श्रीगोंदा, दि. १७ जून २०२५ –
वाहनांची वाढती संख्या आणि त्यासोबत वाढणारा वेग हा आज रस्त्यावरील अपघातांचा मुख्य कारण ठरत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी शासनाने चांगल्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी या रस्त्यांचा वापर करताना अनेकांना वेगाचा ताबा राहत नाही. याच बेदरकारपणाचा बळी ठरले आहेत बाजीराव लक्ष्मण दांडेकर (वय ७५, रा. गणपती मळा, श्रीगोंदा).

आज दुपारी चारच्या सुमारास श्रीगोंदा-जामखेड रस्त्यावरील घायपातवाडी शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. बाजीराव दांडेकर हे त्यांच्या रोजच्या दिनक्रमानुसार रस्त्यालगत शेळ्या चारत असताना, श्रीगोंद्याकडून आढळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने (MH-16-DM-7088) त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती की दांडेकर हे काही फुटांवर उडून रस्त्यावर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तरटे मेजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला होता. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून, फरार चालकाचा शोध सुरु आहे.

या अपघाताबाबत काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन चारचाकी वाहने एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडला. त्यातच बाजीराव दांडेकर हे दुर्दैवाने धडक लागून मृत्युमुखी पडले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, वेगाची बेफिकिरी आणि वाहतुकीतील नियमांकडे केले जाणारे दुर्लक्ष हे अशा दुर्घटनांमागचे मुख्य कारण असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
