बलुतं..
हि भीती आपल्याला कुणी दिली ? एखादं रस्त्यात सरपटणारं जिवाणू असावं आणि येताजाता पोरांनी त्याला काठीनं डिवचावं , जिवाणूनं साधा फूत्कारही टाकू नये , असं आयुष्य होतं . कधीकधी वाटायचं , घासभर गोळ्यासाठी आपण किती लाचार ! स्वत : च्या हिमतीवर का बरं शिकलो नाही ? हातात ताट आणि तांब्या घेऊन मी हॉलबाहेर पडत असे , तेव्हा जन्मठेपेची सजा भोगत असलेल्या कैद्यासारखं वाटायचं … पायात लोखंडी साखळदंड आहेत . साखळदंडाचा खुळम् खुळम् आवाज होतोय … दूरवर बघायचो . निळभोर , भव्य आकाश पसरलेल दिसायचं . वाटायचं , खरंच का कधीकाळी आपल्याला ह्या आकाशात स्वैर उंच भरारी मारता यायची नाही ?
वसतिगृहात दर शनिवारी मारुतीच स्तोत्र व्हायचं . सोबत भजन . ‘ वैष्णव जन तो तेणे कहिये , पर पीडा जो जाणे रे ‘ हे गांधीजींचं आवडतं भजन तिथंच प्रथम ऐकलं . माझा आवाज तसा चांगला . एकांतात असलो , म्हणजे मनसोक्त गायचो . वसतिगृहात भजनं म्हणायला मी सर्वांच्या पुढं . बाकीची कोळ्यांची मुलं मागून साथ करीत . प्रसाद वाटताना प्रसादाचं खोवऱ्याचं ताट मात्र माझ्या हाती केव्हाच दिलं जायचं नाही . हा अपमान थुंकी गिळतात तसा गिळून टाकायचो . अशा वेळी हमखास महारोगानं सडलेल्या गावच्या हरीच्या बापाची आठवण यायची . मी माझ्याच हाताकडे पाहायचो . आपल्या हाताला रक्तपिती तर फुटली नाही ना ? जोरात किंचाळावंसं वाटायचं . तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात तो हाच काय ? ‘ गावची गुरे वळली असती , असल्या इंगळ्या डसल्या नसत्या . खरंच , कशाला झाली पुस्तकांशी ओळख ? बरा ओहोळाचा गोटा … ‘ त्यावेळी थोडं फार असंच वाटत होतं .

ह्या जखमेवर थोडीशी फुकर मिळाली , ती खरात पाळक यांच्यामुळे . हे एक ख्रिस्ती धर्माचे प्रचारक होते . गोरेपान . त्यांच्या चेहऱ्यावर सतत स्मित . मोठं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं . बहुधा एका काळचे ते महार असावेत . कारण महारी भाषेतल्या अनेक लकबा त्यांच्या बोलण्यात डोकावत . प्रॉटेस्टंट असल्यामुळे फादरसारखा त्यांना झगा घालावा लागत नसे . संसार थाटूनच ते धर्मकार्य करीत असत . नदीकाठी एका टेकडीवर त्यांच्या राहत्या घरापाशी एक छोटं चर्च होतं . तिथं ते छान आवाजात प्रभूची भजनं म्हणत ; पेटी वाजवीत , का कुणास ठाऊक , पण वाकडी वाट करून ते वसतिगृहावर मला येऊन भेटत . खूपच आपुलकीनं वागत . हा अनुभव मला नवा होता . त्यांच्याबरोबर एकदा – दोनदा चर्चमध्येही गेलो होतो . पुढे जेव्हा संगमनेरला शिकायला गेलो , तेव्हाही त्यांची भेट होत असे . हिंदू धर्माबद्दल , आठवतं , तसं कधीच प्रेम नव्हतं . ह्या धर्मात हा भेदभाव दिसायचा नाही . खरातांनी मात्र आपल्याला केव्हाच ‘ धर्म सोड ‘ असे सांगितलं नव्हतं . त्यामुळं असेल कदाचित , पण त्यांच्या धर्माबद्दल आपल्या मनात ओलावा निर्माण झाला होता . आज विचार करतोय , खरंच , का बर आपण खिस्ती झालो नाही ? नाही तर ज्या जिल्ह्यात मी होतो , तिथं तर जवळ जवळ फार मोठ्या संख्येनं अस्पृश्य मंडळी खिश्चन झालेली . आपल्या तालुक्यात मात्र कुणीच खिश्चन झालं नव्हतं .
ह्या संदर्भात माझ्याच गावची महारवाड्यातील एक घटना आठवते . तुला उमाआज्याबद्दल सांगितलं ना ? त्याचा बाप कडू ह्या नावाचा होता , अर्थात तो मी पाहणं शक्य नव्हतं . पण कडूबद्दल महारवाड्यातील म्हातारी मंडळी अनेक गमतीदार गोष्टी सांगत . हा कडू उंचीनं अवघा तीन फूट , फेटा बांधायचा . मिश्यांचे आकडे वळलेले . वाजंत्र्यांच्या ताप्यात तो संबळ फारच छान वाजवी . संबळ वाजवीत असला , म्हणजे गावोगाव त्याला पाहण्यास गर्दी व्हायची . एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना एकादा वाजंत्री त्याला सहज खांद्यावर घेऊन जायचा . त्याचाच मुलगा उमा . कडूची बायको मात्र खूपच धिप्पाड , उंच धडंग – एखाद्या पठाणासारखी . ही म्हातारी मात्र मी पाहिलेली . ह्या दोघांचा संसार कसा चालत असेल , हा सर्वांनाच सतावणारा प्रश्न . हा कडू एकदा नातेवाइकांना भेटायला मुंबईला गेला . तिथं चर्चमध्ये जाऊन त्यानं बाप्तिस्मा घेतला , ही बोंब गावापर्यंत आलेली . त्याचं म्हणणं असं की , “ मी फक्त पाव खाल्ला . ” झालं . भोवतालच्या चाळीस गावच्या महार मंडळींनी कडूला स्वतः शिक्षा देण्याऐवजी आमच्या गावावर म्हणजे महारवाड्यावर बहिष्कार टाकला . ही त्या वेळची रीतच होती . हुक्का , गुडगुडी , सोयरीक – संबंध बंद केले . समाजापाशी हे फार मोठं हत्यार होतं . कडूमुळे आपल्या गावावर ही विटंबना आली , म्हणून आमच्या गावातील महार मंडळींनी एका समारंभात चाळीस गावाचे मेहेत्तर जमले हे पाहून त्यांच्यापुढे पदर पसरला . त्यांना प्रायश्चित्त म्हणून तोंडात निंबाचं पान घ्यावं लागलं . कडूचा गुन्हा महारांनी पदरात घेतला . दंड म्हणून चाळीस गावच्या महारांना भंडारा घालण्याचं मान्य केलं . गावचा भंडारा म्हणजे सर्वांना गुळवणी – पुऱ्यांच जेवण देणं . हा भंडारा कसा साऱ्या परगण्यात गाजला , त्याचे अनेक किस्से जावजीबुवा रंगात आला म्हणजे मला कथन करायचा .
मला वाटतं , ह्या गोष्टींचाही माझ्यावर बालवयातच खोलवर परिणाम झाला असावा आणि त्यामुळंच पुढे पुढे मी खरातांना टाळू लागलो .
वसतिगृहावर जेवणाची मात्र चंगळ होती . अर्थात , एवढं चांगलं जेवण प्रथमच आयुष्यात मिळत होतं , म्हणूनच चंगळ समजायची . आठ – पंधरा दिवसांनी फीस्ट असायची . फीस्ट म्हणजे नुसता आनंद . लाडू किंवा जिलेबीचं जेवण मिळायचं . मटण मात्र वसतिगृहात मिळायचं नाही . फीस्टच्या वेळी हमखास आई – बहिणींची आठवण व्हायची . आपण इथं मिष्टान्न जेवण जेवत आहोत ; घरी मात्र आई – बहिणी वाळलेले भाकरीचे तुकडे चहाबरोबर खात असतील . कालवाकालव व्हायची . बहिणीसाठी एखादा लाडू तांब्यात लपवून ठेवावा असं खूपदा वाटायचं , पण धाडस व्हायचं नाही . फट म्हणता चोरीचा आळ यायचा . पेटी , दप्तर घेऊन घरी जावं लागायचं . आई केव्हा केव्हा वसतिगृहात मोळी विकायला घेऊन यायची . सर्व मुलांसमक्ष मी आईशी बोलत नसे . आई मोळी विकून गेली म्हणजे दूरवर तिच्या मागे पळत जात असे . तिच्याशी चोरून बोलत असे . हे सारं सांगताना मात्र माझी मलाच लाज वाटते . शिक्षणामुळं खरंच का अशी नाळ तुटली जाते ?
वसतिगृहाचा कारभार मात्र चोख होता . लोकल बोर्डाकडून प्रत्येक मुलापाठीमागे बारा रुपये मासिक ग्रँट यायची . बाजारहाट आम्हीच करत असू . व्हाउचर सुपरिटेंडंटकडे देत असू . वर्षाकाठी काही शिल्लक आमच्या नावे उरायची , ती आम्हाला परत दिली जायची . आजच्या जवळजवळ सर्वच वसतिगृहांतून ही पद्धत बंद झालेली . सरकारी पैशाला किती ठिकाणी गळती लागते , हे आजचे संचालकच जाणोत .
त्या काळात वसतिगृहात आम्हांला सक्तीनं खादी विणावी लागे . टकळ्यांवर सकाळ – संध्याकाळ सूत कातावं लागे . ठराविक पेळू कातून झाले नाहीत तर जेवण बंद . ह्याच कपड्यांतून आम्हाला खादीचा पायजामा आणि सदराही मिळे . वसतिगृहात सूतकताई तर शाळेत शेतीकाम . वार्षिक परीक्षेला शेतीकामाचे मार्क असत . शाळेच्या अभ्यासापेक्षा ह्याच कामात आमचा वेळ जायचा . शेतीकाम म्हणजे आम्ही शेतात जाऊन कष्ट करीत होतो , असं काही नाही . शेतावर बाकीचे मजूर मोलानं काम करायचे आम्ही जायचो ते निरीक्षण करायला – झाडाला पानं किती आली आणि फुलं किती ? प्रयोगवहीत त्याचं चित्र काढलं जायचं . शेतीच्या थिअरीसंबंधी ४००-५०० पानांची वही भरलेली . फायनलला मी शेती विषय घेऊन पास झालो . पण पुढे जीवनात सूतकताई काय , शेतकीकाम काय , ह्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही . सारंच ज्ञान अर्धवट .
सायकल चालवणं ते काय , पण हे मात्र जिद्दीनं शिकलो . सायकल भाड्यानं घेण्याकरिता पैसे नसायचे . आठवड्याच्या बाजारात ग्रामपंचायतीच्या पावत्या फाडायचो , कमिशन मिळायचं . गंमत वाटायची . आपले पूर्वज कातडी फाडीत , तर आपण पावत्या ! तसंच पोहणं . बोर्डिंगच्या पाठीमागे प्रवरेला फार मोठा डोह होता . तिथं पाण्याचा रंग काळाभोर . दुपारी हमखास तिथं पोहायला जायचो . गावच्या वरच्या बाजूला हा डोह . पोहताना वाटायचं , आपण इथं आंघोळ केलेली चालते ; पण महारवाड्याचा पाणवठा मात्र सर्वांच्या खाली . आपण आंघोळ केल्यामुळं खालचे सारेच सवर्ण बाटत असतील , नाही ? कोळ्यांची मुलं सरसर डोह पार करायची . आपल्याला मात्र हे कधीच जमलं नाही . काठालाच आपण डुबुक डुबुक करायचो . बराच काळ हा अक्राळविक्राळ जबडा वासलेला डोह अंगाचा थरकाप करायचा . शेवटी नादच सोडला .
नदीवरून एक आठवण उभारून आलीय . नदीच्या वाहत्या पाण्यातून कपड्यात बांधलेलं गाठोडं वाहत चाललेलं . ते सुपात ठेवलेलं . एक मुलगा पाण्यातून सपास हात मारत जातो आणि गाठोडं किनाऱ्याला आणतो . सोडून बघतो . तो मोठ्यान किंचाळतो . आम्ही सारे भोवती जमलेलो . गाठोड्यात नुकतंच जन्माला आलेलं मूल असतं . खरं म्हणजे तो आधुनिक कर्णच . गावात बातमी जाते . घटनास्थळी पोलिस येतात . पंचनामा होतो . नदीच्या वरच्या बाजूला जेवढी घरं असतात , तिथं ‘ कुंती’चा शोध घेतला जातो . शेवटी पिवळी पडलेली एक गोरीपान कुमारिका पकडली जाते . तिची डॉक्टरी तपासणी होते . बाजाररस्ता ते कचेरी अशी तिची धिंड निघालेली . पाठीमागून हुर्यो करणारं पब्लिक . पुढं तिला शिक्षा झाली म्हणतात .
अशा दैनंदिन घटनांचाही मनावर खोल परिणाम व्हायचा . बाकीच्या मुलांच्या मानानं त्या वयातही मी जादा मनस्वी होत चाललेलो . भोवताली घडणाऱ्या व्यवहाराचं आकलन व्हायचं नाही ; पण आपली प्रचंड घुसमट होते आहे हे जाणवायचं . मराठीच्या तासाला खूपच तन्मय होऊन कविता ऐकायचो . खांडगे नावाचे मराठीचे शिक्षक होते . ते कविता शिकवताना देहभान विसरायचे . कविता गोड गळ्यानं गाऊनही दाखवायचे . एखादे वेळी मी भावनाविवश व्हायचो . आतल्या आत हुंदके फुटायचे . टिळकांची ‘ केवढे हे क्रौर्य ? ‘ ही कविता , कुसुमाग्रजांची अहि – नकुल ‘ किंवा ‘ जमीन – आगगाडी ‘ ह्या कविता विशेष आवडायच्या . एकांतात तारसप्तकात गायचो . एकाच वेळी विद्रोह आणि वेदना ह्यांचा मनात कल्लोळ उठायचा . बोर्डिंगमधील भीषण वास्तवात ह्या कविता बहुधा किंचित रिलीफ देत असाव्यात .
बोर्डिंगच्या मुलांना खरा हिसका दाखवला तो तुकाराम शिरकांड्यानं . त्याची शाळेतली पहिली एंट्री आठवते . धोतर , डोक्याला जरीचा पटका , अंगात नवा कोरा कोट , त्यावर हळदीचे डाग तसेच . त्याच वर्षी लग्न झालेले . त्याच्या पेहेरावाकडे पाहूनच वर्गात हास्याची कारंजी उडालेली . बोर्डिंगमधील परवड सांगतो . तो पहिल्याच दिवशी जेवणाच्या हॉलमध्ये जातो , तो कोळ्याच्या मुलांच्या मांडीला मांडी लावून ऐटीत बसतो . बोर्डिंगमध्ये खळबळ उडते . तसा तो हाडापेरानं मजबूत असतो . त्याची नजरच आव्हान देत असते . झालेल्या प्रकाराकडे मी मोठ्या आश्चर्याने पाहतो . तो माझ्याकडे पाहून मिस्किलपणे हसतो . त्या दिवशी तुकाराम बाजी मारतो . मी विचार करू लागतो , खरंच तुकारामासारखं आपल्याला धाडस का बरं झालं नाही ? आपल्या बुळेपणाची लाज वाटते . तुकारामाच्या धारिष्टाची आज संगती लावू शकतो . त्याचे वडील मुंबईला टांकसाळीत कामाला असतात . म्हाताऱ्यानं गावी जमीनजुमला घेऊन ठेवलेला . तुकारामाला बोर्डिंगच्या गोळाभर अन्नाची का बरं मातब्बरी वाटावी । आपल्यासारखा तो काही बाहेर पडला म्हणजे अळीसारखा वळवळणार नव्हता . तुकाराम आपल्या आडनावाचा उल्लेख श्रीखंडे असा करायचा . शिरकांडे हे आडनाव त्याला आवडायचं नाही . त्या नावामुळं आपली जात जाहीर होते , असा त्याचा युक्तिवाद असे .
तुकारामाची सारी गंमत असे . शाळेला आठवड्याची सुट्टी पडली म्हणजे तो..
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)
