टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, दि. १७ जुन २०२५ –
गावामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर टाकळी लोणार ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण आणि लोकहिताचा निर्णय घेतला आहे. दिनांक २७ मे २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ठराव क्रमांक ७/२ अन्वये संपूर्ण गावात दारूबंदी लागू करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

ग्रामसभेमध्ये चर्चेवेळी उपस्थित ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली की गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर दारू व इतर व्यसनांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद, हिंसाचार, आर्थिक हालाखी आणि सामाजिक विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. विशेषतः अल्पवयीन मुले देखील या वाईट प्रवृत्तींचा बळी ठरत असून, गावाच्या भविष्यासाठी ही स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

अवैध दारू विक्री व त्यामध्ये गुंतलेल्या लोकांवर कारवाई होण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक पावले उचलण्याचे आवाहनही या ठरावातून करण्यात आले आहे.

सदर ठराव सौ. लक्ष्मी मारूती गोडसे यांनी मांडला होता आणि त्याला श्रीमती संजना पोपट हरिहर यांनी अनुमोदन दिले. अखेरीस, उपस्थित सर्व ग्रामस्थांनी ठरावास एकमताने मंजुरी दिली.

आज पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना या ठरावाची प्रत निवेदन स्वरूपात देण्यात आली यावेळी सरपंच अर्चना संतोष दरवडे, उपसरपंच गुलाब भाई शेख, माजी सभापती सुरेश आण्णा सुडगे, मारुती नाना भांडवलकर, राजेंद्र फंड, संदीप काळे, शिवाजी जगदाळे, सर्जेराव कदम, वैशालीताई कदम, सुरेखा कुनगर, रज्जाकभाई शेख, शिवाजी कुनगर, नवनाथ शिंदे, रामदास शिंदे, संदीप कुनगर आणि शितल कानगुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते.

स्रोत:(निवेदन)
