बलुतं..
कच्च्या – बच्च्यांना मोठं करीन ! ” असं तिनं आजोबाला तोडांवर सांगितलं . आई जन्माला आलेली ; त्या वेळेसच तिचा बाप वारलेला . बाप मातीआड लोटला आणि ओल्या बाळंतिणीच्या छळाला सुरुवात झाली . मुलगा झाला नाही , हा राग होताच . आजीला उपाशी ठेवू लागले . गुराढोरासारखं काम करून घेण , पीठ चाळून जो भुसा राहील त्याच्या भाकरी आजीला देणं , असा छळवाद मांडला . त्या काळी सासुरवाशिणीचं जिणं म्हणजे तुरुंगच . ह्या छळाला कंटाळून आजी माहेरला गेली . माझी आई तेव्हा बाळुत्यात होती . तिला आजीपासून तोडलं गेलं . आई सांगायची , ” तुझी आजी एकदा माहेराला गेली , ती परत आलीच नाही . तिनं दुसरा घरोबा केला .
आईचं बालपण माहेरात गेलं ते आई शिवाय . आयुष्यात तिला आईची ऊब मिळाली नाही . लग्न होईपर्यत आईची आणि तिची गाठभेट नव्हती . पण दादा खूपच समंजस . त्यांनीच पुढाकार घेऊन आईची आणि आजीची एकत्र भेट घडवून आणली . पुढे आजी आमच्या घरी अनेकदा यायची . आजी आंधळी झालेली . काठीला धरून तिच्या गावावरून मी घेऊन यायचो . तिला दुसरा घरोबा करूनही मुलगा झाला नाही . तिथं एक सोडून तीन मुली झाल्या . ह्या आजीचा आणि काका – मावशींचा आम्हांला मोठा आधार वाटायचा . आजी आणि तिच्या मुलीचा सारा संसार तसा गरिबीतला . पण ही माणसं खूपच मायाळू होती . आईच्या माहेरच्या मंडळींपेक्षा हे लोकंच आम्हाला लहानपणी जवळचे वाटत .
आईनं पुरुषासारखी कंबर कसली . आयुष्यभर कमालीचे कष्ट उपसले . तिच्या सामर्थ्यानं मी खरा दिपून गेलेला . दादांनी जेवढ्या लाडात वाढवलं नसतं , तेवढ्या लाडात आईनं वाढवलेलं . तळहाताच्या फोडासारखं जपलेलं . वाटायचं , खरंच दादा असते तर आज जो मी आहे . तसाच नेमका असतो काय ? शिकलो – सवरलो तरी असतो की नाही कुणास ठाऊक ! आपल्या बरोबर शिकत असलेली महारवाड्यातील बाकीची मुलं आज कुठं आहेत ? आईनं जो त्याग केला त्यामुळं तर ह्या खाचरातून वर निघण्याची ऊर्मी मनात तरारून फुटली . दादांची वाट ती आपली वाट नाही . त्यांनी जे जे केलं ते ते आपण टाळायचं , अशी खूणगाठ मनात बांधली नव्हती काय ?
आईला एकदा सहजच विचारलेलं आठवलं , ” आये , काय बघून तू दादांशी लगीन केलंस ? ” त्यावर ती डोळ्यांत पाणी आणून जन्माचा सारा इतिहास कथन करायची . दादाशी केव्हा लग्न झालं हे आईला आठवतच नाही . त्यावेळी ती झोळीत होती . झोळीतच बाशिंग बांधलं , म्हणतात . जेव्हा ती परकर – पोलक नेसू लागली , तेव्हा आपलं लग्न लहानपणीच झालंब ह्यावर तिचा विश्वास बसायचा नाही . वेशीपाशी कोणाचाही नवरदेव आला , म्हणजे ” महं लगीन करा ” असा हट्ट चुलत आजी आज्याजवळ धरायची .तिच्या गळ्यातली काळी पोत तिला खोटी वाटायची . वडीलधाऱ्यांनी समजूत काढली तरी तिला ती पटायची नाही . तिच्या समजुतीसाठी मग नवरदेवाच्या पाठीमागं तिला बसवायचं . लुगड्याचा बांगा , डोक्यावर नारळ ठेवलेला तांब्या , अशा पोझमध्ये तिला कळशीनं म्हणून बसविलं जायचं . आईला वाटायच , ‘ आपलंच लग्न आहे .
आईच्या लग्नाचा किस्सा मोठा गमतीदार आहे . दादांची आई देवकी आणि आईचं एक माहेर . दोघींचं माहेरच आडनाव एकच- कसबे . आजी तेव्हा मुंबईला होती . दादांचं जेव्हा लग्न करायचं ठरलं , तेव्हा आजीला आपलं माहेरचं ठिकाण हक्काचं वाटलं , पोरगी परणून आणीन तर औरंगपूरची , हाच तिचा हका होता . त्या वेळी औरंगपुरात दादांना शोभेल अशी कोणतीच पोरगी नव्हती . आईवर मागणं टाकलं . अर्थात चुलत आजोबानं हे मागणं फेटाळून लावलं . आमच्या गावचं नाव त्यांच्या लेखी खूपच बददू झालेलं . ‘ मवाल्याचं धामणगाव ‘ असंच ते म्हणत . महारवाड्यातील जवळ जवळ सर्वच मुंबईला . सर्वाना ना शेत , ना शिवार , थोडीफार जमीन असली , तरी शेती करण्याच्या नावानं बोंब . जवळ जवळ सारे दारू – ताडी , जुगारीत अखंड बुडालेले . कुणी एखादा ममईवाला गावी आला , तर अप टु डेट यायचा ; पण परत जाताना कफल्लक झालेला असायचा . गावातली मराठा मंडळी जवळच्या वस्तू गहाण ठेवून त्याला गाडीभाड्याला पैसे देत . गावची मराठा मंडळीही मौल्यवान वस्तू गहाण ठेवण्यास टपून बसलेली . मातीमोलानं गहाण ठेवीत . अंगावरचा कोट , हातातली छत्रीही चाले . तेव्हा अशा उधळ्या गावात लेक द्यावी आणि भेटायची शिराणी व्हावी , ही अवस्था . पण आजी तशी मागे हटणारी नसते . ती महारवाड्यातून उठते ती गावात जाते . तिथं जाऊन पाटलापुढं गाऱ्हाण मांडते , ” मी तुमच्या गावची लेकबाळ . तुमच्या गावची सून मला पाहिजे . माझा तो हक्कच आहे ! ” आजा – आजीला चावडीवर बोलावण्यात आलं . गावाच्या निर्णयापुढं आजा – आजीला विरोध करण्याची त्या काळात काय विशाद होती ? असं झालं दादांबरोबर आईचं लग्न .
दादा जेव्हा जिवंत होते तेव्हा आई , ते घरात नसले म्हणजे त्यांच्या नावानं बोटं मोडी . शिव्याशाप देई ; ‘ माझं कपाळच फुटकं । ‘ म्हणून नशिबाला दोष दई . पण दादा मेल्यानंतर आईच्या स्वभावात कमालीचा फरक पडत चाललेला . दादांच्या आठवणी काढून ती आता तासन तास गळा काढायची . ” तुझ्या दादानं कसं मह्या अंगाला पाच बोट लावली न्हाईत . ” म्हणून हुंदक द्यायची . आई सांगायची , ” तुझा दादा जेवायला बसला , म्हंजी त्याचं सारं ध्यान चुलीकडं , मागं बायकोला टोपलीत भाकर हाये का न्हाई ; तवलीत कोड्यास राहिलं की न्हाई . याची तो काळजी घ्यायचा . ” दादांच्या दातृत्वावद्दल तालुक्यात खूपसं चांगलं बोलणारी मंडळी होती . मी जेव्हा मोठा झालो , नोकरीपाण्याला लागलो . खिशात पैसे खुळखुळायला लागले , तेव्हा अशा वेळी जेव्हा जेव्हा गावी गेलो , तेव्हा तेव्हा जुनी मंडळी भेटत . ते म्हणत , ” काय रे पोरा , तू किती चिकट ! कुणाला पैसे खर्चायला नको . तुहा बाप बघ , कसा व्हता ! ममईहून आला , की महारवाड्यात दारू – ताडीच्या – मटणाच्या पार्ट्या होत . आणि तू कपभर चहा पाजत न्हाईस , व्हय ? ” मी ह्यावर काय उत्तर देणार ! मनातल्या मनात हसत असे .
त्यांच्या दातृत्वाचे काही प्रसंग मलाही आठवत असतात . चावडीत उतरलेला पाव्हणा आमच्या घरी जेवायला यायचा . एकदा असाच दूरचा एक नातेवाईक घरी आलेला . त्या दिवशी चूल थंड – आम्ही येसकरपाळीच्या भाकरीवर भागवणार असतो ; पण पाहुण्याला येसकरपाळीच्या भाकरी कशा द्यायच्या ? दादांनी आईला काय खूण केली कुणास ठाऊक ? आई तांब्याचा एकुलता एक हंडा घेऊन घराबाहेर पडली . पाहुण्याला वाटलं असेल , आई पाण्याला गेली . परत येते तेव्हा तिच्या ओटीत बाजार असतो . गहू , डाळ , गूळ तिनं विकत आणलेलं . रात्री पाहुण्याला पुरणपोळीचं जेवण दिलं गेलं . पाहुणा वाटला लावल्यावर हंडा गहाण पडला म्हणून आई खंत करत बसायची . दादा म्हणायचे , ” जाऊ दे गं ! दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम !
त्यांच्या ह्या सवयीमुळं म्हणा किंवा वाढत्या व्यसनामुळं म्हणा , आम्ही तसे आयुष्यभर कफल्लकच राहिलो . आणि नेकीनं संसार केला असता , तरी हाती काय राहिलं असतं म्हणा ! घरात सामान कितीसं होतं ? दोन मातीचे रांजण जमिनीत पुरलेले , जमिनीत पुरल्यामुळेच खरं म्हणजे ते राहिलेले . दगडी जातं , मातीची चूल . एक लाकडी पेटी , काही जमलची भांडी , पितळेची नावापुरती एक – दोन . थंडीवाऱ्याला तोंड देण्याकरिता गोधड्या . ह्या गोधड्यांचा मला अभिमान वाटायचा . कारण एवढ्या सुरेख गोधड्या उभ्या महारवाड्यात फक्त आमच्या घरात होत्या . आई गोधड्या फार छान शिवायची . गोल वर्तुळात एकेक वर्तुळ कमी होत गेलेलं . आजही माझ्या घरी आईच्या हातची गोधडी जपून ठेवलेली . आईच्या मायेसारखीच , ती आजही फाटता फाटत नाही . मुंबईच्या बिऱ्हाडात लाकडी पेटी ही खूपच उपयुक्त होती . सारा संसार त्यात मावायचा . त्यातच भांडीकुंडी , सौदा , मसाला , रेशनचं धान्य . कुठल्या बुचड्यात कोणती वस्तू , ते आईला चाचपताच सांगता यायचे . लाकडी पेटीचा उपयोग पार्टिशन म्हणून व्हायचा . ” ही तुमची हद्द . पेटीपासून आमची . ” पोरगंही दुसऱ्याच्या हद्दीत जाईल तर काय बिशाद ? घरातील एकाच रक्तात हे चमत्कारिक वाटे . दादा गेल्यापाठीमागे एक काम मी निष्ठेनं केलं . त्यांचं दारू गाळण्याचं सामान -त्यात दारू सडविण्याचा डबा , लाकडी पाळ – ह्यांची तोडफोड केली . त्यांचा हा वारसा मला निरुपयोगी वाटला . पुढच्या आयुष्यात मी दारूच्या आहारी केव्हाच गेलो नाही . अनेक संकटं आली . जीव गलबलून गेला , आत्महत्याही करावीशी वाटली . असे म्हणतात , की असा मनानं विकल झालेला माणूस शेवटी दारूच्या आहारी जातो . आपलं दुःख क्षणभर विसरण्यासाठी तो असं करतो . पण दारू म्हटली म्हणजे , आपल्या…
क्रमशः
