यवत गावच्या हद्दीत तीन कारचा भीषण अपघात; १० जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक; श्रीगोंद्यातील वाहनाचाही समावेश..

श्रीगोंदा/खुटबाव, ३१ ऑगस्ट २०२५:

पुणे-सोलापूर महामार्गावर यवत (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. तीन कारच्या या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पुण्याकडे जाणारी इनोव्हा कार भुलेश्वर फाट्याजवळ पोहोचली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी कारने महामार्गावरील दुभाजक ओलांडत पुण्याकडून येणाऱ्या स्विफ्ट आणि किया (एमएच १२ डब्ल्यू जे ६०८८) या दोन कारना जोरदार धडक दिली. अपघातानंतर इनोव्हा कारचालक कार घटनास्थळी सोडून पसार झाला.

स्विफ्ट कारचालक शंकर संभाजी सोनवणे (वय २८, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून इनोव्हा चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार सुनील नगरे करीत आहेत.

दरम्यान, यवत गावच्या हद्दीत गेल्या दहा दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे कारने दुभाजक ओलांडत दोन जणांचा जीव घेतला होता. पुन्हा तसाच अपघात घडल्याने महामार्गावरील कमी उंचीच्या दुभाजकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्रोत:(ऑनलाईन माहिती)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading