दिनांक ३१ मे,श्रीगोंदा :
घोडेगाव तलावावरून उचल पाण्याच्या परवानग्या जलसंपदा खात्याने दिलेल्या आहेत. या तलावा खाली शेतकऱ्यांनी ७०० एकर ऊस केलेला आहे. मात्र, मार्च – एप्रिल २०२० मध्ये झालेल्या आवर्तनाच्या वेळी शेतकरी पाणी पट्टी भरण्यास तयार असतांना,घोडेगात तलावात पाणी सोडले नाही. त्यामुळे सातशे एकर ऊस अडचणीत आला असून, या उसाचे सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. अशी खंत कुकडी कृती समितीचे निमंत्रक प्रा.तुकाराम दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
१४ मार्च ते २५ एप्रिल २०२० अखेर ४२ दिवसांच्या आवर्तानामध्ये १००८ हेक्टर पिक क्षेत्र असणाऱ्या करमाळा तालुक्याला ४७० द.ल.घ.फूट पाणी दिले. १६ हजार ३७० हेक्टर पिक क्षेत्र असणाऱ्या कर्जत तालुक्याला १ हजार ८७ द.ल.घ.फूट आणि १६ हजार ७६९ हेक्टर पिक क्षेत्र असणाऱ्या श्रीगोंदे तालुक्याला ६६४ द.ल.घ.फूट पाणी दिलेले आहे. पिकक्षेत्र प्रमाणाच्या तुलनेत श्रीगोंदा तालुक्याला ५०० द.ल.घ.फूट पाणी कमी मिळालेले आहे. त्यामुळे वितरिका क्रमांक १०,११,१२,१३ व १४ ला पाणी मिळाले नाही. पारगाव, लेंडी नाला, औटेवाडी आणि घोडेगाव तलावाला पाणी मिळाले नाही. घोडेगाव तलाव कोरडा पडला असून, उन्हाळी आवर्तनामध्ये या तलावाला प्राधान्याने पाणी द्यावे, अशी मागणी प्रा.दरेकर यांनी केली आहे.
जून २०२० मध्ये सुटणाऱ्या आवर्तनासाठी ४ टी.एम.सी. पाण्याची तरतूद केलेली असताना, घोड नदीवरील २५ मीना नदीवरील २४ आणि कुकडी नदीवरील १८ असे एकूण ६७ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे कुकडी लाभ क्षेत्रात मोडत नसतांना त्यांना २ टी.एम.सी. पाणी देण्यात आले आहे. त्यामुळे कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाला २ टी.एम.सी. पाणी शिल्लक राहते. एवढ्या पाण्यात १४०० क्युसेक्सने १७ दिवस कालवा चालणार आहे. कालव्याच्या मुखापासून पायथ्यापर्यंत पाणी येण्यासाठी ७ दिवस लागतात आणि ८४७ द.ल.घ.फूट पाणी खर्ची पडते. उरतात १० दिवस आणि ११५३ द.ल.घ.फूट पाणी एवढ्या पाण्यात जलसंपदा विभाग नेमके काय नियोजन करणार आहे ? याचा खुलास त्यांनी करावा. ६ जून ला आवर्तन सुटण्याचा गवगवा फुसका असल्याचा आरोपही प्रा.दरेकर यांनी केला आहे. घोडेगावचे ऊस वाचविण्यासाठी त्या तलावात तातडीने १०० द.ल.घ.फूट पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
