दिनांक १ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवाळी येथील निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्ते अरुण विठ्ठल जगताप यांची अहिल्यानगर जिल्हा भाजपच्या ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी औपचारिकपणे केली.

भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडताना जगताप यांनी पक्ष संघटनेत योगदान दिले असून यापूर्वी त्यांनी पक्षाच्या चिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्या कामाची पद्धत, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन त्यांना ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडीच्या घोषणेनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जगताप यांचे अभिनंदन केले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, सभापती ना. राम शिंदे, आमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते, तालुकाध्यक्ष डॉ. विक्रम भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अरुण जगताप यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत “बेटी बचाव बेटी पढाओ” या अभियानाला जिल्ह्यात गती देऊन समाजातील मुलींच्या शिक्षण, सुरक्षा आणि प्रगतीसाठी प्रभावी उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.

भाजपच्या या मोहिमेअंतर्गत जिल्हा पातळीवर समाजजागृती कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, महिलांसाठी प्रोत्साहनपर योजना यांना चालना देण्याची कार्ययोजना तयार केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यामुळे टाकळी कडेवाळी गावातील आणि संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून जगताप यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाला नवा उत्साह लाभेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
