मानवी आरोग्य व जमीन सुपीकतेसाठी कडधान्य पिकाची गरज: पद्मनाभ म्हस्के.
दिनांक १० फेब्रुवारी(काष्टी,श्रीगोंदा):
बदलत्या जीवनशैली मुळे मानवी आरोग्य धोक्यात आले असताना,पिकाची फेरपालट न केल्याने दिवसें दिवस जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे.यासाठी कडधान्य पिकाचा आहारात वापर करण्याबरोबरच पिकांच्या फेरपालट मध्ये समावेश करणे गरजेचे आहे. असे(तालुका कृषी अधिकारी)पद्मनाभ म्हस्के यांनी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय कडधान्य दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कृषि चिकित्सालय काष्टी येथे या कार्यक्रमाचे आज सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले.कडधान्य पिकाबाबत जनजागृती म्हणून संपूर्ण देशात १० फेब्रुवारी हा कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो.कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री.आबासाहेब भोरे (मंडळ कृषी अधिकारी बेलवंडी)यांनी उन्हाळी मूग पेरणी या विषयी मार्गदर्शन केले.तसेच कडधान्य पिकाचा आहारात वापर याविषयी किसनराव सांगळे (मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कृषी सहायक मिलिंद भोसले व प्रमोद देवकाते यांनी कडधान्य पिकातील प्रक्रिया उद्योगातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच एकात्मिक कीड नियंत्रण याबाबत आत्माचे नंदकुमार घोडके यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना उन्हाळी मूग बियाणे मिनिकिट चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोदगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर सातपुते यांनी मानले.