विखे पिता-पुत्रांची कांदा प्रश्नी अमित शहांची भेट, भेटीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती..

दिनांक १६ फेब्रुवारी २०२४, अहमदनगर:

राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. अब की बार चारसौ पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच खा.सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. पुन्हा खा.विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहांची भेट घेतली असून, ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे. तसेच यावेळी शहा यांनी विखे पितापुत्रां सोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते.

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे. कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यात नगर, नाशिक, पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो, अशात निर्यात बंदीचा फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत यावर चर्चा झाली.

यावेळी अमितभाई शाह यांनी लवकरात लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेईल, यावर लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल असे शाह यांनी मंत्री विखे आणि खा.विखे यांना आश्वासीत केले आहे.

दरम्यान या भेटी वेळी शहा यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याची माहिती समजते. तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा नसल्याने इच्छुकांच्या चुळबुळी सुरूच असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे. अशात खा.सुजय विखेंच्या पक्षाचे महत्वपूर्ण नेतृत्व असलेल्या अमित शहांसोबत सातत्याने भेटी होत असून आज गुरुवारी खा.विखेंच्या सोबतच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहा यांची भेट घेत कांदा प्रश्नासह राज्यातील विविध विषयांवर तसेच राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading