अमीन शेख यांच्याकडून चुकीची माहिती; संत शेख महंमद महाराज समाधी प्रकरण स्पष्ट करताना यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील मोटे यांचा आरोप..!

श्रीगोंदा, दि. ३१ ऑगस्ट २०२५:

श्रीगोंद्यातील सदगुरू श्री शेख महंमद महाराज मंदिर प्रांगणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यादरम्यान संतांच्या संजीवन समाधीवर घडलेल्या प्रकाराबाबत अमीन शेख यांनी चुकीची माहिती प्रसारित करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील मोटे यांनी केला आहे.

गोपाळ पाटील मोटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक २९ ऑगस्ट रोजी श्रीगोंद्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत श्री शेख महंमद महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. परंपरेनुसार यात्राउत्सव समितीच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेरा आणि संतांच्या विचाराला अभिप्रेत असलेली चादर अर्पण करण्यात येत असताना अमीन शेख यांनी घाईगडबडीत विचाराशी विसंगत असलेली चादर अर्पण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी समितीच्या सदस्यांनी “आधी आमचा शेरा अर्पण करू द्या, त्यानंतर तुम्ही चादर चढवा” असे सांगितले असता, त्यांनी घाईघाईत चादर अर्पण केली.

पाटील पुढे म्हणाले, “त्या चादरीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हातदेखील लागलेला नव्हता. ती चादर भोजराज मोटे यांनी सन्मानपूर्वक उचलली. मात्र अमीन शेख यांनी या घटनेचे चुकीचे चित्र रंगवून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शेरा समितीच महाराज आणि आईसाहेब यांच्या संजीवन समाधीवर नियमितपणे शेरा अर्पण करते. गुरुवारी होणारे अन्नदानही समितीच्याच वतीने पार पाडले जाते, यात शेख परिवाराचा कोणताही संबंध नाही.”

त्यांनी आणखीही स्पष्ट केले की, “अमीन शेख हे जवळपास पंचवीस-तीस वर्षांनंतर प्रथमच मंदिराच्या गाभाऱ्यात दिसले. समाधीचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक उत्तर बाजूस उभे राहतात. मात्र त्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांना पश्चिम बाजूस उभे राहावे लागले, कारण आजीज शेख आणि त्यांचे बाहेरगावचे नातेवाईक निर्धारित स्थानी उभे राहून सरकत नव्हते. हा उपमुख्यमंत्री पवार यांचा अवमान शेख परिवाराने केला असून भाविकांनी आणि गावकऱ्यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी.”असे प्रसिद्धी पत्रकार स्पष्ट केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading