बलुतं…
तिला पहिली पाळी आली आणि तिचा सारा परकर रक्तानं भरला , तेव्हा ही मुलगी बाई झाली , याचा शोध प्रथम मलाच लागला .
मुंबईला कावाखान्यात असताना दारं – खिडक्यांच्या चिरीतून पोराटोरांच्या नादी लागून संभोगाची अनेक दृश्यं मी लहान वयातच पाहिलेली . एक प्रसंग तर चांगलाच स्मरणात आहे . माझे एक मावस चुलते होते . त्यांचं नाव शिवा . लग्न झालं आणि बायको मेली , विधुरपणाचे दिवस काढत होते . रस्त्यावर कसरतीचे खेळ खेळणारी एक काळी धुमाळी बाई त्यांनी ठेवलेली . ही बाई तशी मजेशीरच , पुरुषासारखी पैंट शर्ट घालायची , लांबसडक केसांचा बुचड़ा बांधायची . तात्याला कावाखान्यात भेटायला यायची , ती सायकलवरून.रस्त्यात तिचे खेळ व्हायचे . केसांनी ती दगडाची मोठी शिळा उचलायची . आपलं सारं शरीर लोखंडी रिंगमधून पास करायची . कावाखान्यातील सर्व स्त्री – पुरुष कामाला गेले , म्हणजे शिवातात्या तिला खोलीवर घेऊन यायचा , म्हाताऱ्या बायांना शिवातात्यानं चहापाण्याला पैसे दिले , म्हणजे त्या लांबवर फुटपाथला जाऊन बसायच्या . कसरतीचे खेळ करणारी बाई तात्यापुढे कशी लीन होते , याचीच आम्हां पोरांना गंमत वाटे . ते उघडे नागडे होत . घामानं थबंथवत . भिंतीवरचा आरसा जमिनीवर कोन करून ठेवीत . स्त्रियांच्या दोन मांड्यांत केस असतात . याचं पुढं बराच काळ मला सारखं नवल वाटत होतं .
शिवातात्याच्या आयुष्याची मात्र पुढं शोकांतिका झाली . कसरत करणारी बाई कुठे दिसेनाशी झाली ; कुणास ठाऊक . शिवातात्या मात्र,यामुळं कमालीचा खचला . हसतखेळत असणारा शिवातात्या मुका झाला . घरात झोपायची सतत अडचण व्हायची . आम्ही त्यावेळी फुटपाथला झोपायची . शिवातात्याशेजारीच माझं अंथरूण असायचं . एके दिवशी शेजारी झोपलो असताना लक्षात आलं , शिवातात्या रात्रभर अंथरुणात हातपाय झाडतो आहे . वाटलं . शिवातात्यानं खूपच दारू ढोसली असावी . सकाळी झाडूवाला येतो , तरी शिवातात्या झोपेतून उठत नाही . पांघरूण दूर सारतात . तेव्हा लक्षात येतं , की शिवातात्या मरून पडलेला . त्याच्या तोंडाला फेस आलेला असतो . पंचनाम्यात शिवातात्यानं अफू खाऊन जीव दिला , हे सिद्ध होतं . बराच काळ वाटत राहतं , शिवातात्यानं आत्महत्या का बरं केली असावी ?
असाच एक दुसरा प्रसंग आठवतोय . राहत्या घरासमोरच तीन ताळांची इमारत होती . तळाला विठाबाई नावाची गोरी भुरकी बाई राह्यची . तिचं गोरेपण म्हणजे पांढरं कोड फुटलेलं . तिळभरही कातडीचा रंग नाही . डोळ्यांच्या पापण्याही भुरक्या , पण डोळे मात्र निळसर . पाठीवर रुळणारे , रेशमाच्या रंगाचे पिंगट केस . तिची भरदार शरीरयष्टी . येणारे – जाणारे क्षणभर तिच्याकडे पाहण्यास चुकत नसत . महार समाजात जन्माला येऊनही तिची भाषा , राहणी ही पांढरपेशा समाजातील स्त्रियांसारखी . उन्हातून चालली तर गाजरासारखी लाल व्हायची . तिच्या मानानं तिचा नवरा मात्र खूपच कुरूप . काळ्या आम कातळासारखा . एक डोळा अधू , तोंडावर देवीचे वण . हा दिसायला असा सामान्य असला तरी त्याची मिळकत चांगली होती . हा मोटार मेकॅनिक होता . जेव्हा पाहावं , तेव्हा हा मोटारीखाली आडवा पडलेला दिसायचा . आमच्या सर्व परिवारांच्या घरापेक्षा बाईचं घर खूपच आकर्षक . दरवाज्याला झुलता पडदा . घरात पलंग . कोच , फर्निचर , आरसे लावलेले कपाट . जेवायचं झालं , तर काचेच्या नक्षीदार बशीत , काट्याचमच्यांनी . ह्या घराचा मला लहानपणी खूपच लळा लागलेला . त्याला कारणही होतं . विठाबाईला एवढ्या ऐश्वर्यातही मूलबाळ नव्हतं . त्यामुळे ती माझे खूपच लाड करायची , मूल नसल्यामुळे बाई सतत बेचैन . त्यामुळं तिनं एकदा काय करावं ? चक्क गरोदरपणाचं नाटक केलं – ओटीपोटीवर चिंध्या बांधल्या . पण ही बातमी कावाखान्यात फुटली . सर्व बायांनी तिची शोभा केली .
माझ्यावर तिचा जीव की प्राण . छान छान खायला मिळतं , सिनेमा – नाटकं पाहायला मिळतात ; ह्याचंच खूप अप्रूप वाटायचं . तिच्याबरोबर रॉक्सीमध्ये ‘ खजांची ‘ हा चित्रपट पाहिलेला आजही आठवतोय . घरात कुणी नसलं , म्हणजे ती मला उरीपोटी धरायची . पलंगावर उताणी झोपायची . मला मांड्या चेपायला सांगायची . अशा वेळी ती पातळ वर करीत असे . तिच्या केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या चेपताना मनात मात्र चमत्कारिक काहूर उठायचं . तसं माझं वय खूपच लहान होतं . पण हे सारं बघताना घालमेल व्हायची , एवढं मात्र खरं .
दादांचं आजारपण दिवसेंदिवस बळावत चाललेलं . गावी असल्यामुळं सुरुवातीला त्यांच्या तब्येतीतला बदल हा काही वर्षांपुरताच टिकला , एखादी ज्योत विझताना मोठी व्हावी आणि गपकन विझावी , तसं त्यांचं झालं . मुंबईत प्यालेलं स्पिरिट तसं त्यांच्या आतड्यांपर्यंत आधीच पोहोचलं होतं . त्यात त्यांची दारूची सवय सुटली नव्हती . गावी त्यांच्या आजारपणाचं निदान मात्र कुणाला करता येत नव्हतं . कुणी म्हणत , भुतानं पछाडलं ; तर कुणी म्हणत , करणी केली . त्यांना बहुधा आपल्या आजारपणाचं कारण माहीत असावं . त्यांनी आई – भाऊ ह्यांना भेटण्याचा हेका धरला . ते मुंबईला गेले . दहा – पंधरा दिवसांत आम्हाला ते सीरियस असल्याची तार मिळाली . दादांची अवस्था जाऊन बघतो , तो खूपच केविलवाणी झालेली . सारखे विव्हळत होते . भ्रमिष्टासारखे बडबडत होते . घरच्या समाध्यांचा अंगारा लावण्याचा सपाटा चाललेला . दवाखान्यात अँडमिट करावं , असं कुणाला सुचत नव्हतं . त्यांचं मरण मात्र चिवट . मरताना त्यांचे खूपच हाल झाले . भ्रमिष्टपणात सारखे कपड्यांच्या घड्या एकमेकींवर ठेवून घर बांधायचे . ते पुन्हा पुन्हा कोसळायचं . हातपाय झाडतच त्यांनी एखाद्या कोकरासारखा जीव सोडला . माणूस मरतं कसं , ह्याचं दर्शन जवळून घेत होतो .मरण्यापूर्वी माझ्या बायकापोरांना अंतर देणार नाहीस ‘ असं वचन भावाकडून घेण्यास दादा विसरले नव्हते .
घरात खूपच आकांत झाला . मला चांगलं आठवतंय ; मी मात्र रडलो नाही . सारखं भिटभिट्या डोळ्यांनी बघत होतो . “ अरे , पोराला रडवा , नाही तर दम कोंडून लेकरू मरंल ! ” असं कुणी माझ्याकडे पाहून बोलत होतं . कॅमेरामन आणला गेला . प्रेताच्या सान्निध्यात नातेवाईकांनी आपले फोटो काढावेत , हा कावाखान्याचा रिवाज . आज मात्र ह्या प्रकाराची गंमत वाटते . त्या दुःखातही माणसांची पोझ घेण्यासाठी धावपळ होई . त्या काळचा कॅमेराही मोठा . काळ्या पडद्यावर कॅमेरामन झाकला जायचा . पुढची डबी एका हातानं उघडायचा . चारचौघांत आईच्या गळ्यातील काळ्या मण्यांचं गाठलं तोडलं . त्यात असलेला एक सोन्याचा मणी दादांच्या तोंडात पानाच्या विड्याबरोबर घातला गेला . कपाळावरचं कुंकू पुसून बांगड्या फोडल्या गेल्या . प्रेताला आंघोळ घालायची , म्हणजे दाराची फळी उपटणे . त्यावर आंघोळ घालण्याची प्रथा . कपाळावर चांदीचा बंदा रुपया . नव्या कपड्यावर फुलाफुलांची चादर . ताटी बांधली जाई . रस्त्यानं प्रेतावर उधळण्यास काही सुटे पैसे , उडीद , लाह्या . पुन्हा भूत होऊन येऊ नये म्हणून उडीद उधळीत .
तात्यानं पाणी दिलं . वरळीला महार मंडळींचं वेगळं स्मशान होतं . त्या काळात प्रेताला पुरत . पुरुषभर उंचीचा खड्डा खोदला गेला . खासेवर साऱ्यांनी मूठमूठ माती लोटली . तेरा दिवसांनी खवर केला . माझे डोक्यावरचे केस काढू नयेत , म्हणून मी हट्ट धरला , “ जाऊ द्या , पोराची जात आहे ” म्हणून कोणी आग्रह धरला नाही . कावळ्यानं घास उचलावा , म्हणून किती यातायात . घासाबरोबरच थोडी दारू , विड्याही ठेवल्या गेल्या . मी पिंडाला हात लावला . तेव्हा कुठं घास उचलला . आमचं सारं आभाळ उजाड झालं होतं . विन्मुख होऊन आम्ही गावाची वाट धरली . खऱ्या अर्थानं डोक्यावर आभाळ कोसळलं होतं . दादा लांड्या – लबाड्या करून घरचा चरितार्थ कसा तरी चालवीत होते . आईचं माहेर जवळच दोन मैलांवर . त्यांची शेतीभाती होती . चुलत आजोबा धावत आले , आईनं पुन्हा लग्न करावं , हा आजोबाचा हट्ट . कुणीतरी दुसावट्याचा नवरा . त्यानं आईला पाहिलेलं . आम्ही दोन लहान लेकरं . मी तर मुठीएवढा . बहीण सात – आठ वर्षांची . महारवाडा तर असा – कापल्या करंगुळीवर मुतणार नाही . शिवाय फट म्हणता अब्रूचं खोबरं व्हायचं . आजोबा इज्जतीला जपणारा . आजोबांच्या म्हणण्यावर आई वीज कडाडावी , तशी कडाडली . एक तर माहेराबद्दल तिच्या मनात लहानपणापासून राग धुमसत होता . तिला ही आजोबांची कसाबकरणी वाटली . ” मी काही तुमच्या दारात पडले नाही . मी मोलमजुरी करून माझ्या
क्रमशः
