पावसाने बेघर झालेल्या सावंत वस्तीतील १६ कुटुंबांना मीरा शिंदे यांचा मदतीचा हात!

दिनांक २८ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:

अवघ्या दोन-तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे श्रीगोंदा शहरातील पेडगाव रोडवरील सावंत वस्ती येथील १६ कुटुंबांच्या पालांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले. त्यातच कामधंदा नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असतानाच, शिवसेना जिल्हाप्रमुख (अहिल्यानगर) मीरा शिंदे यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना मोठी मदत केली आहे.

२७ सप्टेंबर २०२५ रोजी ही घटना घडली. पावसाचे पाणी पालांमध्ये शिरल्यामुळे कुटुंबांनी कालची रात्र जागून काढली. सकाळी संजय शिंदे यांनी फोन करून परिस्थिती कळवताच मीरा शिंदे यांनी तातडीने वस्तीवर भेट दिली. यावेळी त्यांना लहान मुले उपाशी दिसली आणि घरात स्वयंपाक करण्यासाठी धान्य किंवा चूल पेटवण्यासाठी लाकूडही नसल्याचे विदारक चित्र दिसले.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत मीरा शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत अंदाजे ७ हजार रुपयांचा किराणा आणि ५० किलो तांदूळ घेऊन वस्तीवर पोहोचल्या. या मदतीत त्यांना चौधरी भेळ सेंटरचे मालक, यशवंत पोटे आणि स्वप्नील खेत्रे यांनी सहकार्य केले. तसेच, सुशीलकुमार शिंदे यांनी उपवासाचे काही पदार्थ आणले होते.

नगरसेवक प्रशांत गोरे यांनीही या १६ कुटुंबांना प्रत्येकी ५ किलोच्या आटा बॅग्स दिल्या. तसेच, मीरा शिंदे यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला ३ किलो तांदूळ, २ किलो साखर, १ किलो शेंगदाणे, १ तेलपिशवी, चहा पावडर आणि मीठ यांचा समावेश असलेली किराणा बॅग वाटप करण्यात आली.

या मदतीच्या वेळी भाजपा गटनेते बापूतात्या गोरे, नगरसेवक अंबादास औटी आणि संग्राम घोडके यांनीही सावंत वस्तीला भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

या कठीण परिस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख मीरा शिंदे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलता व तातडीच्या मदतीमुळे १६ गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल वस्तीतील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

स्रोत: (मीरा शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अहिल्यानगर)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading