गौतम बुद्ध:

(इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.
बुद्ध” हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतः वर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म’ किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू – भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक – उपासिकांचा. बौद्ध धर्माच्या अनुयायांना “बौद्ध” किंवा “बुद्धिस्ट” म्हणतात.

गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोरखपूर पासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे, येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत. इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.
(संकलीत)
बहुजन समता पत्र परिवारातर्फे महात्मा बुद्ध यांना विनम्र अभिवादन व जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
