फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग १७).

फकिरा..

परंतु त्या कुमजेत सत्तूचं काहीच उरलं नव्हतं . तो वठल्या वृक्षासारखा झडझडीत होता . बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांज्याच्या व्यसनात कुंकून धूर करून टाकली होती आणि जमिनी विकून त्याचा गांजा ओढीत स्वतःचा धूर कैलासी रवाना केला होता . आज्याच्या कारकीर्दीतील घर आता मोडकळीस आलं होतं . सत्तूला फक्त आई होती . आईशिवाय त्याला आपलं म्हणायला जगात कोणीच नव्हतं .

कुणाचा दळाकांडा करून , तर कुणाची घरं सारवून , कुणाची खळी शिंपून , अशी अनेक कामं करून भोसल्याच्या बणाबाईनं आपल्या सत्तूला जगवला होता . जेव्हा सत्तू शाळेत सातवी शिकत होता , तेव्हा बणाबाई घरोघर जात होती . आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं , सांडगे , पापड मागून आणीत होती . ते सत्तू खात होता आणि वाढत होता . उकिरड्यावर एखादं शाळवाचं ताट पोसावं , तद्वत त्या दारिद्र्याच्या उकिरड्यावर सत्तू पोसला . रूपानं , गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला . कैकांचे डोळे दिपले .

आणि सत्तूचे डोळे उघडले . स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं . आईची दया आली . स्वतःची लाज वाटली . त्यानं सातवीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली . मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात लौकरच आगळा वाटू लागला . त्याची ती बेफाट घोडदौड बघून अधिकारी बावचळले . इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली . कैक तरुण मडमा सत्तूला पाहून जिभल्या चाटू लागल्या . साऱ्या घोडदळात वचक बसली . बंदुकीपासून कुस्तीपर्यंत तो अजोड ठरला .

कुमजेत बणाबाईला सुखाचे दिवस आले . कलंडलेलं घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं . बणाच्या पायाला विश्रांती लाभली . पोरानं शेवटी पांग फेडला , असं गाव म्हणू लागला . कुमजेचं नाव सत्तूचं लष्करात गाजवलं , म्हणून कैकांचे ऊर फुगले . बणाबाईकडे पैशाचा झरा वाहत येऊ लागला .

परंतु लोकरच निराळं घडलं . अधिकाऱ्यांच्या मत्सराला सत्तू कंटाळला . हेकट वर्तनानं चिडला . गुलामाप्रमाणं वागणं त्याला परवडलं नाही . त्याला शिसारी आली आणि एकाच वर्षात तो नोकरी सोडून पुन्हा कुमजेला आला . लष्करात नाव केलं , म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं ; परंतु मथाजी चौघुल्यानं उगीच नाक फुगवलं . तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला ,

” लष्करातनं आला , म्हंजी राजा हूनशान आला काय ? कुंभाराची सून शेवटी कातवरालाच जानार- ” या मथाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला , वरमला ; पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुमजेच्या त्या जीवनात एकरूप झाला . मिळेल तेव्हा विळा – मजुरी करू लागला आणि मजुरी नसेल , तेव्हा हाता कु – हाड घेऊन फिरू लागला .

काही दिवस असेच गेले .

एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता . चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होतं . प्रत्येक वस्तू तप्त झाली होती . नदीच्या पाण्यात मासे काजबारले होते आणि नव्या पालवीनं वारणाकाठ नटला होता . हिरव्या रेशमाची शाल पांघरून बसल्यासारखा वाटत होता . एकूण एक झाड पानाफुलांनी डवरलं होतं . आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत होत्या . जळतं वारं तापलेली धूळ उडवीत पळत होतं . उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती . निःशब्द शांतता नांदत होती . वातावरण भलतंच रागावलं होतं .

सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाएकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली . सारा वारणाकाठ थरथरला . वातावरण अधिकच तंग झालं . सत्तूनं तिकडे धाव घेतली .

एका तरुण , गरोदर महारणीनं मथाजी चौघुल्याचा अपराध केला होता . भर उन्हात येऊन तिनं त्या चढेल माणसाच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि त्याच वेळी तो तिथं आला होता . त्यानं आल्या आल्या त्या महारणीला माराय जुपी केली होती . तो तिला जुमानून लाथा घालीत होता आणि ती उपडी पडून ओरडत होती . काट्यात लोळत होती .

चौघुला दोन हातात दोन जोडे घेऊन तिला मारीत होता . डोकीपासून पायापर्यंत तो दमानं भरीव लाथा मारीत होता . ती निपचित पडली , की तो शांत होत होता आणि तिनं हालचाल करताच पुन्हा भडकून मारीत होता . ती मरत कशी नाही , याचीच जणू त्याला चीड आली होती . मग त्यानं तिच्या कुशीत लाथा मारण्याची खटपट सुरू केली . मग मात्र सत्तूला स्वस्थ राहून पाहणं असह्य झालं . त्यानं चौघुल्याचा हात धरला आणि नम्रपणे म्हटलं ,

” आबा , काय करता हे ? ”

” हिनं माझ्या कुपाची नांगी मोडली – उंडगी ”

मग पुरे झाली की शिक्षा . सोडा आता . ”

” न्हाय ! न्हाय ! मी हिला जिवं मारनार ! तू मागं सर ! ” चौघुला हात सोडवून घेत मान नकारार्थी हलवीत म्हणाला आणि सत्तू म्हणाला ,

” मग कुपासाठी मानूस मारता की काय ? “

” तू नगं सांगू मला . मी जाईन फाशीला ! ”

” चौघुलं , ती गरोदर हाय . चला . ” असं म्हणून सत्तूनं त्याचा हात धरला आणि चौघुला चिडला . त्यानं हिसका मारून सत्तूला दूर लोटलं आणि एकदम खवळून तो ओरडला , ” गुमान जा ! ” तो पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारू लागला . उशीर निपचित पडलेली महारीण हंबरडा फोडून म्हणाली ,

” माझ्या पोटात बाळ हाय . मला मारू नगा . मी मरेन . मी परत हात लावणार न्हाय ऽऽऽ

” महारणीच्या त्या किंचाळीनं सत्तूचं काळीज पेटलं . तोच चौघुला पुढं जाऊन म्हणाला , ” वराडतीस ? मग वरडच तर

सत्तूच्या अंगाची आग झाली . तो चढत्या आवाजात म्हणाला , चौघुलल्या ! ऐकायचं आहे , की नाही ? “

” न्हाय ऐकत ! ” चौघुला हातात जोडा घेऊन गर्रकन परत फिरला . भुवया चढवीत डोळे वटारून तो म्हणाला ,

” मी हिला जिवं मारनार ! ” ‘

आणि मी तुला जिवं मारल्यावर ? ”

मग मार की ! ” हातात जोडा घेऊन चौघुला तावानं पुढं गेला आणि हातातील कु – हाड हवेत उंचावून सत्तू गरजला ,

” चौघुल्या , मर आता ! … ” आणि एकाच दणक्यात चौघुला पांदीला आडवा झाला . मग एकापाठी एक दणके बसत राहिले . कुपाच्या काटक्याप्रमाणं चौघुल्याच्या देहाची खांडोळी झाली . तो कधी मेला , हे सत्तूला समजलंही नाही . मग उशिरानं तो शांत झाला . त्यानं त्या महारणीला उठवून महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी कुमजही सोडली .

सत्तू फरारी झाला . मानवहत्या घडली , याची त्याला मुळीच खंत वाटत नव्हती . उलट , आपण एक नेक कर्म केलं आहे , असं त्याला वाटत होतं . तो आपल्यासारखी पन्नास माणसं जमवून वारणेच्या खोऱ्यात संचार करीत होता .

चौघुल्यासारखा वाह्यात , ताठ माणूस उभा ठेवायचा नाही , असा त्यानं निर्धारच केला आणि त्यांचा निपटावा आरंभला . मी मी म्हणणारांना त्यानं चिरडून काढलं . सावकाराच्या व्याजाच्या वह्या नि गहाणखत जाळून कुळांना मुक्त करीत तो फिरू लागला . त्याच्या दराऱ्यानं वारणेचा किनारा हादरला . नवऱ्यांनी टाकलेल्या मुली त्यांच्या नवऱ्यांना पटवून त्यानं पुन्हा नांदाय लावल्या . त्या कामी ज्यानं कां कू केलं , त्याची वरात काढली . कैकांना एका पायावर उभे राहावयाची शिक्षा दिली . लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावयाची रग जिरवली . कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले . सोन्याचे झाले . या खोऱ्यात एकूण एक मुलगी दिल्या घरी नांदू लागली . भांडखोर नवऱ्यांना सत्तूची हबक बसली . प्रत्येक नांदत्या मुलीला सत्तू देव वाटू लागला .

सत्तू वारणेच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखा मिरवत होता ; परंतु सरकारही निजलं नव्हतं . पाच हजारांची रक्कम सत्तूला पकडून देणाराला इनाम म्हणून जाहीर झाली होती . साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिकटवले होते आणि त्या खोऱ्यातील इरसाल टगे सरकारला मदत करण्यासाठी जिवाचं रान करीत होतं . शिगावचा खोत , बहाद्दूरवाडीचा दादा पाटील आणि मथाजी चौघुल्याचा मुलगा उमाजी चौघुला हे तर नुसते सावलीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करीत होते ; संधीची वाट पाहत होते . टपून होते .

सत्तू निर्भय होता , तो गिरिकंदरात आणि वारणाकाठच्या शेवऱ्यांत फिरत , होता . समोर येऊन हात उगारणारा त्यानं ठेवलाच नव्हता . कुमजेत त्याची फक्त म्हातारी आई होती . जेव्हा त्याला बजाबाईची आठवण होत असे तेव्हा तो सरळ कुमजेला जात होता आणि आपल्या आईला भेटत होता . मग कितीही पहारा असो , कोणीही पाठीवर असो , तो त्याची पर्वाच करीत नव्हता . कुमजेबद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि ज्या माउलीच्या कुशीत आपण जन्म घेतला , तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता . शिवाय त्या भागातील बळी त्याने भुईसपाट केले होते . जे होते , त्यांना तो जुमानीत नव्हता . हां – एक फकिरा मांग सोडला , तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही , अशी त्याची समजूत होती . म्हणूनच तो स्वतः फकिराला भेटत होता . जिवाला जीव देणारा म्हणून त्याचं तो नाव घेत होता . जो बळी होईल , त्याचा पीळ काढावा , असा त्याचा बोल होता . आणि दारिद्र्याच्या साणेवर धैर्याला धार चढते , असा त्याचा दावा होता . शौर्य श्रीमंतीत फुलत नाही , ते गरिबीतही उसळून उठतं , याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता .

परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला एकाएकी आईची आठवण झाली आणि तो कुमजेला निघाला . अगदी निर्भान होऊन निघाला . फक्त बारा माणसं बरोबर होती . आईला कधी पाहीन , असं त्याला . झालं होतं . आईच्या आठवणीनं जुना इतिहास त्याला आठवत होता . सत्तूसाठी जिनं श्रीमंतांची घरं सारवली , त्या माउलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही , अशा निश्चयानं तो निघाला होता .

आपल्या माणसांसह जो जेव्हा नांदगावच्या गावदरीला आला , तेव्हा चंद्र मध्यावर आला होता . पहाटेची चाहूल लागून चराचर सजीव होत होतं . सृष्टीला नवा तजेला येत होता . शुक्राची चांदणी , दिवा जळावी , तशी गगनात दिसत होती . निःशब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते . निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले होते . ढगांच्या अनंतरंगी गालिच्यावरून प्रकाश येत होता . पूर्वेचं क्षितिज हसत होतं . वारा गिरक्या घेत होता . वृक्षांची नम्रता ढळली होती . पाखरं आपले पंख झटकून सज्ज होत होती . जीवनाला हळूच गती मिळाली होती .

गोठ्यांतील बैलांच्या गळ्यांतील चाळ गुणगुणत होते . जाती फिरत होती आणि शेतकरणींची गीतं मंजुळ नाद काढीत होती . बायांच्या गळ्यातून निघालेला धारदार स्वर तलवारीप्रमाणे आरपार जात होता . सत्तू नांदगावच्या पेठेत आला आणि पहिला कोंबडा आरवला . आणि लगेच एका घरातून गीताची ओळ त्याच्या कानावर आली . ती ऐकून तो खटकन थांबला . सर्वजण थांबले . सत्तू कान टवकारून ऐकू लागला . ती बाई म्हणत होती :

नसेल जरी माहेर, भाऊ असावा पाठीचा गरिबांचा वाली , जसा सत्याबा कुमजंचा ।। हे शब्द ऐकून सत्तू गर्रकन फिरला. सारी माणसं गंभीर झाली . त्यांनी निःश्वास रोखून धरले. सत्तू कानात प्राण आणून ऐकू लागला आणि त्या बाईचं:

क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading