बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण.
दिनांक १२ जानेवारी,(बेलवंडी)श्रीगोंदा:
दिनांक १० जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजण्याची वेळ,श्रीगोंदा आगाराची’श्रीगोंदा-शिरुर’ही बस शिरुर कडे जात असताना,बेलवंडी शिवारात एका पुलाजवळ बसचा स्टेअरिंग राॅड तुटला.बस पुलावरून पलटी होणार अशा परिस्थितीत चालक विजय कारखिले यांनी प्रसंगावधान दाखविले आणि तात्काळ हॅण्ड ब्रेक लावले.बस मधील साधारण ६५ शाळकरी मुल व प्रवाशांचे अपघात टळल्यामुळे प्राण वाचले आहेत.ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बेलवंडी शिवारातील शिंदे वाडीजवळ घडली.
श्रीगोंदा शिरुर ही बस बेलवंडी-उक्कडगाव-चोभे वस्ती-पिंपरी चौफुला कडे जाणारी शाळकरी मुल मोठ्या प्रमाणावर बसमध्ये बसली होती. रस्त्यात एका पुलाजवळ बस क्रमांक एम.एच. ४० एन.८७४५ या बसचे स्टेअरिंग नादुरुस्त झाले. मोठा अपघात होण्याच्या अगोदर काही क्षण चालक विजय कारखिले यांनी हॅण्ड ब्रेक लावून,बस थांबविली.यामुळे मोठा अनर्थ होता होता वाचला आहे.
श्रीगोंदा बसचे आगार व्यवस्थापक प्रविण शिंदे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.ही बस तपासणीसाठी नगर येथील वर्कशॉप मध्ये पाठविली असून,स्टेअरिंग राॅड का तुटला? याची तपासणी होणार.नंतरच ही बस पुन्हा रस्यावर येणार आहे.असे प्रविण शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
चालकाचा सत्कार
बसचा अपघात होण्यापूर्वीच हॅण्ड ब्रेक लावले.६५ प्रवाशांचा जीव वाचविला,त्याबद्दल बस चालक विजय कारखिले यांचा श्रीगोंदा आगाराच्या वतीने सत्कार करून बस चालक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल धन्यवाद देण्यात आले असून,अधिकाऱ्यांसह सहकारी कर्मचाऱ्यांनीही कारखिले यांचे अभिनंदन केले आहे.