उपरा,लक्ष्मण माने.(भाग ५).

उपरा, लक्ष्मण माने..

खुशाल ठेव … ‘ म्हणाला आणि लगालगा चालू लागला .

तांडा पुढे चालला होता. गाढवं शहाण्यासारखी पायवाटेनं चालली होती. वाटेच्या दोन्ही बाजूला पिकं होती. सिंगरं मात्र नीट चालत नव्हती. गाढवांच्या पायात पायात चालत होती. गाढवं बिचकत होती. आणि आमची गाढवावर पंचाईत होत होती.

कंठाळीचं वझं बरोबर बसलं नव्हतं . त्याला एका बाजूला कल होता . त्यानं मी आणि पुष्पी एका बाजूला कललो होतो . सारी जनं तरातरा चालत होती . राधीच्या सिंगरानं राधीच्या तोंडावर लाथ मारली तशी राधी बुजली आणि कोंबडी केकटायला लागली . बानं ‘ पिडी पिडी ‘ ( धर – धर ) म्हणत मागं आईला साद दिली . आई बिचारी पळत आली . गाढवं धरली , कंठाळी नीट केली . दोन्ही कंठाळीत वजन सारखं केलं . ‘ साथ कंठाळी साथ ‘ असं म्हणत पुन्हा आम्ही निघालो . ‘ गवगवा ख्वांडीनास ‘ ( पोरं मारली होतीस ) म्हणत राधीच्या पायावर एक फटका मारला आन् राधी शहाणी झाली . तांडा पुढं सरकू लागला . साऱ्या रस्त्यात कुणाचं किती पैसं द्यायचं राहिलं … कुणाची उधारी किती राहिली … ह्याचा इचार चालला होता . आणि गाढवं रस्त्यातच थांबली .

म्होरनं दगड्या रामूशी येत होता. त्याला बघताच जयसिंग्यानं गाढवं थांबवली . बा म्होरं गेला. दगड्या बाला शिव्या देत होता. आम्ही पोरं गाढवावरनं बघत होतो . बा दगड्याच्या पाया पडत होता… आडरानात सारं बिहाड सोडून बघू नको म्हणून. आन् दगड्या ऐकत नव्हता . सारी बिलामत माज्यावर येल ‘ म्हणत होता. बानं खिशात हात घातला. पैसं काढलं . पण दगड्याच्या मनाला येईना ‘ साऱ्या बिहाडाचा झाडा घ्यायचाय. तुमचा काय नेम ? बिनभिकार १५ इच्चा आयला ! कुणाचं काई नेत असाल तर? ‘ म्हणत होता. बानं हात जोडले. एक कोंबडी गाढवावरची सोडली आन् दगड्याच्या हातावर ठेवली. जयसिंग्यानं पैसे दिले. तवा दगड्या बाजूला झाला .

गाढवं म्होरं निघाली . बानं ‘ गरिबावर ध्यान ठिवा ‘ , म्हणून दगड्याचं पाय धरलं . दगड्या खुलला होता . त्यानं आईकडं बघितलं . हासला आन् गावाकडं निघून गेला . आई , बा , पारी, जयसिंग्या सारी जणं गपचीप होते . गाढवं म्होरं चालली होती.

दिस उगवला , तसा बानं त्येला हात जोडले . दिवसाची किरणं भराभर वर येत गेली. उबवत गेली अन् चटका बसायला लागला. आम्हाला भुका लागल्या होत्या. आईनं भाकरी आन् हिरव्या मिरच्याचा खरडा समीला, मला दिला. गाढवावरच आमचं खानं सुरू झालं.

बरंच चालून आलो होतो , कुठं जायाचंय ‘… म्हणून मी आईला विचारलं. आई म्हणाली, ‘ आपुन बनभिकार … जिथवर दिसंल आन् तुझा बा म्हणंल, तिथं जायाचं. ‘१२ / उपरा मला बरं वाटलं नाही . मी तिला पुन्हा पुन्हा इचारत होतो . कारण बसून बसून आन् राधीचा कनाठा रुतून रुतून माझ्या गांडीला कढ आला होता . माझी किरकीर वाढली होती. बा , नुसतंच ‘ झा, अग झा, ‘ करीत गाढवं हाकीत होता. अखेर आईनंच बाला इचारलं.

‘ कुठं बिराडं उतरायाची ?

‘ बा इचार करीत होता.

बराच वेळ गेला. अंतरही बरंच गेलं. वाटंत गावं लागली होती. मागं जात होती . आमची गाढवं म्होरं चालली होती . चालून चालून आई वैतागली होती.

हळुहळू साऱ्यांचीच किरकीर सुरू झाली. आवाज वाढत होते. आम्ही पोरं अवगडलू होतो. बाला जयसिंग्यानं विचारलं , तवा बा म्हणाला ,

‘ आरं , आताशी तर कुठं चार – पाच कोस आलुया . जाधववाडी जाऊ दे , आपून पालवणाला बिराड उतरू . म्हणजे बारा वाड्या घावल्यात आन् वड्याला , डोंगराला फोकंबी मुबलक हायती . पाऊस – पाणी आलं , तर देवळाच्या आडूशाला राह्यला ईल .

‘ गाढवाच्या पायांना गती आली . बा , जयसिंग्या सारी झपाटल्यागत चालू लागली . गाढवांच्या पाठीवर सपाटं बसू लागले . आमच्या थोबाडात सणकून बसू लागल्या . आमचे आवाज बंद झाले , आन् गाढवांच्या खुरांचे आवाज , पायांचे आवाज … नुसती भ्रमंती सुरू झाली ती पालवण येस्तोवर . आन् आम्ही पालवणच्या पांदीला लागलो .

गाढवं पांदीला लागली, तशी गावातली कुत्री मोठ्यांदा भुंकू लागली. गाढवांच्या तांड्याला बघून बा मेल्यागत धावून अंगावर येत होती . खग्यानं त्यान्ला दगडं मारायला सुरुवात केली, पण कुत्री काही बोंबलायची थांबेनात. जयसिंग्याच्या पालवीनं ( कुत्री ) गांडीत शेपूट घालून ते गाढवांच्या पायात पायात चालू लागले होते. कोंबडी करकरायला लागली आणि एकच कालवा झाला. गावातली पोरं चड्या सावरीत ह्या नव्या लोकांचं स्वागत करायला धूम पळत येत होती.

बानं गावंदरीला पिंपळाच्या झाडाखाली बिहाडं उतरायला लावली. आईनं डोस्क्यावरचं वझं खाली ठिवलं . बानं पाठीवरचं देवाचं टोपलं पारावर नीट ठेवलं. दोन्ही हात जोडले. ‘ येस दे … ‘ १६ म्हणून टोपल्यातला गुलाल जमिनीवर टाकला.

आईनं मला , पुष्पीला गाढवावरनं उतरवलं. समीला, लालीला खाली उतरवलं. आम्ही पोरं पिंपळाच्या पारावर हुंदडू लागलो . आईनं फोकाच्या खराट्यानं पिंपळाच्या झाडाखाली झाडायला सुरुवात केली. पिंपळाची पानं , काटक्या , गुरांचे आणि माणसांचे पव लोटून ढीग केला. बानं राधीवरचं, भागीवरचं ओझं उतरवलं. कंठाळी लावली. त्याच्यावर पोतं झाकलं. वाकळांचा ढीग घातला. आईनं केर भरून टाकला.

बारावर एक वाजून गेला होता. पोटात कावळं वरडत होतं. लई भूक लागली होती. पण बिहाड लावस्तंवर आई काय खायला देनार नव्हती. आसपास बघ्यांचा गराडा पडला होता. आया, बाया , बापे , पोरं , सारी बिहाडाच्या आसपास जमली होती. कुणी कुणी बाला , आईला , जयसिंग्याला वळकत होते.

‘ आरं , बापू , आवंदा यायला लई उशीर केलास . का म्हणलं, आवंदा येतच न्हाईस . एकजण म्हणाला.

‘ पाटील, न्हाई म्हनून कसं भागंल ? आई पांढरी वाढल, ते पदरात घ्यायला होवं. पोटाला काय करावं ? परमीसर पोटासाठी फिरीवतुया. आपल्या आशीरवादानं फुडल्या वरशी तरी लवकर ईन .

‘बाया – बापड्या आईला कुडूकी, उपन्या, हार ह्यांच्या वा देत होत्या. कुतूहल , उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. मोठी पोरं चेष्टा करीत बसली होती.

बानं जरमलचा हांडा उचलला. आन् तरातरा वड्याला गेला. जयसिंग्याचं बिहाड लागलं होतं. बा – आई आमचं बिहाड लावत होते. जयसिंग्याच्या गाढवाच्या खुरात खडा जाम अडकला होता. गाढवानं पाय वर धरला होता. आन् जयसिंग्याचा जीव खालीवर होत होता . त्यानं इंद्याला एक शिवी हासडली. दाबान आणायला सांगितलं . त्यानं गाढवाचा पाय वर धरला . तसं गाढवानं मागल्या पायानं इंद्याच्या तोंडावर लाथंचा फटका हानला. इंद्या कळवळून बोंबलला . जयसिंग्या उगंच कावला. गाढवाच्या खुरातला खडा निघाला. गाढवानं पाय धरला . तसा जयसिंग्याचा जीव पान्यात पडला . तो आईला म्हणाला ,

‘ अया स्वाडमा खेद नाडलाच पार. सारका काल म्हिनकच पिडक्यांच ” (अगं काकी , गाढवानं पाय धरला बघ. सारखं लंगडत होतं .)

जयसिंग्यानं घंगाळ घेतलं आन् पाण्याला गेला.

बानं पाणी आणलं. आंगूळ करून आल्यावर त्याला देव पुजायचे असत . शिवलं की तडाखा बसायचा. मी लांबनंच बघत होतो . टोपल्यात टाका होत्या . दगडांचे गोटे – खडे, लांब – उभे – निमुळत्या दगडांचे देव होते . बानं पितळीत सारं देव काडलं . टोपल्यातलं तांबडं चिरगुट पाण्यानं धुतलं . दगडाच्या एक एक देवाला धुतलं आन् बैजवार ” मांडून ठेवलं. त्यांच्यावर गुलाल घातला . कपाळाला गुलाल लावला . ‘ आई काळुबाई ‘ म्हणत तोंडातल्या तोंडात बडबडत त्यानं पितळीतलं पाणी आजुबाजूला शिंपडलं आन् बाकीचं पाणी कुळवाड्याच्या घरावर टाकलं.

आईनं भाकरी सोडल्या. तांबड्या मिरच्यांचं द्याट काढलं… मीठ संपलं होतं. ते गावातनं आणलं. मीठ आणि मिरच्या खलात घातल्या . गुंडब्यालानं मिरच्या वाटल्या. बानं पाणी आणलं होतं. मोठ्या वाटक्यातनं पाणी घेतलं. पितळ्यात माती गेली होती. ते धुतलं आन् आमी जेवायला बसलो. चटणीचा भेलना आन् वाळली भाकरी समद्यांनी खाल्ली. ढसाढसा पाणी प्यालो. आई म्हणाली,

“ लक्षा, नांबर काटक्या कुटक्या कड्या येत्या नीन समी लाली हू ! ” (लक्षा , सांच्याला जळान आण . लाली , समी , तू जा)

बानं इळा घेतला आन् जवळच वड्याला एका पाटीच्या फोका आणायला गेला . आमी जळणाला निघालो .

कुपाच्या काट्या, उकिरड्यावरल्या काटक्या येचायला सुरुवात केली . समीनं चार – पाच शेणकुटं वट्यात घेऊन धूम ठोकली. मी काटक्यांचा भारा करत होतो. तेवढ्यात उकिरड्यावर तंबाट्याचं झाड दिसलं. उकिरड्यावर तंबाटी पिकली होती. मी , लाली दोघांनी तंबाटी खाल्ली आणि जळण घेऊन निघणार तोच- ‘ कायरं , मेल्यानू काय करताया तिथं ? ‘ बाईचा आवाज आला. तसा काटक्या तिथंच टाकून धूम ठोकली , आन् दम खायला बिराड गाठलं . आईला सांगितलं . मनातनं त्या बाईला शिव्या देत होतो. पुन्हा जळणाला जावं लागलं. रोज जळणासाठी मार खायचा , शिव्या खायच्या ; आन् घावना की कुणाच्या तरी कुपणाचं फ्यास काढायचं .

दिवस कलला होता. गावातली पोरं बिहाडाजवळ येऊन बसली होती . आई त्यांना हाकलत होती . ‘ आरं , आमी काय जनावरं हाय व्हय ? काय बघताया पेनसुन्यांनो ! म्हणत होती.

उघड्यावर तीन दगडांची चूल कशी असते , ती कशी पेटते, हे पोरांना कुतूहल होतं. पोरं हटायची नि पुन्हा यायची.

जयसिंग्या, बा पाटलाकडं गेले होते. गावात आल्यावर पाटलाच्या वाड्यावर वरदी द्यावी लागते. गाढवं, कोंबडी, कुत्री, माणसं, सगळं सांगावं लागतं. आईनं चूल पेटवून भाकरी केल्या. कालवणाला काहीच नव्हतं. आई गावात गेली. आयाबाया आईला कालवणाला का देत्यात ? मी गेलो तर तास तास उभा राह्यचो, पण कुणी वाढायचं न्हाई . आईलाच सारे कालवण द्यायचे. कालवण करायला किडूकमिडूक द्यायचे. आईनं कुणाकडून तरी मोगान आनलं होतं .

मोगानाचं घुटं, भाकरी सांच्याला मिळणार, म्हणून मी खुशीत होतो.

गाव बऱ्यापैकी मोठं होतं. गावात वाण्याचं दुकान होतं . चारी बाजूनं डोंगर अन्गाव माथ्यावर. सीताबाईचा डोंगर जवळच. तिथं वाघ असत्यात, असं बा म्हणायचा. गावातनं वाणी घोड्यावर बसून बारा वाड्यान्ला वाण पुरवायचा. कुळुकज , बोथं , कळकसराची वाडी , गायदर , मठ , आंधळी, मलवडी , जाधववाडी आणि अशाच लहान लहान बारा वाड्या भोवताली , पाच – सहा मैलांच्या टापूत . मधे पालवण. गावाला बागायती नसायची. तीत बाजरी हे मोठं पीक. आईला वाढल्यालं तरी तेच असायचं .

चालून चालून आई – बा थकले होते . आम्ही सारीच झोपलो . रात बरीच झाली होती . समी माझ्याजवळच झोपली होती . रातची जी वरडाय लागली , तर सारं बिराड जागं झालं . जयसिंग्याचं बिराड जागं झालं. खग्या , म्हाद्या , इंद्या झोपंतनंच काय झालं , म्हणून इचारत होते . आई – बा समीला काय झालं म्हणून इचारत होते . समीला झटका आला होता . दातखिळी बसली होती. हातापायाच्या नाड्या ताठल्या होत्या . डोळं पांढरं केलं होतं आन् अंगाला तनाव द्यायला लागली होती . कसनुसं तोंड करून वरडत होती . आई घाबरली होती . बा उठला , त्यानं तिला देवाच्या टोपल्यातला अंगारा आणून लावला , पर काय उपयोग हुईना . पोरगीला लई ताप भरला . बानं तिला टोपल्याजवळ घेऊन आईला बसायला लावली . उकिरड्यावरनं गवरी आणली … पेटवली … तिच्या धुरानं आनखीनच सारं अंधारलं … जयसिंग्या तिला वारं घालीत होता . आई – पारी तिला मांडीवर घेऊन हलवीत होत्या . आणि बा गवरीजवळ देव वाढवून बसला होता .

बाच्या अंगात वारं आलं . बा मोठ्यांदा वरडू लागला , ‘ सोड सोड … धर धर … तिनं चावरी निनयादशय्यीरक वादीरा , येद , किरा , देवर कीरा का याद कीरा ‘ ( बोल ! तू कोण आहेस ? कशाला आलायस ? देव हायस का भूत हायेस ? बोल ! )

असं म्हणत हाताच्या मुठी आवळीत दातव्हट खात घुमू लागला. जयसिंग्यानं बाचं फिटल्यालं धोतर नीट बांधलं . तरी त्यो उड्याच मारत होता . जयसिंग्या म्हणाला ,

‘ देवा , झाडाचं हाल करू नगं . पोरगी जिवून झोपलीया . काय गुन्हा आसंल, त्यो पदरात घाल. मी पदर पसरतो. चुकलं आसंल , माकलं आसंल, तर लेकराला सांभाळ.

‘ देव घुमायला लागला . आन् म्हणाला ,

‘ आरं , तुझं डोळं झाकल्याती . तुला आमी दिसंना ? … हं – हं-

‘ घुमणं चालूच होतं. जयसिंग्या, आई, पारी , अपराधी भावनेनं देवाम्होरं पदर पसरून बसले होते. पोरगी आईच्या मांडीवर होती तशीच.

जयसिंग्या म्हणाला ,

“ गावा नानयाद चुकीसरी , मीदा चुकीच .

” ( देवा , काय चुकलंय ? काय राहिलंय ? आन् ह्या पोरीला का धरलीयास ?)

क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading