दिनांक २९ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:
प्रहार दिव्यांग आणि प्रहार संघटनेचे राष्ट्राध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी आज श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहानुभूती व्यक्त केली. शासनाने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांचे हित जपून त्यांचे अश्रू पुसणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत त्यांनी श्रीगोंदा येथील शनी चौकात घेतलेल्या कॉर्नर सभेमध्ये व्यक्त केले.

यावेळी दिव्यांग प्रेरणा संघटना आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बच्चूभाऊ कडू यांचे पुष्पवृष्टी करत आणि पुष्पहार घालून उत्साहाने स्वागत केले.

याप्रसंगी बोलताना बच्चू कडू यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले की, “शासन उद्योगपतींना कर्जमाफी देत असेल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ आल्यावर जर आम्हाला कारणे सांगत असेल, तर आम्ही रस्त्यावर उतरलो आहोतच.” “उद्या मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ येईल,” असा इशारा त्यांनी दिला. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

कडू पुढे म्हणाले की, सततच्या पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली आहे. लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम जर सरकार करत नसेल, तर आपण लोकांनी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडितांच्या वेदना समजून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम करावे, अशी घोषणा त्यांनी केली.

संघटनेच्या आणि बच्चू भाऊंच्या घोषणांनी याप्रसंगी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, विनोद सिंग परदेशी (जिल्हाध्यक्ष), राजेंद्र पोकळे (अध्यक्ष, प्रेरणा अपंग संघटना), ॲड प्रदीप खामगळ, सुरेश गलांडे, वामन भदे (तालुका विधानसभा प्रभारी) आणि प्रहार दिव्यांग संघटना तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रदीप खामगळ यांनी केले.
स्रोत:(आयोजित सभा)
