ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला बेड्या..

दिनांक १० जानेवारी,मुंबई :
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला अखेर अटक करण्यात आली. गौरी लंकेश हत्येचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीनं झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातल्या कतरास येथून ऋषिकेशला बेड्या ठोकल्या. ऋषिकेश हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा आहे. तो ओळख बदलून धनबादमध्ये राहत होता. दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता. याची माहिती एसआयटीला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या.
कोण होत्या गौरी लंकेश ?
ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यापैकी 3 गोळ्या त्यांच्या छातीत लागल्या, आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. बंगळुरुतल्या राजराजेश्वरीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading