उपरा,लक्ष्मण माने..
घालून बसणारे बाप , चुलते अपराधीपणे बसले होते .
पंचायत सुरू झाली. अर्थात, सारं आमच्या भाषेतून . गावातली मंडळी जमली होती , परंतु त्यांना काहीच समजत नव्हतं. माझ्याशी मात्र बोलत होती . त्यांना काय चाललंय , हे पाहिजे होतं .
मी माझी बाजू मांडली . सारी अक्कल पणाला लावून बाजू मांडत होतो. उदा., मी जात मानत नाही. पण माहितीसाठी बायको मराठा असल्याचं सांगतो .
पंच विचारतो,

‘ तिच्या येळी उशा – पायत्याला बसला हुतास काय ? ती मराठ्याची हाय ह्याला पुरावा काय ? अन् ती बामनीन आसली, तरी आपल्या जातीत चालत न्हाय . तुझ्या बापजाद्यांनी केलं होतं का ? ती म्हारीन हाय , की मांगीन हाय , म्हाईत न्हाय … तू तिला सोडून दे . निदान , लगीन केलं न्हाय , म्हन . गड्यानं बाय ठेवली , तर चालल , लगीन चालत न्हाय . तू तिला ठेवली म्हन . तरच इचार होईल ?
‘ मी सविस्तर उत्तरं दिली . ‘ लई चार बुक शिकलास म्हन आक्कल आली व्हय ? आमास्नी शिकवू नगं . साऱ्याचा इस्कूट हुईल . पंगतीला अन् मयतीला कुत्रा बसायचा न्हाय . ह्याचा इचार कर … चल रं , निघा .
‘झालं. पंचमंडळी उठली. आता काय करावं ? बा तर धडाधडा रडत होता . मागच्या पावलानं बोलत होता .
हातापाया पडून पुन्हा बैठक सुरू झाली . मंडळी वाटेल तसं बोलत होती . मी ऐकत होतो . चांगलं प्रबोधन होत होतं . अखेर आप्पानं तोडगा सुचवला … पंचायतीचा अनेक वर्षांचा अनुभव गाठीला . आप्पा म्हणाला ,
‘आपल्यात उरसांड चालतं … नावरामुली उरसांड गालकाक , ग्वालाद निंडच तरी नाम आतनक गुबली भुडकाकू .’ ( ज्यांच्या आईबापाचा पत्ता न्हाई अशा अनाथाला आपल्यात दत्तक (उरसांड ) घेता येतं . उरसांडाला आपल्यात पोरगी देता येते . त्याला जातीची परवानगी हाय …) आणि ह्या मुद्यासाठी त्यानं पंचायतीच्या अनेक आठवणी दिल्या. झालेल्या निर्णयाचं आणि शिक्षांचं सार सांगितलं . शाळेचा उंबरा न चढलेला हा माणूस कोर्टात वकिलानं आपल्या अशिलाची बाजू प्रभावीपणे मांडावी , तशी बाजू मांडत खंबीरपणे उतारे , उखाणे , म्हणींची पेरणी करीत , सारा अनुभव पणाला लावून लढला .
मंडळी बाजूला गेली . विचार केला आणि निर्णय सांगितला. जर तिला सोयऱ्यात उरसांड करून घेतली, तर चालल . पण उरसांड करून घेतल्याशिवाय आमी बसणार न्हाय .
झालं ; आई , आप्पा , तात्या , काकी , नानी आणि मुख्य म्हणजे माझे वृद्ध वडील , साऱ्यांनी इतका गलका केला आणि सारीजण माझ्या गळ्यात पडून रडू लागली .झाले .
‘ बाबा , मानसातनं उठलो असतो. आता मानसात आलो ! ‘ ‘
रडण्याचा भर ओसरला. मुलीला पंचात आणा… गलका झाला. आतापर्यंत शशी सपरात बसली होती. ती बाहेर आली. तिला आत्यानं आणलं . आत्यानं आणि मामांनी तिला उरसांड करून घेतलं . तिला दोघांच्या मांडीवर बसवलं. मानानं तिला नवी कोरी साडी आणली होती. नवी साडी नेसून ती बसली होती. सवासनी तिला कुंकू लावीत होत्या . तोंडात साखर घालीत होत्या. तिला जातीनं जातीत घेतलं होतं म्हणून तोंड गोड करायचं . सांचं साऱ्या भावकीला बानं तेलच्याचं जेवण घातलं.
मंडळी आता खरोखरच विटाळ मानत नव्हती . जेवताना मला , शशीला पंगतीच्या मधे बसवलं होतं .
साऱ्यांची जेवणं झाली . पुन्हा रातच्या पंचांच्या भानगडी नसतील , म्हणून वाकळ घेतली आणि शाळेत झोपायला निघालो होतो . तेवढ्यात बा बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला ,

“ पोरीला दिस गेल्यात का ?
” मी होय म्हणल्यावर बाचा चेहरा पडला .
‘ आता काय झालं ? ” मी विचारलं .
बा म्हणाला, “ लक्षा, निन नांगलक मिदा ख्वाला कासा ? ” (तू आम्हाला मारून टाक.)
मला उलगडा होत नव्हता. मी बाला काय झालं, म्हणून विचारलं.
बा म्हणाला,
‘आता पंच येऊन बसत्याल. तुझं लगीन लावाया पायजी का नको ? ” आता मात्र माझं मस्तक उठलं होतं. एकदा असंच निघून जावं , असं वाटत होतं . पण काय करणार ?… … जे जे होईल ते पाहण्यापलीकडं काही करता येत नव्हतं. वाकळ तिथंच टाकली आणि तंबाकू मळत बसलो . बा लगबगीनं आप्पा, तात्या, आई, नानी, आणि मामा ह्यांच्यासंगं बोलला . साऱ्यांनी शशीला विचारलं , तिला दोन महिने झाले होते . आता काय करावं ? असा विचार सगळ्यांनाच पडला .
पंचायत पुन्हा भरली . मंडळींनी बाला धुण्याचंच ठरवलं असावं . आता ह्या लग्नातच लगीन लावलं पायजे . मामानं वस्तुस्थिती सांगितली .
‘ तसं उरसांड होण्याआधीचं पोर होय . ते जातीत कसं यील ? तेला आईबाप हाय , पण जात कुठंय ? लग्नाच्या आधीचं ग्वालनाय म्हणूनबी घेता येत न्हाई !
‘ पुन्हा पेच निर्माण झाला . माझ्या तर डोक्यात किडे पडायची वेळ आली होती .खुप सुनवावं , असं मनात येत होतं . पण घरातले सारे लोक दाबत होते . एकदा चांगलं थाटात लग्न झालंय . पुन्हा लग्नाची गरज नाही एवढंच म्हणालो. तशी मंडळी वैतागली.
‘ तुला काय जातीचं ना गोतीचं , आना सख्या म्हारणीचं .
‘ आता काय बोलायचं ?
आता माझी वकिली दत्तू कैकाड्यानं केली. तो म्हणाला,
‘आरं, वळगांतूली सत्यनारायणक कुळशी ईला निंडच तर पाक खागतिग्यूरच तरी नाडकाक ! (गावातल्या मंडळींन्ला सत्यनारायणला बसताना बायको नसली, तर सुपारी कंबरला लावत्यात आन् पूजा करत्यात. तवा आसं करा, लक्षाला सुपारी कंबरला द्या आन् लगीन लागलं म्हणून टाळ्या वाजवा … म्हंजी झालं. त्याच्यात एवढा वाद कशाला घालता … मिटवायचं हाय नव्हं ? का खंदूक घालायचाय, ते सांगा…)
आणि गंमत म्हणजे रात्री दीड – दोन वाजता मला सुपारी हातात घेऊन उभं केलं आणि मंडळींनी अक्षता टाकून टाळ्या वाजवल्या. आता माझं लग्न झालं होतं .
जातीचे सारे अधिकार मिळाले होते . मी जातीचा झालो होतो . माझं घरदार जातीचं झालं होतं . दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बोकड मारला आणि साऱ्या भावकीला जेवू घातलं . नशीब म्हणजे , सारी भावकीचीच माणसं होती . सारी जमात नव्हती . नाहीतर थाळभरणी , तिदळकी करीत आणि जाबजबाब करीत ह्या थळांचा निर्णय पटला नाही , तर दुसरीकडं जाणं वाट्याला आलं असतं .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पाच्या मुलीच्या- रतनच्या हळदी लागल्या . आता बँड वाजवायचा सराव पार मोडून गेला होता . पण मंडळींनी फार आग्रह केला . पुन्हा ढोल वाजवला . गावातले मित्र , स्नेही भेटत होते . बोलत होते .
लग्नाच्या दिवशी असाच प्रसंग आला. रानात लांब जाऊन जावळ काढायचं असतं. आप्पाला साऱ्या पोरीच होत्या. पोरगा दोन – तीन महिन्यांचा होता . घरात थोरला मीच . रतन नवरी झालेली . तिला आणि मामाला घेऊन लांब गेलो . खडे गोळा केले – धुतले – ओळीनं मांडून ठेवले. त्यांच्यावर हळदकुंकू वाहिलं . मामानं रतनच्या केसाची बट काढली नि निवादावर ठेवली . उदबत्त्या लावल्या . नारळ फोडला आणि ‘ जावाळ वाहून झालं. ‘आम्ही परत आलो.

संध्याकाळी लग्न लागण्याअगोदर जमातीनं माझ्या लग्नाबद्दल भावकीला विचारलं. भावकीनं सारं सांगितलं. सारं रीतीनंच झालं होतं आणि भावकीची तक्रार नव्हती. जातीनं मान्यता दिली आणि प्रकरण मिटलं.
लग्नसोहळा झाला, पुन्हा साताऱ्याला आलो. आता जातीचा जो ठिपका पुशीन म्हणत होतो , तो गडद झाला होता. मनातून उदास झालो होतो. शशीला सारंच नवीन होतं. पण एका जीवघेण्या दुखण्यातून पुन्हा उभं राहवं, तसा उभा राहणार होतो …
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा कादंबरीतुन)
आज उपरा कादंबरीचा शेवटचा भाग संपन्न झाला आहे.
