बलुतं..
स्वत : च्या गावाला पळायचा . तिथं नुकतीच वयात आलेली त्याची बायको त्याची वाट पाहत असायची . परत आला , म्हणजे त्याच्या बायकोच्या कथा – सारं साग्रसंगीत कथन करायचा . कधीकधी त्याचा बाप मुंबईहून यायचा . त्याला नवीन कपडे , मिठाई देऊन जायचा . पुढे कुठल्या तरी वर्षी तुकाराम नापास झालेला . त्याच्या बापानं माझ्याकडे तक्रार केली , “ अरे , हा एकाही परीक्षेत पास झाला नाही … घरी तरी त्याला कुत्रं – मांजर व्हावं की नाही ? ” मुलगा परीक्षेत नापास झाल्यापेक्षा आपल्याला नातू झाला नाही ह्याचंच जादा दुःख त्याच्या चेहऱ्यावर तरळलेलं . बापलेकांचं खूपच हसू यायचं .
सणासुदीला मामाच्या गावी औरंगपूरला जायचो . ते तालुक्याच्या गावापासून दोन मैलांवर होतं . जाताना रस्त्याला दोन्ही बाजूंना वडांची गर्द सावली . रमतगमत जायचो . रस्ता सोडला आणि पांदीनं चालू लागलो म्हणजे भोवताली शेतकऱ्यांचे लगडलेले मळे लागायचे . मोटेच्या चाकाचा कुईकुई आवाज . मध्येच रस्त्यानं तहान लागली , तरी विहिरीवर जाऊन पाणी पिण्याचं धाडस व्हायचं नाही . माझ्या स्वत : च्या गावापेक्षा औरंगपूर मात्र खूपच आवडायचं . सारी घरं ओळीत . महारवाडाही कमालीचा स्वच्छ . हे गाव औरंगजेब बादशहानं पाटलाच्या विधवा सुनेला चोळीबांगडी म्हणून दान दिलेलं , अशा खूप आख्यायिका ऐकायला मिळत . मामाचं घर मात्र तसं खूपच लहान . आत जाताना उंबऱ्याची चौकट लागायची . कौलांच्या खाली किती तरी काळापूर्वी घातलेलं वमान . त्याचे काळपट पुंजके अंगावर पडायचे . मामाच्या घराच्या समोरच त्याच्या मूळच्या घराचे पडलेले अवशेष दिसायचे . हे घर शापित , म्हणून तिथं ते नवं घर बांधीत नाहीत . उलट , ते खोपीसारखं घर पसंत करीत . पडक्या घराबद्दल त्यांच्या घरात खूपच गोष्टी चालत . तिथं भुजंग फिरतोय , हीही अशीच एक गोष्ट . त्या घराच्या खाली मात्र मोठं डबोलं आहे आणि ते तुझ्या आजोबानं ठेवलंय , असं मला नेहमीच सांगितलं जायचं . हे आजोबा म्हणजे म्हणजे माझ्या आईचे वडील . आई लहान असताना ते मरण पावले होते . हे आजोबा दरोडेखोरांच्या , भिल्लांच्या टोळीत होते , त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी खूपच माया जमविली होती , आणि ती त्यांनी त्या समोरच्या पडिक घरात खाली खोलवर पुरलीय , असं मामा – आजी सांगत . रात्री झोपलो म्हणजे फिरणाऱ्या भुजंगाचं स्वप्न पडायचं . आजोबानं लपवलेल्या डबोल्याच्या आकर्षणापेक्षा त्यांन लपवलेल्या बंदुकीचं आणि तलवारींचं खूपच आकर्षण वाटायचं . झोपेत ह्या वस्तू माझ्या हातात यायच्या . बोर्डिंगच्या कोळी मुलांबरोबर तुंबळ युद्ध करतोय , त्यांत आपला जय होतोय , असंच स्वप्न पडायचं .
आजोबा – म्हणजे आईचे चुलते तानाजी – हे मुंबईला गोदीत नोकरीला . हे आम्ही मुंबईला असताना आईला एकदा भेटायला आलेले . वडील त्या वेळी गोदीतच कामाला होते . त्यावेळी नवीन भरतीसाठी बिल्ले मिळत . असाच एक बिल्ला वडिलांनी सासऱ्याला दिलेला . ह्या बिल्ल्यामुळं आजोबांना नोकरी लागली . त्यांच्या नोकरीच्या वेळी मुंबईत एक किस्सा त्यांच्याच संदर्भात झालेला . कामगारांना लवकर ‘ जाथू ‘ करत नसत . त्यांची रिट्रॅचमेंट व्हायची . नेमकी आजोबांची पाळी आलेली . वडिलांनी काय करावं ? त्यांच्या अंगठ्यावर एक मोठी लोखंडी कांव जाणुनबुजून टाकलेली . आजोबांचा अंगठा रक्तबंबाळ होतो . त्यामुळं आजोबा मेडिकल रजेवर जातात . काम करत असताना आपल्याला लागलं , असा बहाणा ते करतात . वडिलांच्या क्लृप्तीमुळं आजोबांची नोकरी वाचली , याचा आजोबा नेहमी अभिमानाने उल्लेख करीत . अर्थात वडिलांना मागं एकदा तुरुंगाच्या कचाट्यातून सोडवलं होतं त्याचे उपकार त्यांनी हे असे फेडले !
आजोबा केव्हा केव्हा मुंबईहून यायचे . त्यांचं सारं लक्ष गावच्या मंडळींकडे . जमिनीत त्यांनी आपलं मुंबईचं सारं उत्पन्न घातलेलं . काळ्याभोर जमिनी विकत घेतलेल्या . सारखे मनीऑर्डरी पाठवायचे . मुंबईला ते काटकसरीत दिवस काढीत . त्यांचं ध्यानही मजेशीर . रंगानं ते खूपच काळे . गुडघ्यापर्यंत धोतर . अंगात बंडी . त्यालाही कधी गुंड्या नाहीत . त्यांची छाती सतत उघडी . डोक्यावर काळी टोपी . गावी एक – दोन दिवसांसाठी आले , म्हणजे सारे चळाचळा कापत . म्हातारपणातही बायको पुढं येत नसे . त्यांचा अंमलच तसा होता . मी मात्र आजोबांची टवाळी करायचो . माझ्यावर ते कधी रागवत नसत . मी त्यांना म्हणायचो , ” बाबा . एवढे कमवतोस मग एखादा वुलनचा कोट का घेत नाहीस ? ” म्हातारा नुसता हसायचा . तंबाखूचं व्यसन सोडून त्यांना कुठलंच व्यसन नव्हतं . मुंबईला निघाला , म्हणजे मुलांच्या हातावर एक आणा ठेवायचा . हेच प्रमाण त्यांच्या लग्न झालेल्या मोठ्या मुलीच्याही बाबतीत . म्हाताऱ्याच्या चिकटपणाची मागे चेष्टा व्हायची .
त्यांच्या आयुष्याचा शेवट फारच शोचनीय झाला . दहा – बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असावी . त्या वेळी मी सायन इथं रेल्वे क्वार्टरमध्ये राहत होतो . तेही पोटभाडोत्री . म्हातारा आमच्याकडे जेवायला होता . सायन इथं बिल्डिंगच्या खालूनच रेल्वे लाईन गेलेली . फेन्सिंग ओलांडून जाणाऱ्या पादचाऱ्यांना तिथं नेहमी अपघात व्हायचा . म्हातारा मला नेहमी सल्ला द्यायचा- ” हे बघ . लांबची वाट पडली तरी चालेल , पण स्टेशनात मधून रूळ ओलांडून जाऊ नकोस . ” मी मान डोलवायचो . म्हाताऱ्याचं जेवण झालं म्हणजे त्याला चहाची तलफ यायची . स्टेशनवर तो रात्री चहा प्यायला जायचा . असाच एका रात्री तो जात असताना धावत्या रेल्वेच्या धुडानं त्याला उडवलं . अपघातस्थळी मी गेलो , तेव्हा रक्ताचा एक टिपूसही नव्हता . नुसत्या धक्क्यानंच म्हाताऱ्याचं सारं काही आटोपलं होतं . मला नियमितपणे रूळ ओलांडून जाऊ नको ‘ असं सांगणारा आजोबा स्वत : मात्र त्या रात्री रूळ ओलांडून गेला !
म्हाताऱ्याचं प्रेत कॉरोनरकडून घेण्यास मलाच जावं लागतं . मीच त्यांचा मुंबईत वारस होतो . पंचनाम्यात म्हाताऱ्याचे कपडे – चंची नोंदवलेली असते . म्हाताऱ्याजवळ काही पैसे असावेत , ह्याचा अंदाज पोलिसांनाही लागला नव्हता . मी रेल्वे पोलीस स्टेशनात चंचीच्या चोरकप्प्यातून काही नोटा काढून दाखवतो , तेव्हा पोलिसही चक्रावून जातात . गावावरून मामा , आजी येईपर्यंत बॉडी ठेवणं तसं गैरसोयीचं होतं . म्हाताऱ्याच्या ओळखीसाठी मला कोल्ड रूममध्ये जावं लागतं . सारा उघड्यानागड्या प्रेतांचा खच पडलेला . त्यात कोल्ड रूममधला तो जीवघेणा वास . क्षणभरही तिथं थांबता यायचं नाही . म्हाताऱ्याची बॉडी ओळखणं तसं अवघड नसतं . म्हाताऱ्याला त्या रात्री मीच अग्नी देतो .
दुसऱ्या दिवशी मामा , आजी येतात . तोवर त्यांचं सर्वच संपलेलं असतं . वडिलांच्या फंड – सर्व्हिसच्या पैशाकरता ते गोदीवर जातात . संध्याकाळी परत येतात , तो त्यांनी खूपच बाजारहाट करून आणलेला . मामाच्या अंगावर नवंकोरं शर्ट झळकत असतं . आजी – मामीकरता नव्या साड्या आणलेल्या असतात . मामा खुलासा करतो- गोदीतल्या कामगारांनी वर्गणी काढून काही पैसे दिले होते . मी हे ऐकून उडालोच . उभं आयुष्य कष्ट करणारा बाप कालच गेला असताना , हा बाजारहाट करणं कसं सुचू शकतं हे माझ्या टाळक्यात बसतच नव्हतं . माणूस हा किती गूढ आहे , हे त्या रात्री माझ्या मनावर खूपच खोलवर बिंबलं . माणसाच्या ह्या वागण्याचा कार्यकारणभाव तरी कोणता , ह्याचा विचार करताना माझ्या मेंदूला शीण आला . म्हाताऱ्यानं मोठ्या कष्टानं मिळवलेली आयुष्याची पुंजी मामांनी एक – दोन वर्षांतच उधळली . मामांना कष्टाची सवय नव्हती . मुंबईच्या मनीऑर्डरीवर दिवस मजेत घालवण्याची सवय लागलेली . दोन – तीन वर्षांनी जमिनीचा एकेक तुकडा मामा विकू लागले . परिस्थितीनं त्यांची दैना दैना केली . आज मामा मुंबईत पोटापुरती मोलमजुरी करीत आहेत . साऱ्या कुटुंबालाच ते मुंबईला घेऊन आले आहेत . त्यात मुलाबाळांचं लेंढार . एका काळी हत्तीसारखे दिसणारे मामा आज उसाच्या चिपाडांसारखे आक्रसून गेले आहेत . त्यांचं दुःख पाहवत नाही.
तर काय सांगत होतो ? हं . औरंगपूरची गोष्ट . मामाच्या घरासमोरच राणूजीचं घर होतं . ह्या घरातली माझी आजी- म्हणजे वडिलांची आई . ह्याच घरात आजीचा जन्म झालेला . आई आणि आजी ह्या एकाच गावच्या . त्यांच्या माहेरचं आडनावही एकच – कसबे . ह्या गोष्टीची मला गंमत वाटायची . राणूजी हा मोठा करारी म्हातारा . गंडमाळांच्या दुखण्यानं बेजार झालेला . पण त्याची जीभ दुखण्यातही तशी खूप तिखट . आमच्यावर मात्र त्याची मायेची पाखर . त्या घरी जाण्याची तीव्र इच्छा व्हायची . तसा राणू खूपच गरीब होता . गवंडीकाम करायचा आणि कच्च्याबच्च्यांना सांभाळायचा . पण मामाच्या आणि राणूआज्याच्या घरातून विस्तव जात नसे . खरं म्हणजे ते घरभाऊ . एकाच कुटुंबातून वंशवेल वाढलेला . आता वेगवेगळ्या फांद्या ; पण त्यांच्यातलं वैर शिगेला पोहोचलेलं .
राणू आज्याचा एक नातेवाईक विठ्याला राहणारा . हा जागती जोत भगत आहे , तो मुठीनं माणसं मारतो , आमच्या घरावर करणी करतो , ह्या भयगंडानं मामाच्या घरातील सारेच पछाडलेले . मामाच्या वाशेरे ह्या गावची सासू होती . तिला मूलबाळ काही झालं नाही . मामीला मात्र पुढं बरीच मुलं झाली . पण तिचा गर्भ दुपावतो ह्याला विठ्याचा भगतच कारणीभूत , हा मामाच्या सासून सर्वांचा गैरसमज करून दिलेला . मामाच्या सासूच्या अंगात देवी यायची . रात्र झाली , जेवणखाण आटोपलं . म्हणजे मामाच्या सासूच्या अंगात यायचं . कपाळावर लालभडक चांदीच्या रुपयाएवढं कुंकू ; केस सोडलेली ही गोरीपान बाई जेव्हा रात्रीची घुमू लागे , तेव्हा माझ्याही जिवाचा थरकाप व्हायचा . तिच्यापुढं रिंगण भर , कोंबडं उतर , तीन वाटेवर जाऊन उतारा टाक , हा प्रकार सतत चालायचा .
अशीच एक पावसाळी रात्र आठवतेय . बाहेर धुवांधार पाऊस कोसळत असतो . विजा कडाडत असतात . डोळ्यात बोट घातलं तरी बाहेरच्या अंधारात दिसत नसतं . त्या रात्री विठ्याच्या भगताकडून मूठ येणार , म्हणून देवीनं जाहीर केलेलं असतं . सारं घर संचित . मूठ असते तरी कशी , ह्या भावनेनं मीही जागा . जीव मुठीत घेऊन बसलेला . आता मूठ येईल आणि घरातील कुणाही माणसाला रक्ताच्या गुळण्या पडतील , या भीतीनं सारेच गारठलेले . केव्हा झोप लागते ते कळत नाही . पहाटे उठून बघतो , तो घराची समोरची भिंत कोसळलेली . देवीमुळंच मूठ कुणाला लागली नाही , भिंतीवर बला गेली , म्हणून साऱ्यांनी श्वास सोडलेला . मुठीमुळं भिंत पडली की बाहेरच्या धुवाधार पावसामुळं , हे माझ्या बालमनाला कोडं पडलेलं . लिंबाला टाचण्या टोचलेल्या असं टाचण्या टोचलेलं लिंबू हवेतून भिरभिरत येतं आणि माणसाचा प्राण घेतं …. हा प्रकार पुढं पुढं मला हास्यास्पद वाटू लागतो .
मामाच्या घराच्या अगदी उलट राणूआज्याच्या घरातील मानसिकता . राणूजी हा तालुक्यातील बोलका माणूस . जाहीर सभेत हा मधूनच प्रेक्षकांतून उठे आणि भल्याभल्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असे . आंबेडकरी चळवळीत तालुक्यात हिरीरीनं भाग घ्यायचा . ह्यामुळे असेल कदाचित ; पण आपल्या मुलांना शिकवावं ही जिद्द त्याच्यात होती . त्यानं आपल्या मुलाचं नाव रावसाहेब ठेवलेलं . हाच रावसाहेब कसबे म्हणून पुढं नावारूपाला आलेला विचारवंत . नकळत त्यानं आपल्या वडिलांचा हा गुण उचललेला . सध्या संगमनेर कॉलेजात हा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे . राणूजीच्या घरात वंशपरंपरेनं चालत आलेलं देवीचं ठाणं . घरात कुणी देवीला पुजत नव्हतं , पण सणासुदीला गावातील मराठा स्त्रीपुरुष महारवाड्यात देवीच्या पूजेला यायचे . देवीपुढं पाटीभर नैवेद्य जमत . रावसाहेबाचा लहानपणचा मजेदार किस्सा आठवतोय . हा त्यावेळी तालुक्याच्या गावी शाळेत जायचा . ह्या वेळी त्याच्या अंगभर …
क्रमशः
स्रोत:(दया पवार यांच्या बलुतं या आत्मचरित्रातुन)
