उपरा,लक्ष्मण माने..
पण आता नियमितपणे दलाच्या बैठकीला जाऊ लागलो होतो . दाभोळकरांची चांगली ओळख झाली होती . पण दलाचं स्वरूप हे ब्राह्मणी वाटायचं . नुसत्या चर्चा वांझोट्या वाटायच्या . नोकरीचे प्रयत्न सुरू झाले होते . कोकाकोलाच्या बाटल्या विकून दुष्काळग्रस्त मुलांना मदत कर, कुठं भाजी मंडईत आंदोलन कर अशा गतीनं दल जात होता. नोकरीनं मात्र चांगली जिरवली होती .
पण आता एक समर्थ सहकारी लाभला होता , एवढंच . घरात काय संपलं असेल , याची काळजीही आता एकट्याची राहिली नाही . दलच पाहत असे . अर्थात , दल म्हणजे दाभोळकरच पाहत असत . नवीन मुलं येत होती … चर्चा होत होत्या . शशीला शिवणकाम येत होतं . पण मशीन नव्हतं . एका मुसलमान गृहस्थानं आपलं मशीन मोफत वापरायला दिलं . आता मार्ग खडतर , दिशा मिळाली होती . अंधूकशी का असेना , दिशा होती . उपकाराची भावना जाऊन कर्तव्य करणारी मंडळी मिळाली होती . डॉ . दाभोळकरांनी ओळखीनं शिलाईचं काम मिळवून दिलं . चार आणे डझन चड्या आणि आठ आणे डझन पिशव्या . शशी सकाळपासून सायंकाळपर्यंत पिशव्या शिवत असे . दोन्ही वेळचा स्वयंपाक मी करत होतो . तिला मदत करीत होतो . पण बायको कमावते आहे आणि आपण खातो आहोत , पटत नव्हतं . नोकरीचा शोध चालूच होता आणि राबराबून शशीला आठवड्याला पंधरा ते वीस रुपये मिळत होते . बाकीचे पैसे दाभोळकर देत होते .

आता निदान उपाशी झोपत नव्हतो . औषधांसाठी पैसा मोजावा लागत नव्हता . घरच्यांनी संबंध तोडले होते . अधुनमधून पोपट येत होता . थोडीफार मदत करीत होता . पण आई – बाला काही माहीत नसायचं . चार – पाच महिने असेच तंगीत गेले . असंच एकदा ‘ साधने’चे संपादक यदुनाथ थत्ते व्याख्यानाला साताऱ्याला आले होते . माझी ओळख नव्हती . ज्या माणसाला पाठिंबा द्यावा , म्हणून मोर्चा काढला होता , तो माणूस पुढे उभा होता . बोलत होता . ओळख झाली होती . पण साधने’चा संपादक इतका साधा असेल असं मनाला पटत नव्हतं . दाभोळकरांनी पुन्हा सारेगमा गायली . यदुनाथ बघतो ‘ म्हणाले आणि मी नेहमीसारखं दल आणि पिशव्या – शिलाई असं दुहेरी काम करू लागलो . पण आता जगावं , असं वाटू लागलं . अन् अचानक भरदुपारी तार आली ‘ लगेच निघ . काहाटी व्हाया बारामती , यदुनाथ , ‘ बस्स , एवढीच तार . दाभोळकरांकडे गेलो . ते घरी नव्हते . गावाला गेले होते . त्यांच्या पत्नी सौ . डॉ . शैला दाभोळकर यांच्याशी बोललो . त्यांनी एकट्यानं जाऊन यायला सुचवलं . लगेच गाडी पकडली . अर्थात , तिकिटाला पैसे शैलावहिनींनी दिले होते . आता संबंध अगदी घरोब्याचे झाले होते .
बारामतीचा भाग तसा माहितीतला होता . वाजवण्यासाठी खेडोपाडी फिरलेलो होतो . काहाटीत पोचलो तेव्हा बरीच रात्र झाली होती . गाडीनं रस्त्यातच उतरवलं होतं . पिकप शेड वगैरे काही नव्हतं . आणि गावही जवळ दिसत नव्हतं . त्यात , रात्र काळोखाची . हायस्कूलवर कसं पोहचावं , याचा विचार करीत उभा राहिलो होतो . तेवढ्यात दोन – तीन सायकली आल्या . त्यांच्याबरोबर गावात आलो . हायस्कूलची चौकशी केली , तर तिथून हायस्कूल दोन मैलांवर असल्याचं समजलं . सगळे दिशा दाखवीत , पण बरोबर कुणी यायला तयार होईना . अखेर एक विद्यार्थी बरोबर यायला निघाला . गावापासून बरंच लांब गेल्यावर दोन – तीन चाळीवजा इमारती दिसू लागल्या . रस्त्यात विद्यार्थ्यानं बरीच माहिती दिली होती .
महिन्या – दोन महिन्याला शिक्षक बदलत असत . कुणीच टिकत नाही . मनातनं मीही हबकलो होतो . पण यदुनाथजींनी पाठवलं होतं . कदाचित जम बसेल , असा विचार करीतच एका दुमजली घरासमोर उभा राहिलो . रात्रीचे नऊ वाजून गेले होते . दार उघडलं गेलं . आतून मध्यम वयाच्या एका बाईंनी दार उघडलं . कुठून आलो सांगितल्यावर ओळख पटली . त्या बाईंनी ‘ बाबाजींना भेटा … वरती आहेत ‘ म्हणून सांगितलं . जिना चढून वर गेलो . तिथे एक बुवा बसले होते . पांढरीशुभ्र लांब दाढी कुरवाळीत मांडीवर मांजरीला गोंजारीत असलेले भगव्या कफनीतले वृद्ध गृहस्थ . हेच बाबाजी . ज्यांनी दारात स्वागत केलं , त्या माताजी . बाबाजींना कुठून आलो वगैरे परिचय करून दिला . त्यांनी नोकरांना हाक मारून मला जेवण वाढायला सांगितलं . लोंढे नावाचे एक गृहस्थ होते . त्यांनी वसतिगृहात झोपायला नेलं . दुसऱ्या दिवशी ऑर्डर घेतली . हजर रिपोर्ट दिला . आणि लगेच बि – हाड घेऊन येतो , असं सांगून साताऱ्याला यायला निघालो . साताऱ्याला येऊन शशीला सारं सांगितलं . तिला आनंद झाला . एकदा मार्गी लागलो असं वाटलं . सामान फारसं नव्हतं . जे होतं , ते मित्रांनी दिलेलं . सामान बांधलं … सर्वांचा निरोप घेतला आणि पुन्हा बि – हाड हलवलं – सातारा ते काहाटी . डॉ . दाभोळकरांनी पत्र लिहायला सांगितलं होतं .
साताऱ्यानं बऱ्याच अडचणी पाहिल्या होत्या . काहाटीला पोचलो . वसतिगृहाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली . त्यामुळे वसतिगृहातच दोन खोल्या मला मिळाल्या . काहाटी बारामती – जेजुरी रस्त्यावरचं गाव . उंबरा आठ – नऊशे . अगदी भारतीय खेडं . काहाटी नदीच्या काठावर . गावाचं आणि हायस्कूलचं फारसं जमत नव्हतं . पंचक्रोशीतली मुलं शिकायला येत असत . नदीच्या एका काठावर हायस्कूल आणि दुसऱ्या काठावर वसतिगृह . दोन्ही निर्जन , ओसाड माळावर . पावसाळ्यातला दोन महिन्यांचा काळ सोडला तर एरवी नदी कोरडी ठणठणीत असायची . सकाळी बरं वाटे . पण दुपार होत गेली , की घरात – शाळेतही थांबेनासं व्हायचं . माझं बरं होतं .अकरा वाजता शाळेत आलो , की संध्याकाळपर्यंत शिकवण्यात वेळ जायचा . पण शशीची स्थिती चमत्कारिक होई . सारा दिवस वसतिगृहात थांबायचं म्हणजे एकांतवासाची शिक्षाच असायची . एकटंच त्या येवढ्या मोठ्या खोल्यांत भुतासारखं राह्यचं . इलाज नव्हता . शाळेत बाबाजी आणि माताजींची हुकूमत चालायची . शाळेला जमीन होती . शेती शाळा , ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा विचका कसा होतो , हे पाहिलं होतंच . पण आता शिक्षक म्हणून अनुभवत होतो . मुलं शाळेत सतत गैरहजर असत . पिकांची राखण , घरातल्या जनावरांची राखण आणि घरातल्या लहान मुलांची राखण . सारं बघत शिकायचं . शाळा चुकायची . सारी मुलं खेड्यातली . धडपणे लिहिता – वाचताही यायचं नाही . आठवी , नववीतली मुलं , पण तन्हा ही असायची . शिक्षक परिश्रम तरी काय घेणार ? … डोक्यात खूप चांगल्या कल्पना असत . पण बाबाजी – माताजी आणि मुलं ! त्यांचे गुणदोष , माझे गुणदोष . पण आपण इथं फार काळ टिकू असं वाटत नव्हतं . संस्थेचे आर्थिक व्यवहार , संस्थेचं स्वत : चं व्यवस्थापन याबद्दल इथं लिहीत नाही . कारण तो स्वतंत्र विषय आहे . पण हुकूमशाहीत फार वेळ जमेल असं वाटत नव्हतं . आणि झालंही तसंच . वार्षिक परीक्षा झाल्या … वर्गातली तीन मुलं पास , बाकी सारी नापास . माताजी कडाडल्या , ‘ रिझल्ट चांगला लावा . ‘ पुन्हा पेपर तपासले . पुन्हा जेमतेम अर्धी मुलं पास . पुन्हा माताजींचा हुकूम …

मग पोरांना बोलावून घेतलं . पेपर पुरवले . लिहून घेतलं आणि सगळीच मुलं पास झाली . कटू असलं तरी सत्य होतं . शाळा चालायला हवी होती . शिक्षकांचे संसार चालायला हवे होते . आणि शिक्षणाचा कारखाना सतत चालणं गरजेचं होतं . परीक्षांचे रिझल्ट लागले आणि संस्थेनं तीन – चार शिक्षकांना काढून टाकण्याची नोटिस बजावली . त्यात मी होतोच . आता काय करावं ? कुठं जावं ? घरी जाणं शक्य नव्हतं . साताऱ्याला बेकारच होणार होतो . पण आधार होता . डॉ . दाभोळकरांना खूप मोठं पत्र लिहिलं . त्यांचं उत्तर आलं … पुन्हा तू साताऱ्याला ये . खोली पाहून ठेवतो आणि मी जिवंत असेपर्यंत तुला रस्त्यावर यावं लागणार नाही , हे लक्षात असू दे . तुला फार देता येणार नाही .
पण तुझ्यासारख्याला सांभाळणं आमचं कर्तव्य आहे ‘ वगैरे . खूप आधार वाटला . पुन्हा सातारा . मला संस्थेनं का काढलं ? कुणास ठाऊक … पुन्हा बिहाड बांधलं . बाबाजी – माताजींचा निरोप घेतला . आणि तो मुलगा आठवला , तो सांगत होता … ‘ इथं शिक्षक टिकत नाहीत , आणि टिकणार नाहीत , दर चार – दोन महिन्यांनी इथं नवा माणूस लागतो . ‘ मी ते अनुभवलं होतं . साऱ्यांचा निरोप घेतला आणि गाडी पकडली . आता पुन्हा एकदा अनिश्चित भविष्याकडे वाटचाल सुरू झाली .साताऱ्याला परत आलो , तेव्हा कार्यकर्त्यांनी खोली बघून ठेवली होती . समाजवादी युवक दलाच्या सहकाऱ्यांचं पाठबळ हेच माझं बळ होतं . त्यांच्या मदतीनं पुन्हा साताऱ्यात स्थिरावलो . आता मंगळवार पेठेत होलार समाजाच्या वस्तीत जागा मिळाली होती . पोटाला लागलो नव्हतो . पण स.यु.द.चं काम करीत होतो . घराची सारी व्यवस्था डॉ . दाभोळकर आणि स.यु.द.च्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरातल्या माणसासारखी ठेवली होती .
धनंजय कासकर नावाचा एक कार्यकर्ता त्याच्या नातेवाईकाच्या रेशनिंगच्या दुकानातून धान्य द्यायला लागला होता . शेजारपाजार अतिशय दरिद्री . घरासमोर छोटं मैदान होतं … तिथं दल लहान मुलांसाठी शाखा चालवीत होतं . शाखेवर जात होतो . चंद्रकांत शेडगे नावाचा कार्यकर्ता दल शाखेचं काम पाही . मुलांना गाणी , गोष्टी , खेळ शिकवत असे . दिवस जात होते . वर्गसंघर्ष – वर्णसंघर्षलाईन घेऊन सारे समूह काम करत होते . त्यात , शशीला दिवस गेलेले . मनातनं तसा खूप आनंद झालेला होता , पण आनंदानं हुरळून जाण्यासारखी स्थिती नव्हती . परिस्थिती वास्तवाचं भान करून देत होती . आम्ही उभयतांनी विचार केला . हे मूल आपल्याला परवडणार नाही . आपण गर्भपात करून घ्यावा . आपल्याबरोबर एका नव्या जीवाचे हाल नकोत . निर्णय पक्का झाला आणि पुण्याला जाऊन गर्भपात करण्याचं ठरवलं . आणि पुण्याला जायचं मनातून जुळवीत होतो , तेवढ्यात यदुनाथ थत्ते आलेले … त्यांना सारं सांगतो . अर्थातच , गर्भपात करण्यास यदुनाथ विरोध करतात . असं करू नका . एका गंभीर प्रसंगातून जात आहात … पहिलं – वहिलं मूल असंच … सांगून गेले . अर्थात , शशीचा विचार बदलला . मला बदलण्यापलीकडे काही करता येण्यासारखं नव्हतं . पुढे मुलगा झाला आणि त्याचा आनंदही झाला . एक चुणचुणीत मूल घरात खेळायला लागलं आणि यदुनाथ थत्तेचे आभार मानूनच आनंदाची पर्वणी साजरी केली ! पण त्यावेळी ते मूल मुळावर उठल्यासारखं झालं होतं , हे मात्र खरं . नोकरीचा शोध चालू होता .
डॉ . पुरुषोत्तम खुटाळे सेवा दलाच्या परिवारातले . त्यांचं साताऱ्यात सिनेमा थिएटर आहे . डॉ . दाभोळकर खुटाळ्यांशी बोलले आणि मला खुटाळ्यांच्या राजलक्ष्मी’वर काही दिवस डोअरकीपर म्हणून साठ रुपयांवर नोकरी लागली . सकाळी अकरा ते रात्री बारा वाजेपर्यंत काम करायचं . मधे सिनेमा सुरू असताना जेवायचं . बरोबर असलेला इतर सिनेमा टॉकीज स्टाफ अगदी बेवड्यापासून मटक्यापर्यंत साऱ्या गोष्टी करीत असायचा . तिकिटांचा काळाबाजार तर राजरोस चालायचा . मला तर पैसे हवेच होते . इतर मंडळी ब्लॅकनं तिकिटं विकीत असत , मोह व्हायचा . पण मनाची तयारी नसायची . सारं आठवायचं . मी हायस्कूलला असताना जेव्हा निरगुडीच्या पोरांच्या खोलीवर राहत होतो , तेव्हा सारखं सिनेमाचं वेड होतं . खिशात पैसा नसायचा . सिनेमा बघण्याची तीव्र इच्छा असायची . खोलीतली सारी पोरं सिनेमा पाह्यची , आपण नुसतं त्यांच्याबरोबर थिएटरावर जाऊन पोस्टर्स बघायचो . सारेजण पानबीन खाऊन खोलीवर परत आले , की आपण नुसते त्यांचे विनोद ऐकायचे , नाहीतर स्टोरी ऐकायची ! आणि ह्यातूनही मार्ग निघाला … सिनेमाला गर्दी असली , की तिकिटं मिळत नसायची . आपण हायस्कूल सुटलं , की बारीत उभं राह्यचं आणि साऱ्या खोलीतल्या पोरान्ला तिकिटं काढून द्यायची . त्यातून राहतील ती ब्लॅकनं विकायची आन् सिनेमा फुकटात पाडायचा . ही सवय आयुष्यात नारायण बोडके नावाचा मुलगा येईपर्यंत चालू होती . नारायणला असं केलेलं आवडायचं नाही . तो बोलणं बंद करायचा आणि स्वत : सिनेमाला जाताना बिनचुकता मला घेऊन जायचा . तिकिटं तोच काढायचा . त्यामुळे त्याचा प्रभाव सतत असायचा . पण ज्या पोरांना मी तिकिटं काढून द्यायचो तेच सगळीकडं बोंब मारत जायचे ‘ सारकं सिनिमं बगतंय , तिकिटाचा काळाबाजार करतंय आन् सिगरीटीचा धूर फुकत उंडग्यावानी फिरतंय ! ते कशाचं शिकतंय ? ‘ इथपासनं ते त्यानं फलटनात रांड ठिवलीय ‘ इथपर्यंत सारं झिरपत बाच्या कानावर जाऊन आदळायचं . आज खरंतर पैशाची गरज असे .
पण तिकिटं विकावीत , असं मात्र पुन्हा कधीच वाटत नव्हतं . त्यात साठ रुपड्यांसाठी बारा तास राबावं लागायचं , म्हणून दुसराच विचार केला , आपण धंदा करावा . पुन्हा दाभोळकरांना बोललो . हे थिएटरचं खरं नाही . आणि स.यु.द.च्या सहकाऱ्यांशी बोलून काही छोटा धंदा करावा , असं ठरलं . -आणि एके दिवशी , दाभोळकरांच्या ओळखीनं कापडाच्या दुकानातून ब्लाऊज पीस ठोक भावानं घेतले आणि सायकलवरनं फिरून साताऱ्यातून आणि आसपासच्या खेड्यांतून विकू लागलो . हा धंदा मात्र पावबटरांसारखा फायद्याचा ठरत होता . साताऱ्यात मोती चौकात रस्त्याच्या कडेला बसून ब्लाऊज पीस विकू लागलो , की आपल्याला कोणी ओळखणार नाही , हे पाहत असायचो . दिवसाला पाच – सहा रुपये पडतल गावत होती .

सारा सातारा गल्लीबोळानिशी माहीत झाला , तो हे ब्लाऊज पीस विकण्यामुळे . असाच एकदा पीसेस घेऊन सायकलवरनं फिरत होतो . साताऱ्यात काही लोक ओळखत असत . दाभोळकरांचे एक व्यापारी मित्र होते . खूप पैसेवाले . दारात हत्ती झुलावा , तसे डझनांनी ट्रक झुलत असत . त्यांच्या घरापुढून ‘ ब्लाऊज पीसवाला ‘ म्हणून ओरडत मी पुढं गेलो . आणि त्या अमीर घराण्यातल्या एका गोऱ्या चामडीच्या पोरीनं बोलावलं , म्हणून तिकडं गेलो , तो साऱ्या गोऱ्या बाया जमल्या आणि ‘ बघू बघू ‘ म्हणत गाठोड्यातले बरेच पीसेस बघायला घेतले . मी एरवी चार – दोनच पीस…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
