दुसऱ्याला गांधारी म्हणणाऱ्या प्रतिभा पाचपुते या कैकयीचा अवतार..! अनुराधा नागवडे यांचा प्रतिभा पाचपुते यांच्यावर पलटवार..

दिनांक १२ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:

अनुराधा नागवडे यांना तालुक्यातील आम्ही केलेला विकास दिसत नसेल तर.. त्या गांधारी आहेत..! असे म्हणत अनुराधा नागवडे यांना उद्देशून प्रचारसभांमधून खडेबोल ऐकवणाऱ्या प्रतिभा पाचपुते यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

तालुक्यात तुमची ३०-४० वर्षे सत्ता होती. पण, त्यात तुम्ही नेमके काय काम केले आहे..? जनतेला माहीत आहे. दरवेळी विरोधकांचे मतविभाजन करून आपण निवडून यायचे हा फंडा वापरून तुम्ही यशस्वी झालात. स्वतःच्या कर्तृत्वावर मते मागण्यापेक्षा इतर विरोधकांमध्ये होणारे वाद हेच डोक्यात ठेऊन तुम्ही निवडणुका करता. पण, आता जनता हे लक्षात ठेवून आहे, त्यामुळे तुम्हाला थारा मिळणार नाही. असे सांगत अनुराधा नागवडे यांनी प्रतिभा पाचपुते यांना खडेबोल सुनावले आहेत.

मला विकास दिसत नाही असे म्हणत प्रतिभा पाचपुते यांनी मला गांधारीची उपमा दिली. पण, स्वतःच्या मुलाला उमेदवारी करायची आहे. हे माहीत असताना सुद्धा प्रतिभा पाचपुते या स्वतःच आमदार होण्यासाठी इच्छुक होत्या. मला उमेदवार न केल्यास मी कायमचा पुण्याला निघून जाईल..! असा मुलाने दम दिल्यावर त्यांनी शेवटी माघार घेतली. कैकयीने आपल्या मुलाला राज्य मिळावे म्हणून रामाला वनवासाला पाठवले होते. पण, प्रतिभा पाचपुते या कैकयीचा आगळावेगळा अवतार आहेत. त्यांना स्वतःला राज्य हवे होते म्हणून त्या मुलाला बाजूला करायला निघाल्या होत्या. असे म्हणत अनुराधा नागवडे यांनी प्रतिभा पाचपुते यांना धारेवर धरले.

बबनराव पाचपुते यांना जनतेच्या जीवावर फार मोठी सत्ता उपभोगता आली असली तरी, यात त्यांचे मुलांचे किंवा पत्नीचे काडीमात्र कर्तृत्व किंवा योगदान नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या होत्या पण त्याही त्यांना नीट मारता आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर याहून जास्त मी काय बोलणार..? असा प्रतिसवाल देखील नागवडे यांनी केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply