परंपरागत रुढी परंपरांना फाटा देऊन,सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी संपन्न..
दिनांक २२डिसेंबर(आढळगाव,श्रीगोंदा):
आढळगाव येथे राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या शिक्षक शाखेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे सर यांच्या मातोश्री इंदुबाई कोंडीबा शिंदे यांचा दशक्रिया विधी परंपरागत रुढी परंपरांना फाटा देऊन,सत्यशोधक पद्धतीने पूर्ण करण्यात आला.
यावेळी,शिंदे कुटुंबीयांनी अस्थिविसर्जन कुठल्याही नदीत,ओढ्यातल्या पाण्यात न करता शेतामध्येच खड्डे खोदून त्यात अस्थी टाकून सुमारे १०० चिंच,आंबा, नारळ,वड,पिंपळ अशी झाडे लावून,त्यांची जोपासना करीत आपल्या आईच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा निश्चय केला आहे.या कृतीचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
समाजाला दिशा देण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज आहे.तरच समाज परंपराच्या जोखडातून मुक्त होईल. असे प्रतिपादन प्रवचनामधून बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी केले.
दशक्रिया विधीचे संचलन अखिल भारतीय सत्य शोधक महासभेचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या वेळी बामसेफ या संघटनेला १० हजार रुपये निधी देण्यात आला. सचिन शिंदे यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.
यावेळी नातेवाईक विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयास भाऊ संजय व तीन बहिणी यांनी साथ दिली.