श्रीगोंद्यात एअर गनच्या स्फोटामुळे युवक गंभीर जखमी..

दिनांक: २ एप्रिल २०२५, श्रीगोंदा

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात वन्यजीव आणि पक्षांना पिकांपासून दूर ठेवण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात PVC एअर गन विकल्या जात आहेत. ही एअर गन केवळ हवेत आवाज करणारी वस्तू नसून यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. नुकतीच कारखाना येथे घडलेली एक घटना याचे प्रत्यंतर देणारी ठरली. या घटनेत एका २२ वर्षीय युवकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी श्रीगोंदा कारखाना येथे घडला.

एअर गनमध्ये कार्बाइड आणि पाण्याचा वापर करून स्फोटाचा मोठा आवाज तयार केला जातो. पीव्हीसी पाईपमध्ये तयार केलेल्या या गनचा आवाज मोठ्या फटाक्यासारखा असतो. यामधून जोरात हवा आणि काही प्रमाणात आगीच्या ज्वाळा बाहेर पडतात.

त्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सावंत यांचे पुतणे ऋतिक हरी सावंत यांनी गनच्या तळाशी असलेल्या लाइटरची स्पार्किंग होते की नाही, हे पाहण्यासाठी पाईपच्या वरती डोळा धरून आत पाहिले. याच वेळी एअर गनचा स्फोट झाला आणि जोराची हवा व त्यातून उत्पन्न होणाऱ्या ज्वाळांनी ऋतिक यांच्या डोळ्याला गंभीर इजा पोहोचवली.

स्थानिक नेत्रतज्ज्ञांकडून प्राथमिक उपचार घेतल्यानंतर, अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना पुण्यातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

एअर गनच्या विक्रीवर निर्बंध आवश्यक

श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर या एअर गनची विक्री होत आहे. अनेक लहान मुले खेळण्याच्या स्वरूपात त्याचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, अशा प्रकारच्या धोकादायक उपकरणांचा वापर टाळावा, यासाठी पालकांनी आपल्या मुलांना योग्य तो इशारा देणे आवश्यक आहे. तसेच, प्रशासनाने यावर तातडीने निर्बंध लावून अशा PVC गनच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात अशा आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading