दिनांक ८ जून,श्रीगोंदा:
शहराचे महत्वाचे उपनगर असणाऱ्या शिक्षक कॉलनी व शाहू नगरचा रस्ता व्हावा म्हणून, नगरपरिषदे समोर शाहुनगर येथील नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होईल, हे आश्वासन नगरपरिषदेने देण्यात आले होते. त्या आश्वासनाची आज वर्षपूर्ती झाल्याचे स्मरण पत्राद्वारे नागरिकांनी नगरपरिषदेस आठवण करून दिली आहे. या अनोख्या आश्वासनाच्या वर्षपूर्तीची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
या संदर्भात येथील नागरिकांनी(नगराध्यक्षा) शुभांगी मनोहर पोटे, वार्डातील नगरसेवक गणेश भोस व सुनीता संतोष खेतमाळीस यांना निवेदन दिले आहे. आपले मत मांडताना येथील नागरिक म्हणाले, ” १५ ते २० वर्षे पासून येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दाट लोकवस्ती व शहराची ज्या भागात झपाट्याने वाढ होत आहे.तेथेच नगरपरिषदेला प्राथमिक गरजा पूर्ण करता येत नाहीत. हे मोठे दुर्दैव आहे. येथे ड्रेनेज लाइन नाही, रस्ता नाही. अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. परंतु, दखल घ्यायला कोणी तयार नाही. पावसाळ्यात तर येथून चालता सुध्दा येत नाही. येथील नागरिक नगरपरिषदेला पाणी पट्टी, घरपट्टी देत नाही काय ? अजून किती दिवस आपण नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार आहात ? किती मरणयातना देणार आहात ?”
अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या या प्रश्नावर लवकर मार्ग काढावा. नगरपालिकेने या विषयीचा ठराव मागच्या वर्षी केला आहे. जर अडचण येत असेल तर शिक्षक कॉलनी व शाहूनगर दोन सेपरेट एस्टीमेट करून टप्प्या टप्प्या ने काम करावीत. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी दिपक शिंदे, राजेंद्र कळसकर, संभाजी मगर, सुरेश साळवे, गणेश औंरंगे, रासकर डी. डी. आदि उपस्थित होते.
