दिनांक १८ ऑगस्ट २०२५, श्रीगोंदा:
देशभर ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असतानाच दुसरीकडे दलित समाजावरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का, असा प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना सुरोडी (ता. श्रीगोंदा) येथे घडली आहे.

येथील दलित समाजातील विद्यमान सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांच्यावर गावातील जातीयवादी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काल दिनांक १७ ऑगस्ट रोजी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांची गाडी पूर्णतः जळाली असून त्या स्वतः जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या लहान मुलालाही मार लागला आहे.

मीनाक्षी सकट यांनी गेल्या चार वर्षांपासून गावाच्या विकासासाठी झटत महिलांसाठी न्याय, दलित समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले. याच विकासकामामुळे काही गावगुंड त्यांना सातत्याने त्रास देत होते. अखेर त्यांनी प्राणघातक हल्लाच केला. असे निवेदन सादर करण्यात आले आहे.

२४ तास उलटूनही आरोपींना अटक झाली नाही यामुळे दलित समाज व विविध बहुजन संघटनांमध्ये प्रचंड संताप आहे. आज श्रीगोंद्यात समाज बांधवांनी जाहीर निषेध नोंदवला. या प्रसंगी आर.पी.आयचे नेते जिवाजीराव घोडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप, कुणाल शिरवाळे, नंदकुमार ससाने, निलेश गायकवाड, शिवाजी घोडके, संदीप भोईटे, अजित भोसले, राजू ससाने, अँड. प्रेरणा धेंडे, रतन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले. गुन्हेगारांना दोन दिवसांत अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समाज बांधवांनी दिला आहे.

पोलीस प्रशासन सज्ज:
पोलीस प्रशासनानेही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन पथके तयार केली आहेत. एक पथक पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे, तर दुसरे पथक श्रीगोंदा पोलिसांकडे आहे. “आरोपींना लवकरच जेरबंद करू” अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

