दिनांक २० ऑगस्ट,२०२४,श्रीगोंदा:
शहरात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागले आहेत. वादळी पावसामुळे तारा तुटल्याने शहरातील बालाजी नगर आणि हनुमान नगर परिसरातील नागरिकांना तीन दिवसांपासून अंधारात जीवन जगावे लागले. महावितरणचे सहाय्यक अभियंता कावरे साहेब हे श्रीगोंदा शहराला नियमित वीजपुरवठा देऊ शकत नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महावितरण ऑफिसमध्ये जाऊन अभियंत्यांचा बेशरम वनस्पतीच्या पानांचा हार घालून “सन्मान” केला. त्यांनी प्रशासनाच्या ढिलाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पुढील काळात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रसाद काटे, जिल्हा संघटक गणेश पारे, सागर हिरडे, उपाध्यक्ष नाना शिंदे आणि हनुमान नगर, बालाजी नगर परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक आणि तरुण सहभागी झाले होते. नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





