दिनांक ४ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. उद्घाटन सोहळा परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांच्या हस्ते आज संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वसंत हंकारे सर, सचिव श्री. प्रतापसिंह बबनराव पाचपुते आणि श्रीगोंदा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. विक्रमसिंह बबनराव पाचपुते उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. अनिल पुंड तसेच सर्व विभागांचे प्राचार्य आणि विद्यार्थी सचिव देखील हजर होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्नेह संमेलनाच्या पहिल्याच दिवशी नृत्य, नाट्य, गायन आदी कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:
कार्यक्रमात शैक्षणिक गुणवत्तेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच राष्ट्रीय पातळीवरील रोबोटिक्स, AI, आणि प्रोजेक्ट स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. या स्पर्धा देशातील नामांकित IIT आणि इतर प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये झाल्या होत्या.

शिक्षकांचा सत्कार:
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि नुकतीच पीएचडी पूर्ण केलेल्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. सुधीर दिवेकर, डॉ. हरीश अवचट, डॉ. आरती सूर्यवंशी; तंत्रनिकेतनचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि फार्मसी विभागाच्या डॉ. मेघना रायकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार:
श्रीगोंदा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांचा परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले व त्यांच्या भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाने विशेष मेहनत घेतली असून विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात अजून अनेक रंगतदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
