स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या ध्येय घेऊन पद्मभुषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याच रयत शिक्षण संस्थेचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आढळगावमध्ये ७ जून १९६५ रोजी सुरु झाले. ग्रामस्थांच्या मदतीने सुरु झालेले विद्यालय आज आदर्श झाले आहे .
७ जून १ ९ ६५ रोजी शंकरशेठ सागरमल गांधी व ग्रामस्थांच्या प्रेरणेने विद्यालय सुरु झाले. बोलगे बंधू यांनी इमारतीसाठी तर गीताबाई झगडे यांनी मैदानासाठी जागा दिली. २८ विद्यार्थी अन दोन शिक्षकांच्या माध्यमातून आढळगावात शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला इमारत नसल्याने शाळा गावातील वाडे, चावडी व गोडावूनमध्ये भरत असे.
ग्रामीण भागातील शिक्षणाशिवाय पर्याय नाही याची जाणीव लोकांना होऊ लागल्याने शिक्षणाकडे ओढा वाढू लागला. आढळगाव, तांदळी, टाकळी, घुगलवडगाव, कोकणगाव, घोडेगाव, चांडगाव, हिरडगाव, भावडी, रूईगव्हाण, बिटकेवाडी या गावातील विद्यार्थी शाळेत दाखल होऊ लागले . विद्यार्थी संख्या वाढू लागल्याने शाखेस मदत करणारे देणगीदार पुढे येऊ लागले. शाळेचा विकास होऊ लागला. शाळेची इमारत उभी राहिली. विद्यालयाने आजपर्यत निकालाची पंरपरा राखली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय झाल्याने जवळपास एक हजार मुले आणि मुली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
बदलत्या जगाबरोबर सर्व शिक्षण क्षेत्रातील बदल स्वीकारत विद्यालयाने २००७ साली सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले. २०१३-१४ मध्ये विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्प राबविण्यात आला. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ लागले. विद्यार्थी अध्ययनामध्ये इंटरनेटचा वापर करू लागले. गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून विविध स्पर्धा परिक्षा, खेळांच्या स्पर्धा, योगा, प्राणायाम, व्यवसाय मार्गदर्शन, व्याख्यानाचे आयोजन करण्यात येऊ लागले. क्षेत्र भेटीच्या माध्यमातून छोट्या – मोठ्या उद्योग व्यवसायांना भेटी देऊन व्यवसाय शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विद्यालयाची गुणवत्ता वाढली. रयत शिक्षण संस्थेमध्ये मानाचा समजला जाणारा कर्मवीर पुरस्कार विद्यालयाला २०१५ – १६ साली प्राप्त झाला. मुलींच्या उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून २०१६ मध्ये विज्ञान शाखेचे ज्युनिअर कॉलेज सुरु झाले. पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला.
विद्यालयाने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमय बनविले आहे. शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, कलाकार अशा क्षेत्रात नावे उंचावली आहेत. डेप्युटी कलेक्टर भाऊसाहेब दांगडे, नारायण सारंगकर, डॉ.अनिल शिंदे तसेच पीएसआय असणारे हंडाळ बंधू, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. विकास सोमवंशी, अँड.संदीप कावरे यांच्यसह अनेक विद्यार्थी विद्यालयाने घडविले.
विद्यालयाने सामाजिक बांधिलकीचा विचार करून सातत्याने सामाजिक कार्यात सहभाग असतो. वृक्षारोपण, जलसाक्षरता, विविध आरोग्य शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना मदत अशा विविध कामात विद्यार्थ्यांचा सातत्याने सहभाग असतो. विद्यालयाचे प्राचार्य संपत पवार, पर्यवेक्षक एल. बी. शिंदे, गुरुकुल प्रकल्प प्रमुख ए. बी. जामदार यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. विद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासाठी परिश्रम घेतात. २०११ साली दहावीचे परीक्षा केंद्र शाळेत सुरु झाले . त्यामुळे बाहेरगावी जाऊन परीक्षा देण्याचा विद्यार्थ्यांचा त्रास कमी झाला.
जालिंदर बोळगे, बापूराव वाकडे, राजू वाकडे, मनेश डोके, हरिश्चंद्र डाळिंबे, संतोष धोत्रे, सतीष वाकडे हे सैन्यदलात कार्यरत आहेत.
विद्यालयातील भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान असते. स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सुभाषलाल शंकरलाल गांधी यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे. २०१७-१८ मध्ये लोकवर्गणीतून बारा लाख रुपये जमा करून संस्थेच्या मदतीने ८४ लाख रुपयांची शाळेची इमारत उभी राहिली. सुभाषलाल शंकरलाल गांधी यांनी एक लाख ११ हजार रुपयांची मदत केली. डॉ.गोपाल बहुरूपी यांनी एक लाख बारा हजार रुपयांचे साहित्य, महेशशेठ शिंदे यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली. या सर्वांचा सहकार्यामुळे आढळगाव सारख्या ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाने आनंददायी विद्यालयात विद्यार्थी आनंदाने स्वावलंबी शिक्षणाचे धडे घेत आहेत.
शब्दांकन : अमोल गव्हाणे, प्रतिनिधी, पुढारी
सर्वांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यालयाचा आलेख उंचावत आहे. शाळेच्या विकासामध्ये सर्वात महत्वाची भुमिका ग्रामस्थांची असते. ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय कोणतेच विद्यालय प्रगती करू शकत नाही. गावातील ग्रामस्थांच्या मदतीने शाळेची घोडदौड सुरु आहे. भविष्यात आणखी प्रकल्प राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. संपत पवार, मुख्याध्यापक.
(प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित केलेल्या वेळेची आहे)
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
