दुसरा बाधित रुग्ण कोरोना मुक्त, वैद्यकीय उपचारानंतर सोडले घरी..

१४ दिवस घरीच देखरेखीखाली ठेवणार

दिनांक ४ एप्रिल,अहमदनगर:

जिल्ह्यात आढळलेल्या दुसऱ्या बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने,तो कोरोना मुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य यंत्रणेच्या तपासणी नंतर त्याला घरी सोडण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पिटलचा डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबोय यांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले आणि चांगल्या आरोग्या – साठी शुभेच्छा दिल्या. आणखी १४ दिवस त्याला देखरेखखाली ठेवण्यात येणार आहे.

आरोग्य यंत्रणेच्या सकारात्मक प्रयत्नामुळे आणि योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला. इतर रुग्णावर आपण चांगले उपचार करीत आहोत, त्यामुळे तेही निश्चितपणे बरे होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वॉर्डबोय यांचे श्री. द्विवेदी यांनी कौतुक करत आभार मानले.

नेवासे तालुक्यातील या व्यक्तीला १७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परदेशातून परत आल्या नंतर त्याला त्रास जाणऊ लागल्याने त्याचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही कडे पाठवले होते. त्या अहवालानंतर त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तात्काळ त्याला बूथ हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते.

दिनांक ०२ एप्रिल रोजी १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला. तो अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरा स्त्राव चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने, हा रुग्ण कोरोनातून बरा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या १७ झाली आहे. त्यातील ०२ रुग्ण आता बरे होऊन घरी गेले आहेत.तर,उर्वरित १५ जणांवर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचर सुरू आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ४७९ जणांचे अहवाल तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यातील १७ जणांचे अहवाल पॉझिटिव आले तर ४५६ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात ११० जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ३८० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.तर, २४० व्यक्तींनी त्यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्याची माहिती डॉ.मुरंबीकर यांनी दिली.

संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणी साठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading