दिनांक २९ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्या नगर यांच्या वतीने राहुरी येथील लोकनेते रामदास धुमाळ महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्रीगोंदा येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाची कु. सबा फलक मुश्ताक पठाण आणि महादजी शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाची क्रतू कैलास माने या दोन विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

गेल्या महिन्यात महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालयात झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत श्रीगोंद्याच्या १० विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली होती.
यातील सबा फलक आणि क्रतू माने यांनी शनिवारी (दिनांक २७ सप्टेंबर) राहुरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत कौशल्यपूर्ण खेळ करत गुण मिळवले.

या स्पर्धेतून विभागीय स्तरासाठी निवड झालेल्या ५ विद्यार्थिनींमध्ये श्रीगोंद्याच्या या दोन गुणी विद्यार्थिनींनी स्थान मिळवले आहे.

या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वर्षा भोईटे आणि प्रशिक्षक विठ्ठल होले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, कु. सबा फलक ही येथील पत्रकार मुश्ताक पठाण यांची कन्या आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रम पाचपुते, रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, कुंडलिक दरेकर, सुधीर खेडकर, प्राचार्या श्रीमती वर्षा भोईटे, प्राचार्य डी.डी.भुजबळ, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, शीतल राऊत आदींनी कु. सबा फलक पठाण आणि क्रतू माने यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
