गोरख आळेकर यांना ‘ओबीसी बहुजन पार्टी’चा सक्रीय पाठींबा..

दिनांक ९ मे २०२४, श्रीगोंदा:

दक्षिण अहमदनगर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार गोरख आळेकर यांना ‘ओबीसी बहुजन पार्टी’ने सक्रीय पाठींबा दर्शवला असून, त्याबाबत अधिकृत पत्र संघटनेच्या जबाबदार पदाधिकारी व ‘ओबीसी बहुजन पार्टी’चे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिले आहे.

दिलेल्या पत्रात त्यांनी नमुद केले आहे की, महात्मा जोतिबा फुले, छ. शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठान मानून लोकसंख्येने ८५ टक्के असणाऱ्या ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार, अनु. जाती-जमाती आणि अल्पसंख्यांक वर्गाला राजकीयदृष्ट्या पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे. या समाजातील शोषित, पिडीत, वंचित, दुर्बल घटकाची सर्वांगीण प्रगती व्हावी. या हेतूने ‘ओबीसी बहुजन पक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे.

देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. एकूण १५ लोकसभा मतदारसंघातून ‘ओबीसी बहुजन पार्टी’ने आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी ८ ठिकाणी निवडणूका पार पडलेल्या आहेत.

पुढील टप्प्याची निवडणूक दि.१३ मे रोजी होणार आहे. या टप्प्यात पक्षाने एकूण ५ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी अहमदनगरमधून दिलीप कोंडीबा खेडकर यांची उमेदवारी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली होती. मात्र, दिलीप खेडकर यांनी पक्षाला शेवटच्या क्षणापर्यंत अंधारात ठेवून ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.

त्यांच्या या ओबीसी विरोधी व पक्षविरोधी भूमिकेमुळे आमच्या पक्षाशी त्यांचा कोणताच संबंध राहिलेला नाही. आमची ‘ओबीसी बहुजन पार्टी’ त्यांना दिलेला पाठींबा मागे घेत आहे. दिलीप कोंडीबा खेडकर यांनी कोणत्याही स्वरुपात ‘ओबीसी बहुजन पार्टी’ चे नाव, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची/नेत्यांची नावे अथवा फोटोंचा प्रचारासाठी वापर करू नये. अन्यथा पक्षाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. 

असे स्पष्ट केले असुन, गोरख आळेकर यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की,  अहमदनगर मतदारसंघातून आपण लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवित आहात. आपण ओबीसी चळवळीसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन ‘ओबीसी बहुजन पार्टी’ आपल्याला सक्रीय पाठींबा देत आहे. निश्चितच ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार, अलुतेदार, अनु. जाती-जमाती, अल्पसंख्यांक आपल्याला भरघोष मते देऊन, निवडणूकीत विजयी करतील. त्यासाठी पक्षाच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा.. देण्यात आलेल्या आहेत.

स्रोत:(पाठींबा पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading