुटलो असं तिला वाटत होतं . नाइलाजानं मी हात वर केला . गाडी सुरू झाली . आणि हळुहळू कोल्हापूर नजरेतून सुटू लागलं . आपण काय करीत आहोत हे क्षणभर समजत नव्हतं . आपण पाहिलेल्या सुंदर स्वप्नाचे आपल्यासमोर तुकडे – तुकडे होत आहेत , असं वाटलं . क्षणभर , ह्या पळत्या गाडीतून उडी टाकावी , असंही वाटलं . पण अकलेनं उशिरा , पण काम केलं . जरी तिकिट मुंबईचं काढलं , तरी मुंबईलाच गेलं पाहिजे असं नाही , हे डोक्यात आलं आणि भराभर कल्पना सुचू लागल्या . संकटाच्या वेळी डोकं चाललं होतं … रुकडीच्या स्टेशनवर गाडी थांबली , तेव्हा अंधार दाटलेला होता . गाडी थांबताच … खाली उडी टाकली . रात्रीमुळं रस्ता माहीत नव्हता , कोल्हापूरला कसं परतावं , याचा विचार करीत होतो . सासरे रेल्वेत हुंडेकरी असल्यानं त्यांच्या ओळखी असतील , या भीतीनं रेल्वेचे रूळ धरले आणि परत प्रवास सुरू केला . चारी बाजूंना अंधार दाटलेला . रुळाच्या पट्टीनं चाललो होतो . दिसत नव्हतंच . हातात बॅग फक्त होती . पायाला गती आली होती आणि डोक्यात विचारांनी काहूर माजवलं होतं . आपण कुठून आलो इथपासून , या व्यवस्थेवर मुतावं इथवर गेलो होतो . जी व्यवस्था आपल्याला माणूस मानायला तयार नाही . पोरीची इच्छा असताना आणि कायद्यानं परवानगी असताना आपल्या लग्नाला ही मंडळी तयार होत नाहीत . जात ! जात !! सगळ्या आयुष्याचा कोंडवाडा झालेला .पेटून उठलो होतो . एकदा वाटे , सरळ तिच्या घरी जाऊन तिला घेऊन जावं . मग जीव गेला , तरी हरकत नाही . इथपर्यंत मजल गेली होती , पण असाहाय्यपणे डोळ्यांतून पाणी काढण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो .

झपाझप पावलं पडत होती . कोल्हापूरचे दिवे दिसू लागले , तसं बरं वाटलं . इतक्या अंधारातून आपण एकटे चालत आलो … उगीच मनातनं भीती वाटली , पण क्षणभरच . भीती राहिलीच होती कुठं … आता कोल्हापुरात जाणं योग्य नव्हतं . रिक्षा केली आणि तडक नारायणच्या घरी गेलो . सुदैवानं बाकीची मंडळी कुणी नव्हती . तो आणि त्याची बायको फक्त होती . शक्याशक्यता पडताळल्या . आता सारे पत्ते शशीच्या हातात होते . तिनं काही हिंमत दाखवली तरच काही शक्यता होती . रात्री त्याच्याकडेच झोपलो , जेवण कुणीच केलं नाही .

दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि बापुसाहेबांकडे गेलो . त्यांनी सारं ऐकून घेतलं . विचार केला आणि नारायणला त्यांनी युक्ती सांगितली . ‘ माझी चिट्ठी कशाही प्रकारे शशीला मिळाली पाहिजे . मी सांगतो तसं कर , तू नाव सांग आणि मी चिठ्ठी शशीला दिली आहे … म्हणून गाडीच्या ड्रायव्हरला सांग … शशीची चिठ्ठी आहे म्हणून सांगितल्यावर ड्रायव्हर तिला देईल .

‘ झालं , मी चिठ्ठी लिहिली . नारायणनं ते काम व्यवस्थित केलं . बापुसाहेबांनी सारी कामं बाजूला ठेवली . गावात तीन – चार फोन केले . एकाची गाडी मागवून घेतली . सुरेश , उर्मिलाबाई सबनीस , रवींद्र सबनीस , अनंतराव पाटगावकर , साऱ्यांना फोन करून कल्पना दिली . चिठ्ठीत शशीनं कुठं यावं … हे लिहिलं होतं . तिथं गाडी पाठवली होती , पण ती ओळखेल , असं कुणीतरी गेलं पाहिजे , असा माणूस नारायण किंवा बापुसाहेब , सुरेश कुणीतरी गेलं पाहिजे . नारायणच गेला . तिला उर्मिलाकाकींच्या घरी घेऊन येण्यास सांगितलं होतं .

बापुसाहेब आणि मी अॅफिडेव्हिटसाठी स्टॅप आणायला गेलो होतो . वेळ दुपारची होती . तीन रुपयांचा स्टॅम्प काही मिळत नव्हता . खूप ठिकाणी फिरलो . अखेर स्टॅम्प मिळाला . आम्ही परत उर्मिलाकाकींच्या घरी आलो . आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे , शशीही हातावर तुरी देऊन सुखरूप आली होती . मला पाहताच रडू लागली . पण रडायलाही वेळ नव्हता . तिला एका खोलीत ठेवलं . मला दुसरीकडे ठेवलं . आणि सारी सूत्रं सुरेश , बापुसाहेबांनी हातात घेतली .

आम्ही दोघं स्वतंत्र खोल्यांत होतो . ती कशी आली , काय घडलं वगैरे नारायणनं सांगितलं . माझी चिठ्ठी मिळाली होती , वेळ आणि ठिकाण कळलं होतं . पण निघणार कशी ? चुलती एका उंबऱ्यात आन् आई दुसऱ्या उंबऱ्याला उसं देऊन झोपल्या होत्या . त्यांच्या दृष्टीनं संकट टळलं होतं . बस् ! हिनं फायदा उठवला . पायात चप्पलही न घालता ही बाहेर पडली . बरोबर एक लहान मुलगी घेतली होती . गाडी असेल तर जायचं , नसेल तर मैत्रिणीकडे गेले होते , बरोबर मुलीला नेली होती , अशी थाप मारायची सोय केली होती . सुदैवानं कुणीही पाहिलं नाही . आणि गाडीत नारायण आहे हे दिसताच ही गाडीत बसली आणि सरळ सुटली होती .वगैरे …

शशीचं अॅफिडेव्हीट झालं होतं . बापुसाहेबांनी मॅजिस्ट्रेटलाच घरी बोलावलं होतं . तोपर्यंत सुरेशनं मंगळसूत्र , अक्षता , ब्राह्मण , हार , फोटो सारी तजवीज केली होती . मला काहीच माहीत नव्हतं . मंडळी गडबडीत असायची एवढंच . गंमत म्हणजे , सारं दोन – अडीच तासांत झालं होतं . विशेष म्हणजे , इकडे आम्ही ब्राह्मणाच्या साक्षीनं , विवाहबद्ध होत होतो … त्यावेळी उर्मिलाबाईंच्या घरासमोर शशीचे वडील पानपट्टीच्या दुकानात पान घेत होते . त्यांना अद्यापतरी काही पत्ता लागलेला नव्हता . ब्राह्मण सांगेल तसं करीत होतो . अक्षता पडत होत्या . बघता बघता मेजर निंबाळकरांपासून प्रा . दाभोळ्यांपर्यंत पाच – पन्नास माणसं सुरेश आणि बापुसाहेबांनी जमवली होती . याचं श्रेय ह्या दोघांना आणि माझा जीवाभावाचा मित्र नारायण यांनाच होतं .

झालं , एकदाचा लग्नसोहळा पार पडला . अतिशय साधा . आम्हा उभयतांच्या अंगावर कपडे काय होते … तिच्या अंगावर नेसूचं पातळ आणि माझी पँट काही नीट नव्हतीच . मंडळींनी खूप कौतुक केलं . लग्नाला खर्च आला फक्त एकवीस रुपये . बापुसाहेब म्हणत होते ,

‘ आता जगात कुणीही तुमच्या केसाला धक्का लावू शकणार नाही ! एक लढाई आपण जिंकली आहे !

‘ अर्थातच , चौकश्या सुरू होणार म्हणून अंडरग्राऊंड झालो . असो .

लोक गेले . शशीला आमचे स्नेही , राष्ट्र सेवा दलाचे श्याम पटवर्धन यांनी स्वत: च्या घरी नेलं . मी , नारायण विद्यापीठाच्या माळावर रात्रभर गप्पा मारत बसलो होतो. तोपर्यंत पोलिसांकडे सारं गेलं होतंच. चौकश्या सुरू झाल्या होत्या . एस.टी. स्टँड, रेल्वे स्टेशन आणि सगळीकडेच पोलिसांचे लोक बसले असणार , म्हणून चार दिवस कोल्हापुरातच राहिलो . उर्मिलाकाकी , पाटगावकर , श्यामराव पटवर्धन , सुरेश शिपूरकर प्रत्येकानं काही ना काही दिलं . शशी एका वस्त्रानिशी बाहेर पडली होती . उर्मिलाकाकींनी तिला कपडे , आरसा , कंगवा , कुंकू सारं दिलं . पाटगावकरसरांनी कपडे केले . सर्वांत कडी झाली श्यामरावांकडे . त्यांच्याच घरात आम्ही चार दिवस होतो . पण पहिल्या दिवशीच त्यांनी छान बेत केला . रांगोळ्या घालून साग्रसंगीत जेवायला वाढलं . खूप अवघडल्यासारखं झालं होतं . आयुष्यात इतक्या प्रसन्न जागेत पहिल्यांदाच जेवत होतो . हवं नको , ते स्वतः पाहत होते . ते चार दिवस म्हणजे आयुष्यातली पर्वणीच वाटली . दररोज पोटभर जेवण आणि तेही आपण प्रसंगाचे हिरो , असं कधी झालंच नव्हतं . आजपर्यंत उकिरड्याच्या कडेला वाढलेला मी ! इतका सन्मान कधीच झाला नव्हता . आयुष्यात पहिल्यांदाच गादीवर झोपल्यावर कसं वाटत असेल … हे अनुभवत होतो . नाहीतर , आपलं कसं संतरजी , पोतं , तटकर काहीही चालत असे .

चौथ्या दिवशी रात्री रिक्षा केली … तिच्यात मी , शशी आणि नारायण , असे तिघे जण बसलो . सामान काही नव्हतंच … एकुलती एक बॅग , बस्स ! एवढाच संसार . सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघालो . आता शशी बरोबर होती . भविष्याची स्वप्न डोळ्यांसमोर नाचत होती . नारायण बरोबर होता . एस.टी. आणि रेल्वेनं जाण्यात अर्थ नव्हता . रिक्षा सरळ शिरवली नाक्याच्या पुढं आणली आणि हायवेवर उतरलो . तिघंही अंधारात मुरून उभे राहिलेलो . त्यात शशीच्या बाबांचे ट्रक होतेच . त्यामुळे येईल त्या ट्रकचा नंबर शशी लांबून पाही आणि हात वर करायला सांगे . असे बरेच ट्रक गेले . अखेर एका शिखानं ट्रक थांबवला . तिघे ड्रायव्हरशेजारी बसलो . गाडीत ड्रायव्हरशिवाय दोघंजण होते . मनातनं भीती वाटत होती . इतक्या रात्री , आणि शशी बरोबर होती . पण नारायण आधाराला होता . ट्रक सुरू झाला आणि कोल्हापूरचा निरोप घेतला .

भूतकाळ पारखा होत होता . भविष्याला सामोरे निघालो होतो .

पुढे काय ?

प्रश्न कायम होता . गाडी जोरात चालली होती . तिघंही मूकपणे बसलो होतो . कुठल्याशा गावाजवळ गाडी एकदम थांबली . पोलिस समोर उभा होता . पोलिसाला बघताच मनातनं घाबरलो . पण शिखड्यानं सराईतपणे दहाची नोट सरकावली आणि गाडी पुन्हा सुरू झाली . श्वास सोडला .

साताऱ्याला पोचलो, तेव्हा सकाळ झाली होती . उठल्याबरोबर चहा घेतला आणि तरतरीत झालो . रात्रभर जागरण झालं होतं. अंग आळसावून गेलं होतं . पण संसार नव्यानं सुरू झाला होता. जिच्याशी बोलायला मिळावं, म्हणून मन सतत बेचैन असायचं, ती बरोबर होती. जिवलग मित्र बरोबर होता. आजपर्यंत घटना घडत होत्या आणि एखादी घटना वाईट घडल्यानंतर विचार करीत होतो . गर्दीतला माणूस जसा , गर्दी रेटील त्या बाजूनं रेटत जातो , तसं आपलं आयुष्य परिस्थिती रेटेल , तसं रेट्यानं पुढं – मार्ग होत होतं . आज पहिल्यांदाच विचार करीत होतो .

नारायणच्या ओळखीच्या माणसाकडे बॅग ठेवली आणि साताऱ्यातले गल्लीबोळ फिरायला लागलो . दिवस उन्हाळ्याचे होते . ऊन तापायला लागलं . ‘ खोली भाड्यानं देणं आहे ‘ हा बोर्ड बघायचा आणि चौकशी करायची . पहिला प्रश्न असायचा , नोकरीला कुठे आहे ? आडनाव काय ? आडनाव सांगितलं , की खोली रिकामी नसायची आणि आडनावानं बोध झाला नाही तर आपण कुणापैकी ? नाही , म्हंजे आपलं विचारलं ‘ , म्हणून जातीची चौकशी व्हायची आणि अर्थातच जागा मिळायची नाही .

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

यापूर्वी साताऱ्याचा संबंध आलेला तो प्रवास करताना फक्त स्टँडचा . सातारा कधी पाहिलाच नव्हता. अजिंक्यताऱ्याच्या आश्रयाला वसलेला गाव आम्हाला काही आश्रय देत नव्हता . फिरून फिरून तोंडाला फेस आला होता . दुपार होऊन गेली ,..

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading