बलुत..
जेव्हा “ देव्हाऱ्यावरच्या खंडोबाला रविवारी तरी आंघोळ घाला ” असा आग्रह धरी , तेव्हा दादांनी ते काम माझ्याकडे सोपवलं होतं . माझ्या जन्माच्या वेळी त्यांना भाटांनी चोख भोजनी जेवण करण्यास सोपवलं होतं . पण त्यांनी भाटाचं न ऐकता बोकड कापला आणि साऱ्या महारवाड्याला बरबाटाचं जेवण दिलं . दादांच्या विद्रोही जाणिवांच्या अनेक गोष्टी सांगता येतील .
असेच ते एकदा आपल्या सटवा ह्या मित्राबरोबर एका लग्नाला गेलेले . हे दोघेही खेत्री म्हणून भोवताली प्रसिद्ध . लग्न लागून गेल्याबरोबर एका बाईच्या अंगात येतं . केस सोडलेली , कपाळाला मोठा मळवट भरलेली बाई घुमत असते . समोर रिंगण भरलेलं . त्यात लिंबू , टाचण्या , नारळ असा प्रकार . दादांना काय वाटतं कुणास ठाऊक ! ते पुढे जातात . रिंगण लाथेनं उडवतात आणि बाईला आईवरून सणसणीत शिवी देतात . बाईचं झाड आता जादाच बेताल झालेलं . बाई घुमत – घुमतच म्हणते , ” आय झ…. म्हणाला . ” सटवा त्याच लयीत उत्तर देतो , ” जाऊ म्हणू परता – घरचाच व्हता ! ” ही रंगीत तालीम बराच वेळ चाललेली . सारं वऱ्हाड हसण्यात दंग झालेलं . दादा तिच्या ढुं…णात जेव्हा बाभळीचा काटा टोचतात , तेव्हा कुठं तिच्या अंगावरचं जातं . पुढं बराच काळ महारवाड्यात हा जोक सांगितला जात असतो . दादांच्या स्वभावात चांगल्या – वाइटांचं असं मजेशीर मिश्रण असे . गावातल्या तालमीत महारवाड्यातील पोरांना खेळू देत नाहीत , हे पाहून त्यांनी आमच्या घरातच तालीम सुरू केली .
आम्ही त्या वेळी पडवीत राहत असू . मागचं घर तालमीसाठी खोदलेलं . त्यात लाल माती टाकलेली . त्यात तेही कधीकधी उतरत . आपल्यापेक्षा लहान असलेल्या पोरासोरांना कुस्तीचे डाव शिकवीत . गावातले मृदंग , ठाकरवाडीतल्या ढोलक्या त्यांच्याकडे शाई भरायला यायच्या . ही विद्या ते कुठे शिकले , हे मात्र आठवत नाही . दादा मुंबईहून गावी आले , तेव्हा त्यांची मुंबईची झळाळी काही दिवसांतच संपू लागलेली . पोट भरण्यासाठी हातपाय हालवावे लागलेच . मुंबईत त्यांच्या वाट्याला गोदीत तसं विशेष कष्टाचं काम नव्हतं . गावी मात्र चक्क बाभळाची , लिंबाची लाकडं फोडावी लागली . शेतावरील झाडं हे उक्ती विकत घेत . आपल्या एक – दोन साथीदारांबरोबर खांद्यावर कुऱ्हाड टाकून ते घराबाहेर पडत . मुंबईची त्यांची व्यसनातली तब्येतही थोडीफार गावच्या हवेमुळे , कष्टाच्या कामांमुळे सुधारू लागलेली . खोल कोरड्या विहिरीत ते लाकडे फोडीत आहेत , हेच लहानपणीचं दृश्य मला आठवतं आहे . आईही गावच्या मराठा मंडळीच्या शेतावर जाऊन निंदणी , खुरपणी , येटाळणी करू लागलेली . गावात त्या काळी कडक दारुबंदी होती . दादांना केव्हा केव्हा पिण्याची लहर येई . अशा वेळी त्यांनी काय करावं ? ते चक्क घरातच हातभट्टीची दारू काढीत . त्यांचा सटवा हा मित्र तसा खूपच हुन्नरी . त्याच्या सन्निध्यात माणसाला कधी कंटाळा येऊ नये , तो तासन् तास हसवीत असे . पट्ठे बापूरावाची पवळा मी नाचवलीय , असं तो अभिमानाने सांगे . पवळाच्या सौंदर्याचं वर्णन करी . तशी पवळा ही आमच्याच जिल्ह्यातली . मुरळी सोडलेली . पान खाताना तिच्या गळ्यातून पानाची लालजर्द धिक दिसायची , एवढी ती गोरी होती . हा किस्सा सटवा सतत सांगे .
जवळच्याच , दोन मैलांवरच्या वाशेरे ह्या गावचा हा राहणारा . दोन बायकांचा धनी . त्या बिचाऱ्या रात्रंदिवस मोलमजुरी करत आणि ह्याला पोसत . हा राहायचा त्यांच्या जिवावर . बगळ्यासारखा . सकाळी उठायचा तो तालुक्याला किंवा आमच्या गावी यायचा . सटवाच्या ह्या दोन बायकांना भांडताना मी अनेकदा पाहिलेलं . दोघींच्या तोंडात अर्वाच्य शिव्या . वाटायचं , ह्या आता एकमेकींच्या नरडीचा घोट घेतील . भांडता भांडता ह्या मध्येच थांवत . चुन्याची , तंबाखूची देवाणघेवाण करीत . पुन्हा भांडण सुरू करत , त्यांच्या भांडणाची खूपच गंमत वाटायची . बहुधा सटवानंच दारू गाळण्याची कला दादांना शिकवली असावी . ज्या ज्या वेळी सटवा घरी यायचा , त्या त्या वेळी सटवाच्या ह्याच गप्पा . सडलेला गूळ , नवसागर , नशा जादा चढण्याकरिता कुठल्या तरी झाडाची साल ते त्यात टाकत . सात – आठ दिवस डबा उकिरड्यात पुरून ठेवला जात असे . तोपर्यंत त्यांना दम निघत नसे . पुन्हा पुन्हा जाऊन ते मालाचा वास घेऊन पाहत . दारू गाळण्याकरिता लाकडाचं पाळं त्यांनी घरीच तयार केलेलं . दारूची पहिली धार पडली म्हणजे त्याला ते काडी लावून पाहात . भपकन आग पेटली , म्हणजे माल चांगला उतरला म्हणून ते खूश व्हायचे , आईला मात्र ह्या भट्टीपुढं सारखं राबावं लागे . दोन फर्लागावरील विहिरीवरून सारखं पाणी आणावं लागे . त्यात ती मेटाकुटीला यायची . भट्टीला लाकडं कमी पडली , म्हणजे दादा सहजच गावात जात आणि अंधारात एखाद्याच्या वाड्यात पडलेला लाकडी नांगर उचलून आणीत . घरात भट्टी जरी लावली जायची ; तरी दादांनी दारूचा धंदा केला नाही . खास मित्रांना , गावातल्या मंडळींना आग्रहानं पाजली जायची . अशा वेळी कुणाच्याही खुराड्यातून कोंबड्या लंपास व्हायच्या .
एकदा एका शेजाऱ्याची कोंबडी मारण्यास मला उमाआज्यानं प्रवृत्त केलं . पण मनाला हे आवडलेलं नसतं . मी नाकारतो . दादांकडे जेव्हा माझी तक्रार केली जाते , तेव्हा दादांच्या हाताची चपराक गालावर खावी लागते . कोंबडी पकडण्याचंही त्यांचं एक शास्त्र होतं . ओला कपडा तिच्या अंगावर टाकला , म्हणजे ती कोकलायची नाही . कधी आख्खं बकरू रानातून उचलून आणलं जायचं . त्याच्या नाकावर गोवरी ठेवली , म्हणजे ते कोकलायचं नाही . दादांनी दारू गाळण्याचे अनेक प्रयोग केले . एकदा तर त्यांनी तालुक्यावरून पाटीभर मोसंब्या आणलेल्या . डव्यात सडत टाकलेल्या , पण त्या दिवशी भट्टी जमली नाही . सारा माल आंबट निघाला . आपलं कुठं चुकलं , याचाच विचार ते रात्रभर करीत होते . अशी ही सटवाची आणि दादांची दोस्ती . त्यांच्या बोलण्यात अनेक विषय येत . काही तर चक्क रांडवाजीचे . मी लहान असल्यामुळं ‘ असल्या गप्पा पोराला काय समजतात ‘ असाच बहुधा त्यांचा समज असावा . दादा मुंबईला येण्यापूर्वी एका ब्राह्मण जमीनदाराकडे सालानं होते . तिथं असताना काही बाया गवत कापायला यायच्या . त्यांचे विळे लपवून ठेव , “ नि.जा.य.ला. द्या , तवा इळे देतो ” म्हणून त्यांना अडवत . अर्थात हा खुशीचा सौदा होत असावा . नाही तर दादांना कुणीही गावातल्यानं बदडलं असतं . ह्या बाबतीत लहानपणी तसं खूपच मोकळं वातावरण होतं . ” नि.जा.य.ला. द्या , तवा शेळ्या निवडा ” ही म्हण का पडली असावी , याचं कारण सापडतं .
बऱ्याचदा त्यांच्या विषयात तमाशा यायचा . हे दोघेही तमाशाचे तसे खपूच दर्दी होते . तमासगीर गावात आले , म्हणजे आमच्याच घरी उतरायचे . देवठाणचा दशरथ हा प्रसिद्ध तमासगीर नेहमीच त्याच्या फडासहित घरी उतरायचा . दशरथ हा खूपच राजबिंडा , गोरापान , रजवाडी पोशाखात खरा राजपुत्र शोभायचा . लावण्या रचायचा . खाजगीतही खूप शुद्ध बोलायचा . हरिभाऊ वडगावकरांचा हा नाच्या . पुढे ह्याने ‘ गंमत ‘ उभी केली . हरिभाऊ हा पट्टे बापूरावांचा चेला . त्यामुळे पट्टे बापूरावांबद्दल ह्यांना खूपच अभिमान . आज गाजत असलेलं गाढवाचं लग्न ‘ हे वडगावकरांचं वगनाट्य , त्या काळात ‘ सावळ्या कुंभार ‘ ह्या नावानं मी लहानपणी पाहिलेलं . पुढं दशरथ जेव्हा म्हातारा झाला , तेव्हा त्यानं देवठाणच्या महारवाड्यातील १६-१७ वर्षांच्या मुलांचा तमाशाचा एक अप्रतिम फड उभा केलेला . तिकीट विकत घेताना पैसे नसतील तर चिपटभर बाजरी – जोंधळा चाले . बराच काळ मलाही वाटायचं की आपणही तमासगीर व्हावं , ते ह्यामुळंच . त्या काळात पाठ असलेल्या लावण्यांचे तुकडे आजही आठवतात . ‘ राया , दुरून मशी बोला , शालू माझा निरीत लाल झाला ‘ किंवा ‘ कुण्या हौस्यानं हौस केली , ‘ ‘ नार कंपनीला गली , आन खाते ऊस , ऊस … उसाची होत साखर , नारीला चालना भाकर … ह्या गोष्टीचं येतं मला रडू , वल्या वाफ्यात कशी मी पडू , अथरा शाल शाल , खात ऊस , ऊस … ‘ ह्या गाण्यात काही अश्लील असेल , असं भोवताली कुणालाच वाटत नव्हतं . स्त्रियासुद्धा मोठ्या संख्येने तमाशाला जमत . त्या काळात नावारूपाला आलेला असाच तात्यावा शिंदे आठवतोय . त्याचा त्या काळात किती रुबाब होता ! तंबूत दहा – बारा नाचणाऱ्या . त्यांतील चंद्रा खूपच देखणी . दोन – तीन बैलगाड्या . खूप छान गायचा . त्याचा पाथर्डीच्या राजावरचा वग
क्रमशः
