SC/ST लोकप्रतिनिधी सहाय्य संस्थेचा शुभारंभ, ‘चला आपले लोकप्रतिनिधी समजून घेऊ’ अभियानाचा दौंड येथे प्रारंभ.!

पुणे कराराच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक उपक्रम

दिनांक २८ सप्टेंबर २०२५ श्रीगोंदा/दौंड:

दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी एससी एसटी कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित एससी एसटी जनप्रतिनिधी सहाय्य संस्था या नोंदणीकृत संस्थेचा उद्घाटन समारंभ आणि ‘चला आपले लोकप्रतिनिधी समजून घेऊ या’ या राज्यस्तरीय अभियानाचा प्रारंभ योगराज मंगल कार्यालय, दौंड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.

ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंदन घोडके आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम कांबळे सर यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्राचे अनावरण करून कार्यक्रमाचा समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन राहुल चव्हाण, अध्यक्ष, एससी एसटी कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.

राजकीय आरक्षणाचे महत्त्व आणि ‘पुणे करार’ कार्यक्रमाचे आयोजक राहुल चव्हाण यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी दिनांक २४ सप्टेंबर १९३२ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराचे महत्त्व विशद केले.

चव्हाण यांनी नमूद केले की, आज महाराष्ट्रात याच राजकीय आरक्षणामुळे ५४ आमदार आणि १३ खासदार उपलब्ध आहेत. संसदीय लोकशाहीत ही संख्या अत्यंत महत्त्वाची आहे, जी महाराष्ट्रातील SC, ST समूहाची निर्णायक व लक्षवेधी शक्ती दाखवते.

ते म्हणाले की, कम्युनिटीची ताकद आणि लोकप्रतिनिधींची ताकद एकत्र आल्यास SC, ST कम्युनिटीचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान व सशक्त होऊ शकतो. यासाठी आपले प्रतिनिधी आणि समाजात सकारात्मक संवाद व संपर्क असणे अत्यंत गरजेचे आहे.

राहुल चव्हाण यांनी सांगितले की, या सखोल अभ्यासातूनच ‘एससी एसटी जनप्रतिनिधी सहाय्य संस्थे’ची निर्मिती झाली आहे. पुणे करार दिनाचे औचित्य साधून संस्थेचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. पक्ष, संघटना, जात, धर्म हे बाजूला ठेवून आपण SC, ST आहोत हे आपले नाते आहे, आणि याच नात्यातून कार्यक्रमास जास्तीत जास्त संस्थेने उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

सामाजिक संस्थेच्या रजिस्टर नंबरचे अनावरण
यावेळी, ज्येष्ठ पत्रकार चंदन घोडके यांच्या हस्ते सामाजिक संस्थेच्या रजिस्टर नंबरचे अनावरण करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात विक्रम कांबळे यांनी पुणे करार, कम्युनल अवॉर्ड (जातीय निवाडा), फर्स्ट इंडिया अॅक्ट, गांधीजींचे पुणे येथील विरोधातील आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘डिफरेस्ट क्लास’ संदर्भातील भूमिका आणि स्वतंत्र मतदारसंघ अशा विविध तत्कालीन भूमिका आणि विषयांवर सविस्तर चर्चा केली.

त्यासोबतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा बुद्ध, संत कबीर यांच्या कार्याचा उल्लेख करून संतांच्या वेगवेगळ्या अभंगांचे आणि कबीरांच्या दोह्यांचे संदर्भ देत उपस्थितांना पुणे कराराची माहिती दिली.

या कार्यक्रमास राहुल चव्हाण, आबा वाघमारे, नागसेन धेंडे, सागर उबाळे, राजेश मंथने, संजय आढाव, मनिषा घोडके, ट्रस्टचे पदाधिकारी अक्षय थोरात, गौरव जोगदंड, हेमंत रणदिवे, विलास कांबळे यांसह बहुसंख्य समाज बांधव आणि SC/ST समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading