सावित्रीबाईंचे स्त्रि-शिक्षणाचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी: विजय कुलांगे (जिल्हाधिकारी).
दिनांक ५ जानेवारी, श्रीगोंदा:
मुलींना कुटुंबात दुय्यम वागणूक न देता त्यांच्या आरोग्य व शिक्षणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.ती निरोगी वातावरणात शिकली तर संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते हे ओळखून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केले आहे. तेंव्हा त्यांचा केवळ इतिहास न सांगता समाजाने त्याप्रमाणे वागणे गरजेचे आहे असे ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. विजय कुलांगे यांनी सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बोलताना सांगितले.
शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्यांनी शिक्षणातून होणारे संघटन व त्यातूनच अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची ताकद कशी प्राप्त होते हे सांगितले. नगरसेविका सोनालीताई घोडके अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमास माजी नगरसेवक नानासाहेब कोथिंबीरे, हृदय घोडके, आनंद घोडके, सुरज घोडके, किशोर नेटके, अविनाश घोडके, छाया घोडके, सारिका उमाप, अनुराधा ससाणे आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. “बालिका दिना”निमित्त दिवसभर महिला व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी केले. सुत्रसंचलन शारदा शेळके यांनी तर आभारप्रदर्शन मंगल मोटे यांनी केले.