दिनांक ६ जुलै कोळगाव/श्रीगोंदा:
तालुक्यातील कोळगाव येथे कोरोनाचा आणखी एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. कोळगाव मध्ये यापूर्वी सात रुग्ण कोरोना बाधित आहेत. पुन्हा एक रुग्णांची भर झाल्याने आता निव्वळ कोळगाव मध्ये ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आठ झाली असल्याची माहिती डॉक्टर नितीन खामकर यांनी माध्यमांना दिली आहे.
नमूद व्यक्ती गाडीवरून पडल्यानंतर त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्याचा उपचार करण्यासाठी नगर येथील एका रुग्णालयात ते दाखल झाले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर पुढील दोन दिवसानंतर तपासणीसाठी गेले असता, त्यांची तेथे कोरोना चाचणी करण्यात आली. तर, ते त्यात कोरोना बाधित आढळले आहेत. सदरील व्यक्ती कोळगाव गावातील महादेव मंदिर परिसराच्या आसपास राहत असून, सध्या अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहे.
तालुक्यात आजपर्यंत १९ रुग्ण आढळून आले असून, यापैकी आठ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. हे सर्वच्या सर्व रुग्ण एकाच गावातील असून, कोळगाव गाव याआधीच प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. शासनाच्या नियमांचे पालन करीत प्रशासनाने दिलेल्या सूचना अवलंबणे गरजेचे आहे. सामान्यांनी भिऊन न जाता आपल्या घरात रहावे असे स्थानिक आरोग्य यंत्रणा सांगत आहे.
स्तोत्र:(तालुका आरोग्य अधिकारी, श्रीगोंदा)
