भाऊसाहेब तळेकर
एकुलते एक असलेले भाऊसाहेब मारूती तळेकर यांनी लहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसले . दुस – याचे कपडे घालून कोळगावातील कोळाईदेवी विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मनात देशसेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने आपोआपच भाऊसाहेब यांची पावले सैन्यदलाकडे वळाली. भरतीसाठी बेळगाव गाठले. १९ फेब्रुवारी १९९७ रोजी सैन्यदलात भरती झाले. कारगील युद्धातील रक्षक ऑपरेशनमध्ये देशासाठी कोळगावच्या भुमीपुत्राने हसत हसत बलिदान दिले.
सैन्याची भूमी असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमधील मारुती व सीताबाई तळेकर यांना चार मुली तर भाऊसाहेब हे एकुलते एक पुत् . चार मुलींनंतर १ जून १९७८ रोजी तळेकर यांच्या घरात पुत्ररत्न झाले. वडिलांनी गावात रोजंदारी केली तर आई सीताबाई यांनी शेतावर मोलमजुरी करून मुलांना शिकविण्यासाठी कष्ट उपसले. भाऊसाहेब हे शाळेत हुशार पण आई वडिलांचे कष्ट पाहून सैन्य दलात भरतीसाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले. बेळगावला सैन्य दलाची भरती निघाली . भाऊसाहेब यांच्यासह मित्रमंडळी रेल्वेने बेळगावला गेले . १९ फेब्रुवारी १९९७ रोजी पहिल्याच प्रयत्नात भाऊसाहेब भरती झाले . बेळगावातच सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. पहिली नियुक्ती काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील नौसेरामध्ये झाली.
राजौरी हा अतिशय थंड हवामान आणि जंगलाने वेढलेला परिसर या भागात अतिरेक्यांनी सहारा घेतला होता उंचच उंच टेकड्या आणि झाडांची गर्द दाटी यामुळे या अतिरेक्यांना शोधणे लष्करासमोर मोठे आव्हान होते. हे आव्हान भाऊसाहेब यांनी पेलले आणि भारतमातेच्या रक्षणाचा श्री गणेशा केला .
१९९९ मधील कारगील युद्ध थांबल्यानंतर पाकिस्तानचे अनेक सैनिक तसेच काही दहशतवाद्यांनी भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या टेकड्यांचा आश्रय घेतला होता. त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्यदलाने रक्षक ऑपरेशन हाती घेतले होते. १ मार्च २००० साली रक्षक ऑपरेशनमध्ये भाऊसाहेब तळेकर हातात मशिनगन घेऊन अतिरेक्यांच्या दिशेने झेपावले होते.पहाडी परिसरात सलग २४ तास अतिरेकी आणि भारतीय सैन्यामध्ये संघर्ष सुरु होता. भाऊसाहेबांनी काही अतिरेक्यांना यमसदनी पाठविले होते. २ मार्च २००० रोजी पहाटेच्या वेळी अतिरेक्यांनी गोळीबार केला . त्यामधील एक गोळी भाऊसाहेब यांच्या डोक्याला लागली आणि भाऊसाहेब युद्धभूमिवर कोसळले. कोळगावला भाऊसाहेब तळेकर शहीद झाल्याची वार्ता आली.
भाऊसाहेब तळेकर एकुलते एक असल्याने घरी निरोप देण्याचे धाडस कोणीच केले नाही. तीन दिवसानंतर भाऊसाहेब यांचे शव लष्कराच्या वाहनातून घरी आले अन एकच आक्रोश झाला. भाऊसाहेब यांचे आई , वडील , बहिणींनी हंबरडा फोडला. लष्करी इतमामात या कोळगावच्या भूमिपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. भाऊसाहेब तळेकर यांचे देहाचा काही भाग अतिरेक्यांनी गायब केला होता. हे प्रकरण त्यावेळी संसदेत गाजले होते आणि याचा बदलाही भारतीय सैनिकांनी त्याच पद्धतीने घेतला .
आधी लगीन बहिणीचे
भाऊसाहेब यांच्या लग्नासाठी घरच्यांनी विचार सुरू केला होता. विवाह निश्चित करण्याच्या हालचाली सुरु होत्या. पण भाऊसाहेब यांनी अगोदर बहीण मीनाचे लग्न आणि नंतर माझे असे घरच्यांना सांगितले. त्यामुळे भाऊसाहेबांच्या लग्नाचा विचार काही दिवस मागे पडला . त्यानंतर काहीच दिवसात आमचा पोटचा एकुलता एक गोळा गेला, अशी आठवण सांगताना वीरमाता सीताबाई यांना हृदयात दाटलेल्या भावना आवरता आल्या नाहीत.
शब्दांकन : अंकुश शिंदे , दिव्यमराठी
(स्रोत:अग्निपंख फौंडेशन)
