उपरा, लक्ष्मण माने.
देव ऐकून घ्यायचा . घुमत राह्यचा , वाटेल त्या भाषेत बडबडायचा . पुन्हा गोळी देवाला विनवायचा …
सांगतो ते कर . म्होरल्या जत्रंत पाळणा बांध … हॅ … हॅ … हुं … दोन बकरी , चार कोंबडी , आन् माझं देणं दे . सुटशील .
त्यो मान हलवायचा . कबूल करायचा . पाया पडायचा . कुणी पोरं होत न्हाईत … जनावरं जगत न्हाईत … नाहीतर कुणी करनी केलीया … बायकू नांदत न्हाय , गाढवं जगत न्हाईत … न्हाईतर असलेच प्रश्न असायचे . घरटी अंगात यायचं . दिवरुश्यान्ला कमी नव्हती . बायान्ला पदराचं – लुगड्याचं भान नसायचं . देव खेळायचा . झाडाचं लई हाल व्हायचं , रात्रभर हा कारभार चालायचा .
बकर दे … पेढे दे … मांढरदेवीला जा … तिथनं पानी आन … आमुशा – पुनव चुकवू नको … सेवा कर . पायरीला सांभाळ …
सारे गोळ्याच्या , देवाच्या , देव अंगात आलेल्या दिवरुशाला पाया पडत व्हते . आन् आयाबाया – पोरं सारी हा सारा सोळा बघत व्हुती .
आरती झाल्यावर बिराडावर आलो . तवर जेवायचं नाही . सारे पाव्हणेरावळे , सोयरे , मानापानात जेवायला बोलवायचे . आपुन जेवायला जायचं , चार – चार घास घ्यायचे , न्हाई म्हनायचं न्हाई . बा त्या दिशी किती जागा जेवला असंल , कुनाला ठावं ? लई जेवला . आईबी मला बिहाडावर बसवून मामा – मावश्या , आई – बा अशी साऱ्या पावण्यांच्यात जेवली . सारी माणसं बडबड करीत व्हती . कैकाडी कालवा झाला ३२ व्हता . मला झोप आली , चापून मटान हानलं व्हतं . झोपलो .
आज छबिना – पालखी निघनार होती . भल्या सकाळी आईनं उठवलं . पळतच नदी गाठली . पानी तसं गारतोळ होतं . अंगातली कापडं काढली आन् पाण्यात उडी घेतली . पाणी लई खडूळ झालं व्हतं . बायामानसं आंगुळा करीत व्हती . नदीपास्नं दंडवत घालत व्हती . डपडं म्होरं वाजायचं . वल्या आंगानं बाया दंडवत घेत व्हत्या . हातात एक बारीक काठी घेतलेली . नदीपासनं सरळ पालती झोपायची … दोन्ही हात म्होरं जोडायचं . हातातल्या काठीनं खून करायची … उठून उभी राह्याची . खुनंपातुर चालायचं . पुन्हा पालतं झोपायचं . म्होरं डपडं वाजायचं , पिपानी वाजायची . मार्ग चार – पाच नात्यातल्या बायका असायच्या . आसं लोटांगन घालत घालत , दंडवत करीत साऱ्या देवळात नि त्याच्या भवताली फिरायचं . मुख्य देवीच्या देवळापर्यंत आलं की नवस फिटला . पुरुषांचं लोटांगान येगळं . त्यानं वल्या धोतरात झोपायचं . आठ – दहा दनकाट गडी असायचे . म्होरं बाजा वाजायचा . झोपनारानं तोंडात पानाचा इडा धरायचा . गडाबडा लोळायला सुरुवात करायची . नदीपास्नं देवळापोतूर हा गडागडा लोळायचा … बाकीच्यांनी त्याची मोळी करायची . अडचणीतनं चांगल्या सपाट जागी आनायचं . ह्यानं पुन्हा लोटांगन घेत घेत पाच फेरं देवीला मारायचे . अन् नवास फेडायचं .
आंगोळ करून मागारी आलो . दिवस उगवायला आरती झाली . पालखी निघाली . चार जनांनी म्होरं खांद्याचं . पालखीला मान गोळ्यांचा . पालखी गोळ्यांशिवाय हलायची नाही आन् गोळी परतेक जत्रंकऱ्याकडं बकऱ्याची मुंडी , खूर , कातडं , फर आन् सुका सिदा म्हणजे गहू नाहीतर जवारी गोळा करत फिरायचे . चार – दोन पोती मुंडकी , फर , धान्य , खुरा , आन् कातड्यांचा भला मोठा ढीग साठायचा . ते झाल्यावर पालखी हलायची . प्रत्येक बिहाडाजवळ जायची . त्यानं आपल्या टोपल्यातल्या देवाला पालखीतला गुलाल लावायचा . पालखीत पेढं ठेवायचं . समद्यांनी पालखीला ववळायचं . त्याचं झाल्यावर दुसरं बिहाड करत पालखी पालं धुंडत फिरायची . आन् पालखी खाली गावात गेली , की परत यायला दुपार उलटून जायची .
पालखी नदीतनं खाली गेली , की जत्रंकरी राहिलेली मटनं खायाला सुरुवात करायचे . तवर त्याला शिवायचं नाही . जेवणं झाली , की बाबाच्या देवळामागं वडाखाली ही अठरा पगड जात जमायची . उखाळ्यापाकाळ्या निघायच्या , घेणीदेणी निघायची , जितराबांचे याव्हार व्हायचे . आन् एखादं खटलं ओक’ आला असला तर चालायचं .
मी जेवलो हाटीलाम्होरं . तात्यानं एका आन्याच्या आयस्क्रीमची तांबडी कांडी दिली . कांडी तोंडात चोखत चोखत बाबाच्या देवळामागं गेलो …
तिथं मानसांची गर्दी झाली व्हती . बायका आल्या व्हत्या . पुरुष आले व्हते . दोन – चार म्हातारं – ओकळे ४ बसले व्हते . पंचरंगी पागुट्यांत वळकत व्हुते . दोनी बाजूला पाच – पंचवीस मानसं आली व्हती . त्या दोन ओकाळ्यांच्यातला एक बराच म्हातारा व्हता . त्यो म्हनाला , ” तिदळकी यत्यांगो ” ( कोर्टाचा खर्च आना.)
रक्कम त्यो सांगायचा. वादी – प्रतिवादी पैसे पंचाम्होरं ठेवायचे. आनि मग कै ३५ आपली आपली कैफियत मांडायचे. वादी – प्रतिवादींनी बोलायचं नाही . त्यांच्या वतीनं जामीनदारच बोलनार . वादी – प्रतिवादींनी गरज लागली , तर किंवा नवा मुद्दा सुचला , तर आपल्या कैला बाजूला न्यायचा . आन् बोलायचं , ते दोघांच्या कैनं .
मी गेलो तवा एक मानूस सांगत होता …
‘ माझी बायको धाकडं चार वर्स जाली , गहान ठिवलीया . त्यानं पन्नास पन्नास रुपये पाच येळा दिले . मी चार वर्मांत मागारी देतू म्हणालू . आता मी पैसे देतूया . पर ह्यो माझी बाईल मागारी दीना झालाय … ‘ सांगनारा मानूस के व्हुता , पन त्यो सारं आपलं सांगत असल्यागत सांगत व्हता . ह्या खटल्यात असंच सांगायचं असतं .
दुसरा कै म्हनत व्हता ,
‘जनताजनार्दन पाच पंच तुमी परमीसर हाय . तुमी न्याय कराल, त्यो आमी मानून घिऊ . पुन्नाप्पा म्हणतुया , ते खरं हाय. ह्याला पैका पायजे हुता . ह्यानं बाईल ठेवली . सनांग ३६ चांगलं हुतं . म्या ठिवून घेतलं . इस्त्यावर दूध ठेवल्यावर ते उतू जाईल का न्हाय ते सांगा ? मंडळी चार वर्स जनवार येशान ३७ केल्याशिवाय राहील का ? म्या त्याला नुसता खायाला घालाय घेतलं नव्हतं . पायात चप्पल बसली , म्या घातली . पर म्या घुणा कंचा केला ? चार वर्स झाली आता , त्याला माज्या पोटचं नानगंप्वार हाय . त्यानं पैका द्यावा . मी सनांग मागारी देतो . मी का नाकबूल न्हाय ?
‘ पुन्नाप्पा म्हनत होता ,
‘ मालक परमेसरा , मी इस्वासानं माजी दौलत ह्याच्याजवळ ठिवली . आता का ठिवली ? तर मला गरज व्हती . मी गरज्या व्हतो . म्या बाई ठेवली , ती कामाला ; निजायला न्हवं . आन् ह्यानं एक पोर काडलंय . मला पोर नगं . नुसती बाईल पायजे !
‘ त्याच्या बाईचा कै म्हणत व्हुता ,
‘ महाराज , मी मुकं जनावर . हिरवा घास दिसला , खाल्ला . रीत – रिवाज कशाला केलाव ? ह्यो चार वर्स मला घाण ठिवून भाड खायाची ३८ म्हनतुया . शेजला दिल , त्यो बाजंला घिल . त्यो का फुकाट खाया घालंल का ? त्यात बायांची जात आन् ढोरांची जात सारखीच . ह्यानं मला त्याच्या दारात बांदली . ह्योच खाटीक हाय . महाराज , मला आई पांढरीनं न्याव द्यावा . मी आता एक पॉर घिवून ह्याच्या बरूबर कशी नांदू ? आपन परमिसर हाय . आजून झाडाझडती घिवू नगा . मी तुमच्या लिकीसारखी हाय .
” प्रत्येक जन बाजू मांडत व्हता . प्रत्येकाचं ऐकून झालं . सारा कालवा थांबला व्हता . पंच उठले , गटागटानं बाजूला जाऊन चर्चा केल्या . कुजबूज चालली व्हती . सारे थळावर आले . आपलं आपलं म्हननं ओकाळ्याला सांगू लागले . आपल्या आपल्या म्हणण्याचा आग्रह धरू लागले . सगळ्या पंचांचं ऐकून घेतलं . आन् इचार करायला बैठक संपली . पुन्हा सांचं बसायचं ठरलं . दोन्ही पक्षकारांचं आपापलं साक्षीपुरावे , म्हननं मांडून झालं व्हतं . कैनी युक्तिवाद केले व्हते .
हिकडं बघ्यांचं सारं लक्ष त्या बाईवर व्हतं . तिच्या कडेला तानं मूल व्हतं . ते आनंदानं आईच्या थानाला लागलं व्हतं .
ज्यान्ला ओक ऐकायचा नसंल , त्यान्ला नदीच्या कडंला मोकळ्या जाग्यात तमाशा लागला व्हता . कोळाटणी नाचत व्हत्या . गडी रंगात आले व्हते . उनं उतारली तसं कुस्त्याचं फड लागलं . कुस्त्या झाल्या . खोबऱ्याच्या कुस्तीपासनं सुरुवात . म्या दोन – तीन कुस्त्या केल्या . खोबरं खायाला मिळालं . मग मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या लागल्या . शेवटची कुस्ती गुकळीच्या आनंदा कैकाड्यानं जितली . चितपट मारली . त्याचा जय झाला . कुस्त्या संपल्या . मंडळींनी मटन संपवत आनलं व्हतं . साऱ्या झाडांस्नी पेकाट आन् फरच अडकावल्यालं . आकशी मटान खावून खावून जत्रा इकाळली होती .
सांच्याला ओक ऐकायला बासंगं गेलो . ते दोन म्हातारे ओकाळे होते . त्यातला जरा कमी म्हातारा व्हता त्यो उठला आन् त्यानं निकाल सांगितला . ‘ जितराब ज्याच्या त्याच्या दावनीला बांधलं पायजे . पर लुणी पाघाळलंय . येणा झालाय .४ ° पाना फुटलाय . आता पुन्नाप्पाला खन्नी द्यावी . पुन्नाप्पानं याज आन् मुद्दल दोनी पंचान्ला द्यावं . तशी रीत हाय . जनावर ज्याच्या मागं जाईल , त्यानं दुसऱ्याची खन्नी द्यावी . सुला २ मामाला द्यावा . त्यो हितल्या हिथं . सारा पैका जनावर ज्याच्या दावनीला बांधलंय , त्यानं द्यावा . बाईची चूक न्हाय . त्ये मुकं जनावर , चालवलं तसंचाललं . पायातली व्हान पायात ठिवावी , पर त्ये पुन्नाप्पाला जमलं न्हाय . धर्मानं , रीतीनं केलंय .
निकाल लागला व्हता . बा खुशीत व्हता . आता शे – पाचशे पंचान्ला मिळणार व्हते . त्याची दारू होनार व्हती . त्याला तिदळकी म्हणत्यात . जतरंतल्या म्होरक्यांची मजा चालू होती . न्यायनिवाडा झाला होता . अन्यायाचा प्रश्नच कुणी काढला नाही . हिकडं न्याय चालला व्हुता आन् तिकडं देवळात आरती सुरू झाली व्हती .
जत्रंची शेवटची रात , डोळ्यांवर उजाडायची . कैकाड्यांच्या बैंडाच्या चुरशी व्हत्या . सारी सनंगं आन् बाजे घेऊन बसले व्हते . पंच देवळाम्होरल्या वडाच्या पारावर बसले व्हते . सात – आठ वाजे जमले होते . पुसेगावकर जयसिंग , फलटणकर लालब , निरगुडकर सदबा , सांगलीकर दतुबा साऱ्यांचं बाजे उभे होते . पुसेगावच्या जयसिंगानं एक चीज वाजवली . तीच चीज बाकीच्यानं वाजवायची . ज्याला येणार न्हाय , त्यानं मागं सरायचं . सुरुवात झाली . गडी बिंबीच्या देठापास्नं कसब पनाला लावत व्हते . आतापतुर पुसेगावकराला जोड नव्हती . आवंदा नारळ कुणाला मिळणार ? मंडळी गप बसून ऐकत व्हुती . चिजंमागनं चिजा निघत व्हुत्या . सांगवीचा दतुबा आवंदा तयारीनं आला व्हता . त्यानं कसब लावलं व्हतं . पुसेगावकराची आन् सांगवीकराची टक्कर झाली . सांगवीकरांच्या ढोल्याला एका चिजंचा ठेका समजेना . दतू वैतागला . झपतालाचा ठेका धर म्हनून दतू सांगायचा . ढोल्या ठेका बराबर धरायचा . पण तालात उठायचा पण न्हाय . आन् सारं फसलं . पुसेगावकराला नारळ मिळाला .
बेंडाचा खेळ झाला . कोलाट्याच्या तारंवरल्या उड्या झाल्या . आन् रातचा तमाशा होनार म्हणून मंडळी उठली . रातचा छबिना निघाला . पालखी बिराडावरनं गेली , तशी जत्रा फुटली . तमाशाला थांबली . सकाळी नाऱ्याळ फुटलं . गोळ्यांनी नारळाच्या कवचांची पोती भरली . गाढवाचं तांडं आलं , तसं दाही दिशा उधाळलं . पुढच्या वर्षी येण्यासाठी . बिन भिकार आईच्या दर्शनासाठी येत्यात . आई त्यांचं रक्षान करती. भूतखेत , हाडळ , मुंजा काय काय कुनाचं चालू देत न्हाय. लोकांची मसनवाट , लोकांची हागनदारी तिथं ह्यांची वतनदारी. रानोमाळ पायात भिंगरी बांदून पोटाला मिळतं , तिकडं जावं लागतं . आई टोपल्यातनी बरोबरच असती . वरसातनं एकदा ‘ देवीला भेट ‘ लागतीच . न्हाईतर बोराटीचा चिप लागायचा . बा – आई रंगात आली की असंच काहीसं सांगायचे . मी ऐकायचो. मनातनं देवाला टरकून असायचो . आई बाहेरची झाली , की नागडा फिरायचो . इटाळ व्हईल , म्हणून . देवाचं भ्या वाटायचं.
चैतीची जत्रा संपली . घरात दाण्यांचं सूप वाजलेलं असायचं .४४ बा पाटीलकी करीत हिंडायचा . बेंडाच्या ताफ्याची जुळवाजुळव करीत बसायचा . आमचा घरचाच बाजा . बा पडघम वाजवायचा . आपा कारनेट , तात्या कलाट , मी घुगऱ्या . चार मानसं बाहेरची लागायची आन् त्यासाठीच बा फिरत व्हुता . दतूचा ल्योक आन् दतू . दतूला दीड वाटणी , त्यो लई कसबी म्हनून . मला चार आनं . दतूच्या पोराला , इठल्याला चार आनं , बाकीच्यानला एक वाटणी . बाजा जमला . सुपाऱ्या इयाला लागल्या . पंचीसपासनं पन्नासपातूर . तितीला लई लग्नं असली , तीत जोरात आसली , की भाव वाढायचा . तीत नरम असली , की जेवनावारी लाळ घोटायची .
घरात दानं नाहीत . घरच्या पाट्या – टोपल्याला गि – हाईक न्हाय . आई किडूकमिडूक वळायची . इकायला सासकाल , भाडली , सोनवडी , चिरकवाडी , दूधबायपतुर जायची . उनानं रान असं तापायचं , की पायाला टरारा फोड यायचे. आई सांची त्याला त्याल लावायची . जीवाची दिवसभर उलघाल व्हायची . पन करंजांचं न्हाय, तर निळूबीचं, तरवाडाचं, कशाचं तरी फोक आनायची. बा कशाला हात लावायचा न्हाय . नुसतं सुपाऱ्या किती घेतल्या … इसा किती आला , वाटायचा कसा , यातच घुटमाळायचा .
एकदा आईसंग इकायला गेलो . सासकल आमचं गाव म्हणजे आमच्या बैत्याचं . त्या गावाला दुसऱ्या कंच्या कैकाड्यानं जायाचं न्हाई . अशी गावं कैकाड्यांनी वाटून…
क्रमशः
स्रोत:(पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या उपरा पुस्तकातुन)
