साठोत्तरी कालखंडात मराठी साहित्याची व्याख्या विद्रोही मंडळींनी बदलली. गोलपिठामधून किंवा एकूण समग्र साहित्यातून पिडीत, शोषित, दूर्लक्षित अवहेलित समाजाची जी व्यथा नामदेवने मांडली.ती इतकी अस्सल होती.की,त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही तयार होणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा…
जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही.
जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात.
जिथे दिवस रात्री सुरू होतो.
ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर-
मनगटावरच्या चमेली गजऱ्यात कवळया कलेजीची शिकार उरकून.
शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक
पदोपदी दिसतात.
जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात.
जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.
येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो.
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे.
इथे माण्सालाच माणूस खात असतो आणि वाल्याच्या पाठीवरले वळ.लपविले जातात रे.
अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून. अन्याय अत्याचार सहन करून,हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले. लेखणी मशाल झाली. ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती. त्यामुळे तो ठणकावून म्हणतो..
जिवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांंनी..
खुशाल जगावे…. मी तसा जगणार नाही. या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या. त्या अगतिक झाल्या नाहीत,ज्वलंत झाल्या.
मी तुला शिव्या देतो,तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो,तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो.
तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो.इव्हन मी आईबापांना देखील शिव्या देतो.
बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात.
आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत…
या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे.
ती बेधडकपणे सांगते की-
तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी.
हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे. ‘गोलपिठा’, ‘पाणी’ ही अप्रतिम कविता :
हे छळकर्यांनो…
पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नस्तं जगात..
पाणीटंचाई आली.तर,तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता
मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणारांनी काय बदलावं ?
दलितत्वाच्या जाणिवेतून वर्ण आणि वर्गाची जाणीव होते. वर्ण हे धर्मसत्तेचं आणि वर्ग हे अर्थसत्तेचं वर्तुळ आहे. दलितांना बंदिस्त करणारी ही दोन वास्तवं आहेत. लोकशाहीनं दिलेल्या अभिवचनातून या दोन्ही बंदिवासातून दलित मुक्त होतील.असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष लोटली.तरी तसं काही घडलं नाही. नामदेवची ‘माण्साने’ ही कविता म्हणजे. विद्रोहाचा कळस…
शेटसावकारांची आय झवून टाकावी.
नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा.
जेवणातून विष घालावे मूठ मारावी.
रांडवाडे वाढवावेत:
भाडखाव व्हावे
पण ती पुढे म्हणते –
नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये.
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शुद्र असे हिणवू नये
नाती न मानण्याचा, आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये.
आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे.