दिनांक १५ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगर मतदारसंघातील विधानसभा निवडणूक शिगेला पोहोचली असून, सत्ताधारी कारखानदार घराण्यांची सत्ता व स्थानिक राजकारणातील समीकरणे तापलेली दिसत आहेत. या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाच्या राजकारणाने प्रचार रणांगण गाजत आहे. आश्वासनांचा पाऊस पडत असताना सामाजिक अभिसरणाचे तंत्रही राबवले जात आहे. मात्र, मतदारांनी खरोखरच प्रस्थापितांना नाकारून नव्या नेतृत्वाला संधी दिल्यास मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
श्रीगोंद्यातील सत्ताधारी व धनाढ्य मराठा उमेदवार हे प्रस्थापित राजकारणाचा भाग असले तरी ओबीसी, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समुदायांमध्ये यंदा अण्णासाहेब शेलार या ओबीसी उमेदवाराच्या रूपाने नेतृत्व उभे राहिले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसींच्या हक्कांचे प्रश्न व प्रस्थापितांनी राजकिय वाट्यापासून दुर्लक्षित केलेल्या मागासवर्गीयांमध्ये यामुळे संताप आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात यंदा चार प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत—तीन प्रस्थापित मराठा कारखानदार आणि एक सर्वसामान्य मराठा महीला उमेदवार. मात्र, अण्णासाहेब शेलार यांनी ओबीसी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि गरीब मराठा समाजाला एकत्र जोडले आहे. प्रस्थापितांच्या तुलनेत शेलार हे सामाजिक न्याय व प्रतिनिधित्वासाठी उभे राहिल्यामुळे त्यांना जनतेचा भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.
ओबीसी मतदारांसोबतच नवबौद्ध, मुस्लिम, धनगर, वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांनी अण्णासाहेब शेलार यांच्या मागे खंबीर साथ दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांची छाप आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनांचा पाठिंबा शेलार यांना मोठा आधार ठरत आहे. उद्या श्रीगोंद्यात राम मंदिराजवळील बाजारतळावर होणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात ओबीसी व अन्य दुर्बल घटकांनी यंदा प्रस्तापित, कारखानदार, घराणेशाहीच्या सत्ता-वर्तुळावर फटका देत अण्णासाहेब शेलार यांना निवडून आणण्यासाठी एकवटले असल्याचे जाणवते. अण्णासाहेब शेलार यांच्या उमेदवारीला लोकांचा भरघोस पाठिंबा मिळाल्यास श्रीगोंदा तालुक्यात मोठे परिवर्तन घडेल, अशी आशा वर्तवली जात आहे.
सामान्य मतदार आणि दुर्बल घटकांचे संघटन राजकारणाच्या केंद्रस्थानी येत असल्याने यंदाची निवडणूक सामाजिक समतोल साधण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. अण्णासाहेब शेलार यांचे यश हे श्रीगोंद्यातील ओबीसी, नवबौद्ध व अल्पसंख्यांक समुदायाच्या नव्या राजकीय युगाची नांदी ठरेल, असे राजकीय अभ्यासक सांगत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)




