छत्रपती महाविद्यालयास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ३ राज्यस्तरीय पुरस्कार.. विद्यार्थीमित्र उपक्रम, भौतिक सुविधा, आणि नोकरीच्या संधी यांची दखल..

दिनांक १ एप्रिल २०२५, श्रीगोंदा, अहिल्यानगर:

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राने छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सन २०२४-२५ या वर्षासाठी करिअर कट्टा अंतर्गत तीन राज्यस्तरीय पुरस्कार घोषित केले होते. पुणे येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे दिनांक २९ मार्च २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयास अहमदनगर जिल्ह्यातून ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ म्हणून द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्याचे उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य प्रवर्तक’, तर प्रा. विलास सुद्रिक यांना ‘उत्कृष्ट जिल्हा समन्वयक’ हा सन्मान मिळाला.

१९८२ साली सहकारमहर्षी माजी आमदार स्व. शिवाजीराव नागवडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने महाविद्यालयाची स्थापना केली. अवघ्या ९९ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आज ४२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची उत्तम प्रगती सुरू आहे. ‘नॅक’ मानांकनात ‘A+’ ग्रेड मिळवण्याबरोबरच पुरस्कारांची हॅट्रिक करणे, हे संस्थेच्या गुणवत्तेचे द्योतक आहे.

महाविद्यालयाने पोलीस, वनरक्षक, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४ मध्ये ५० विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी, तर कॅम्पस मुलाखतीद्वारे १४१ विद्यार्थी बँक आणि उद्योग क्षेत्रात निवडले गेले. विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि विविध रोजगार संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड आणि संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

स्व. शिवाजीराव नागवडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल,” अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading