बलुत..
तिच्याकडे अवाक् होऊनच पाहत होतो . पाय आपटत रागानं ती आतल्या खोलीत गेली आणि कपडे बदलून आली . ह्यावेळी तिच्या अंगावर चुरगळलेले जुने कपडे होते . घरात जाऊन रडल्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . ह्या वेळी मी खरा घाबरलेलो . मी ह्या प्रकरणाकडे केवळ गंमत म्हणून पाहत होतो . पण पोरगी खरंच प्रेमात पडली की काय , म्हणून मी चिंतातुर झालेलो .
मी किती डरपोक आहे , याची प्रचीती मला लगेच आली . तिनं एकदा एका लहान मुलापाशी चिट्ठी पाठवलेली . बघतो , तो ती उर्दूत लिहिलेली . आता आली का पंचाईत ? ही वाचायची कशी ? शेवटी एका लहान मुलांच्या उर्दू शाळेपाशी जाऊन उभा राहिलो . एका मुसलमान मुलाकडून ती वाचून घेतली . ” मेरे शाहजादे ! ” ह्या पहिल्याच शब्दानं उडालो . पुढचं ऐकलं , तेव्हा माझ्या अंगाला घाम सुटलेला . घरातून पळून जाण्याची सूचना तिनं केली होती . आपण खरंच हिला पळवून कुठं बरं घेऊन जाणार ? ह्या दृष्टीनं मी तिचा विचार केव्हाच केला नव्हता . समजा , पळवून नेली ; तर तिचा बाप आपल्याला जमिनीतून खणून बाहेर काढील . काय करावं , हे कळेना .
नागपाड्याला पाहिलेली एक घटना आठवली . असाच महाराचा एक पोरगा एका मुसलमान मुलीच्या प्रेमात पडलेला . गवगवा झाला , त्याला गल्लीतल्या मुसलमान समाजानं मशिदीत नेलं आणि त्याची सुंता केली . पुढील दहा – पंधरा दिवस कमरेला लुंगी गुंडाळून गरमी झाल्यासारखा चालत होता .
तसं आपलं झालं , तर काय करायचं ? सलमा आणि माझ्यामध्ये धर्माच्या किती मोठ्या प्रचंड भिंती उभ्या आहेत , याची जाणीव झाली . पुढे पुढे मी सलमाची नजर टाळू लागलो . ती ‘ डरपोक ‘ म्हणून मला येता – जाता चिडवायची . पुन्हा एकदा आयुष्यात हरलो होतो .
जो दिवस कधी उगवू नये असे वाटत होतं , तो दिवस उगवलाच . फुलाफुलांचा अंगभर सेहरा बांधून दुल्हा सलमाच्या दारापुढं उभा राहिला , घोड्यावर बसून आला होता . तो उतरला तेव्हा काही मंडळी त्याला पंखा घालत होती . सलमाच्या घरात मुसलमान स्त्रिया ढोलकवर गाणी गाऊ लागल्या . लग्नाच्या दिवशी सलमाचं नखही दृष्टीस पडेना . खूपच बेचैन झालो . पण सईच्या वेळी कोसळलो , तेवढा काही कोसळलो नाही . दाब सहन करण्याची माझ्या मेंदूला बहुधा सवय झाली असावी . तिच्या लग्नात मोठा तोहफा देण्यास मात्र मी विसरलो नाही .
सलमाचं सासर भेंडीबाजार इथं होतं . तिला कुणी तरी फिटर नवरा मिळाला होता . ऑफिसातून सुटलो , की आपोआप भेंडीबाजाराच्या दिशेनं पाय वळायचे . एवढ्या मोठ्या भेंडीबाजारात सलमाचं घर नेमकं कुठं असेल , हाही प्रश्न होताच . थोडाफार हा वेडेपणाच होता . एकदा तर मशिदीत गेलो . कुणी तरी सांगितलं होतं , की सलमाची खिडकी मशिदीतून दिसते म्हणून . तो बोलण्यातला धागा पकडला होता . मशिदीच्या तलावात हातपाय धुणारे , वजू करणारे मुसलमान माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत होते . हा कोण काफर आलाय , असा भाव त्यांच्या दृष्टीस होता .
असाच एकदा संध्याकाळी रस्त्यावर फिरत असताना दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीतून सलमानं मला पाहिलं . मला ऐकू जाईल अशा पद्धतीनं माझ्या नावाचा पुकारा केला . मी जागच्या जागीच खिळलो . वर आवाजाच्या दिशेनं बघतो , तर सलमा मला वर बोलावीत होती . मनात संभ्रम दाटलेला , वर जाऊन सांगायचं काय ? तिच्या घरातील मंडळींना आपला संशय तर येणार नाही ना ? तसाच घरी परतलो . सलमाचं धारिष्ट पाहून अचंबाही वाटला .
सलमा जेव्हा पुढे केव्हा तरी माहेराला दोन दिवसांसाठी आली , तेव्हा तिनं मला फैलावर घेतलं . ” तू घरी का आला नाहीस ” म्हणून विचारणा केली . काही कळेना . तिच्या सासरच्या माणसांना ही माझ्याबद्दल काय बरं नातं सांगेल ? एक हिंदू तरुण मुसलमान मुलीकडे प्रेमाच्या भावनेनं बघतो आहे , ही कल्पनाच त्यांना अशक्य कोटीतली वाटली असती . सलमा ज्या ज्या वेळी माहेराला यायची , तेव्हा मला ‘ लग्न कर ‘ म्हणून आग्रह करायची . माझं असं पतंग तुटल्यासारखं एकाकी आयुष्य तिला छळत असावं .
एकदा मी खरंच तिच्या घरी जाण्याचं धाडस केलं . दुपारची वेळ होती . तिचा नवरा कामाला गेला होता . म्हातारी सासू होती . माझ्या येण्यामुळं सलमाला खूपच आनंद झालेला . माझा आदरसत्कार कसा करावा , म्हणून ती भांबावून गेलेली . तिनं सासूला थंड लेमन आणण्यासाठी खाली पाठवलं . मी ह्या वेळी सलमाकडे निरखून पाहिलं . ती गरोदर होती . मला , का कुणास ठाऊक , आनंद होतो . मी तिला हसत म्हणतो- अर्थात तिच्या ठसठशीत पोटाकडे पाहत ,
” इसमें मेरा भी हिस्सा है ना ? ” ती ह्यावर जे उत्तर देते , ते ऐकून चाट पडतो . म्हणते कशी , ” अभी मुँह धोके आ ! ” अशी ही सलमा .
तिनं एकदा तिचा फोटो दिला होता . तो आजही पेटीच्या तळाला असेल . एवढ्या वर्षांतही तो मला फाडावासा वाटला नाही . तिनं आणखीही एक वस्तू दिली होती. तिला विणकाम करण्याची खूपच आवड होती . चक्क पांढऱ्या दोऱ्यापासून तिनं माझ्यासाठी बनियन विणलं होतं . बराच काळ ते माझ्या घरी होतं . अंगात घातलं म्हणजे चिलखत घातल्यासारखं वाटायचं . पुढं शिकलेली बायको आली , तिच्यापासून ह्या घटना मी लपवून ठेवल्या नव्हत्या . शिकलेल्या बायकोनं काय करावं ? तिनं हे बनियन लादी पुसण्यासाठी केलं . बराच काळ तिनं ते फेकूनही दिलं नव्हतं . साफसूफ करून ती पुन्हा त्यानं लादी पुसायची . खूप मळला , म्हणजे उंदीर पकडतात तसं त्याला पकडायची . आणि म्हणायची ,
” ही बघा तुमच्या प्रेमाची निशाणी ! “
सलमाचं लग्न झाल्यानंतर शिवडी आम्ही लगेच सोडली . जसं काय मी शिवडीला उपचाराकरिता गेलो होतो आणि सलमानं माझ्यावर उपचार केला होता . शिवडी सोडण्यास वेगळीच कारणं घडली . मेव्हण्याशी वहिणीचं लग्न झालं , तेव्हा तो शेवटच्या वर्षात एस.एस.सी.ला होता . खूपच चुणचुणीत दिसला . वाटलं , एस.एस.सी. झाला म्हणजे कुठंही कारकून म्हणून चिकटेल . पण झालं भलतंच . माझ्यासारखीच अवस्था झाली . काही विषय सुटूनही तो इंग्रजीत पास झाला नव्हता . त्यातच त्याची आई कॅन्सरनं वारलेली . वडिलांचं घरी अजिबात लक्ष नसायचं . म्हातारपणातही ते बाई – वाटलीत रमलेले . मेव्हण्याची हलाखीची परिस्थिती पाहून की काय , मी त्याला माझ्या ऑफिसात प्यून म्हणून चिकटवलेलं . मी साहेब आणि मेव्हणा प्यून . मी माझं नातं कुणालाच सांगत नव्हतो . मेव्हणा तसा स्वभावान हुन्नरी होताच . त्याला प्यूनची नोकरी आवडायची नाही . टिनोपॉल कपडे घालून स्टूलावर वसायचा . दिवसभर कादंबऱ्या वाचीत बसलेला . त्याला ऑफिसची मंडळी ‘ छोटे साब ‘ म्हणून पुकारीत . तसा त्याचा स्वभावात माझ्यासारखा मवाळपणा नव्हता , प्यून होता , तरी हजाराच्या गप्पा करायचा . साहेब मंडळीत बोलण्यात हार जात नसे . त्याला कधी साहेब मंडळी टूरला घेऊन जात . प्यूननं स्वयंपाक करायचा , हा रिवाज पण पहिल्याच दिवशी त्यानं जाणुनबुजून एवढी मिरची टाकली , हा पुढे आरामात बसायला लागला आणि साहेबलोक स्वयंपाक करू लागले . टूरवरून आला म्हणजे खूपच गंमत सांगायचा . शेवटी त्याचं प्यूनच्या नोकरीत मन रमेना . त्यानं गावी जाण्याचा बेत केला .
गावी मात्र सुरुवातीच्या काळात त्याची खूपच ससेहोलपट झाली . सायकलीचं दुकान काढलं , पण तेही चालेना . एकदा तर तालुक्याच्या गावी एका सायकलवाल्याकडे मजुरीनं राहिला . बहिणीवर मोलमजुरीची पाळी आली . आपलं आतडं सारखं तुटायचं . मेव्हणा आता गावच्या राजकारणात पडला . डोक्यावर गांधी टोपी ठेवली . सुरुवातीच्या काळात तो हजाराच्या गप्पा करायचा , त्या वेळी मी त्याची चेष्टा करायचो , पण काही वर्षातच त्यानं विहीर खोदली , द्राक्षांचा बगीचा केला , ऊस लावला , तर मी उडालोच . अर्थात त्यानं हे सारं डोक्यावर टोपलीभर सरकारी कर्ज घेऊनच उभारलं होतं . कुणाचे उसने घेतलेले पाच – दहा रुपये असतील , तर आपल्याला झोप येत नाही . ह्यानं एवढं धाडस कसं बरं केलं ?
आई आणि मी एका नातेवाइकाकडे राहत होतो . ह्या दिवसात आईचं आजारपण बळावलेलं . बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करण्याकरिता एका जागी बसून आईच्या अंगावर फोपरी पसरलेली . तिला चालताना धाप लागायची . ब्लडप्रेशरचा विकार होताच . आई दवाखान्यात येत नसे . ती खूपच घाबरायची . एकदा दवाखान्यात गेलेला माणूस परत येत नाही , अशी तिची समजूत होती . एकदा – दोनदा बळजबरीनं घेऊन गेलो होतो . तिच्या पोटात मांसाचा गोळा वाढलेला आहे , ऑपरेशन करायला लागेल , असं निदान झालं होतं . ऑपरेशन थिएटरपर्यंत आईला नेलं होतं . तिथलो चकचकीत हत्यारं , अजस्त्र यंत्र , गुळगुळीत टेबल पाहून आई खूपच भेदरली . मटकन खालीच बसली . ” मला लेकीच्या गावी घेऊन चल . तिथंच मी गावी मरेन ” हा ध्यास तिनं घेतला . शेवटी आईला बहिणीकडं सोडून आलो .
आई खूपच आजारी असल्याची तार मिळाली , तेव्हा काय होणार आहे ते मनोमन उमजलो . बहिणीच्या गावी जाऊन पाहतो , तो आई शेवटची घटका मोजत होती . माझं काही चांगलं झालं नाही , म्हणून ती खूपच कष्टी होती . मला जवळ बसवून सांगते ,
” लेका , तू आता लगीन कर . हवं तर घरात भंग्याची पोरगी आण , पण असा एकटा राहू नकोस !
” आईच्या मरणाच्या रात्री संगमनेरला गेलो होतो . संध्याकाळी परत येऊ असं वाटत होतं . रात्र जशी चढू लागली , तेव्हा का कुणास ठाऊक , मला एका चमत्कारिक औदासीन्यानं घेरलेलं . मेव्हणा बरोबरच होता . घरी चल , म्हणून आग्रह धरला . दहा – बारा मैलांचं अंतर होतं . कि रात्र . भयाण रस्ता . फक्त रातकिड्यांचा आवाज . कमरेएवढी नदी उतरून आम्ही घरी आलो . घरी आलो तर आई शेवटची घटका मोजत होती . आईचं मरण खूपच जवळून पाहिलेलं . मांडीवर आईचं डोकं . मी चमच्यानं दूध घालतो आहे . बहीण रडवेला चेहरा घेऊन जवळ बसलेली .
आईचा जीव केव्हा गेला हे कळलंच नाही . चोरपावलांनी मृत्यू आला होता . शेजाऱ्यांनी सांगितलं , “ नाकापुढं सूत धरा . ” खरं म्हणजे आईचं केव्हाच आटोपलं होत . शेजाऱ्यांना ती कल्पना आली होती . पण त्यांनी तशी जाणीव दिली नाही . आई जणू झोपलीय असं वाटत होतं . असं शांत मरण मी केव्हाच पाहिलं नव्हतं .
क्रमशः
स्रोत:(दया पवार यांच्या बलुतं पुस्तकातून)
