दिनांक १६ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:
बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत सुमारे ३७ गावे असून या पोलीस ठाणेची हद्द पश्चिमेला शिरूर जवळील घोड नदीपर्यंत आहे. पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून अनेकांचे प्रपंच उध्वस्त होताना दिसत आहेत. परंतु बेलवंडी पोलीस जाणीवपूर्वक या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. पोलीस ठाण्यापासून ५०० मीटरवर जुगार, मटका, हातभट्टी चालू असून, हे धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत ? असा सवाल सर्वसामान्य जनता करीत आहे.
हद्दीत अवैध धंदे जोमाने चालू असून त्यात मटका, बिंगो, जुगार, हातभट्टी, हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री सर्रासपणे चालू असताना आता वेश्या व्यवसायने देखील डोके वर काढले असून, या धंद्यांना बेलवंडी पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचे नागरीक उघडपणे चर्चा करीत आहेत.
बेलवंडी पोलीस ठाणे परिसरात अवैध धंदेवाल्यांची उठबस सध्या वाढली असून याचे नेमके कारण काय? हे अजून समजेना झाले आहे. काही एजंट तडजोडी साठी गावोगावी तयार असून एखादी घटना त्यांच्या मार्फत आर्थिक ताडजोड करून मिटवली जाते. अशीही माहिती मिळाली आहे. काही बिट अमलदारांचे ठराविक पंटर तडजोडी करण्यात माहीर आहेत. त्यांचा वावर पोलीस ठाणे परिसरात वाढला असल्याचे नागरिक बोलत आहेत.
तरुण पिढी दारूच्या आहारी जात असून मटका, जुगारकडे तरुणांचा कल वाढत चालला आहे. घरगुती कलह वाद, वाढून विकोपाला जात आहेत. अनेकांचे प्रपंच उध्वस्त होत आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
राजापूर बिट अंमलदार या भागातील स्थानिक असल्याने यांची या भागात मोठी चलती असल्याने गेल्या ६ वर्षांपासून ते याच बिटात ठाण मांडून आहेत. आर्थिक मलिदा याच बिटातून जास्त मिळत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. मध्यंतरी एका आरोपिसोबत वाढदिवस साजरा करताना फोटो विविध दैनिकात छापून आले होते. त्यावेळी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, अद्याप कुठलीही कारवाई या बिट अमलदारावर झाली नसल्याने पोलीस निरीक्षक पाठीशी घालत आहेत का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
एसपी साहेब अवैध धंद्यावर कारवाई कधी.?
तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत विविध प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू झाल्याने नागरिकांनी बेलवंडी पोलिसांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीसह श्रीगोंदा तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाईसाठी धडक मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
स्रोत:(मिळालेली माहिती)
