दिनांक १० मे, (घुगलवडगाव,श्रीगोंदा):
तालुक्यातील घुगलवडगाव गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीत असलेल्या दांगडे यांच्या रेशन धान्य दुकानावर संपूर्ण गावाला जाऊन धान्य आणावे लागत आहे.अनेक दिवसांपासून या रेशन धान्य दुकान चालकाला संपूर्ण गावातील लाभार्थी रेशन दुकान गावात स्थलांतरित करण्याविषयी विनंती करत आहेत. मात्र, ताठर भूमिका व राजकीय वरदहस्त असलेले रेशन दुकान चालक दत्तात्रय दांगडे सर्व गावाच्या भावना डावलत अशा कोरोना महामारी मध्येही मागासवर्गीय, भटके – विमुक्त, वंचित सह गावातील सर्वच ग्रामस्थांना गावापासून तीन किलोमीटर जाऊन धान्य आणावे लागत असल्याने गावातील सर्वांचेच हाल होत आहेत.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जयश्री माळी यांनाही गावात रेशन धान्य दुकान स्थलांतरित करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. एक आठवडा होऊनही यात कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली दिसत नाही. त्याबाबत आज गावचे सरपंच, उपसरपंच सह ग्रामस्थ श्रीगोंदा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात आले होते. तरी, यात काही मार्ग निघाला नाही.

दत्तात्रय दांगडे हे अनेक वर्षापासून घुगलवडगाव गावचे सरपंच होते. त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून, गावातील रेशन धान्य दुकान गावापासून तीन किलोमीटर शेतवस्ती असलेल्या त्यांच्या घरी स्थलांतरित केले आहे. तेंव्हापासून अनेक वेळेस लोक ते धान्य दुकान गावात आनण्याविषयी विनंती करत आहेत. परंतु, दांगडे त्याबाबतीत उदासीन आहेत.
गावामध्ये दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या समाज मंदिरामध्ये अनधिकृत पद्धतीने त्यांनी काही दिवस हे रेशन धान्य दुकान चालवले. आताही तेथे चालवण्याबाबत ते आग्रही आहेत. पण, विद्यमान सरपंच ग्रामपंचायतीचा किंवा आसपास भाडेतत्त्वावर गाळा घेऊन त्या ठिकाणी रेशन धान्य दुकान चालू करण्याची विनंती करत आहेत. तरीही ते दुकान स्थलांतर करण्यास दुजोरा देत नाहीत. अनेक मागासवर्गीय कुटुंब या ठिकाणी असून, त्यांनाही या कोरोना संक्रमण काळात तसेच सर्वांनाच धान्य उपलब्ध करून घेण्यासाठी फार मोठी पायपीट करावी लागत आहे. दुकान चालक दांगडे यांच्या आडमुठेपणामुळे संपूर्ण गाव वेठीला धरले गेले असून, रेशन धान्य दुकान स्थलांतरनांबाबत स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार अर्ज व निवेदन देऊनही यातून मार्ग निघलेला नाही. A village in Shrigonda taluka laying a three kilometer pipeline to bring ration grains.
या बाबत प्रशासनास दिलेल्या निवेदनावर गोपीचंद हिरु दांगडे (चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, घुगलवडगाव), मिलिंद संजय कदम, गौतम सुरेश दांगडे, रोहिदास दांगडे, भाऊसाहेब दांगडे, धनंजय पवार, नामदेव चव्हाण, शांताराम दांगडे, इत्यादींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
स्त्रोत: (निवेदन)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे
