कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून रुग्णाच्या उपचारांचा खर्च करणार.
जिल्ह्यातील २० नागरिक आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली.
यात्रा-जत्रा, लग्न समारंभ आणि इतर उत्सवात गर्दी टाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.
दिनांक १५ मार्च,अहमदनगर:
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नगर शहरात एक रुग्ण आढळून आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याला स्वतंत्रपणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचे (हाय रिस्क) सहवासित चार आणि कमी जोखमीचे सहवासित (लो रिस्क) चार नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. याशिवाय, नुकतेच परदेश दौरे करुन आलेल्या आठ नागरिकांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजअखेर, जिल्ह्यातील एकूण २० जण हे देखरेखीखाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, अशा रुग्णांच्या उपचारासाठी येणारा खर्च हा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपयोगात आणला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन केले.
कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
(वृत्तसंस्था)
