बलुतं.दया पवार(भाग १४)..

बलुतं..

मी लहानपणी पाहिलेला महारवाडा गेल्या तीस – चाळीस वर्षांत उद्ध्वस्त झाला आहे . पण त्याचं पाहिलेलं लहानपणातील चित्र मी कसं पुसावं ? ते सतत रेंगाळत असतं . मी पाहिलेल्या महारकीत भिकारी वृत्ती नव्हती , एवढं मात्र खरं . महारांना आपल्याला जे बलुतं मिळतंय , ते हक्काचं वाटायचं , पूर्वजांना मिळालेल्या ५२ हक्कांच्या ताम्रपटाच्या दंतकथा अनेक पिढ्या चालत आलेल्या . सर्वांना ह्या परंपरेचा खूपच अभिमान . नाममात्र सारा असलेल्या ह्यांना इनामी जमिनी होत्या . विशेषतः हे पश्चिम महाराष्ट्रातच दिसेल . घराजवळ जो जमिनीचा तुकडा असे , त्याला हाडकी म्हणत . बहुधा ह्या शेतात जनावर सोलल्यावर त्याची हाडं पडत , म्हणून हाडकी म्हणत असत की काय कुणास ठाऊक . गावापासून दूरवर डोंगराच्या पोटाशी जी जमीन असे , तिला ‘ हाडवळा ‘ म्हणत . माझ्या गावची महार मंडळी हा हाडवळा केव्हाच कसताना दिसली नाहीत . असं सांगतात की , माझ्या जन्माच्या पूर्वी महार मंडळी ही कसत . पण लांबच्या पल्ल्यावर असल्यामुळं ही जमीन त्या गावांचं गायरान म्हणून गावची मंडळी वापरीत . त्याबद्दल नाममात्र मोबदला मिळे .

‘५२ हक्कांबद्दल महार मंडळीत अस्वस्थ करणारी आख्यायिका चालत आलेली . पैठणच्या – बेदरच्या मुसलमान बादशहाने हे ५२ हक्क महारांना दिले , असा प्रवाद होता . पुढं विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ‘ ह्या पुस्तकात हा ताम्रपट पाहायला मिळाला . ताम्रपट असा : ” किल्ले पुरंधर येथे शेंदरी बुरजास कामास लावले , तेव्हा काम शेवटास जाईना . सबब बादशहास दृष्टांत जाहला जे , ज्येष्ठ पुत्र व ज्येष्ठ सून अशी उभयता बुरुजांत दिली असता काम शेवटास जाईल . अशा दृष्टांत होताच , बादशहा जागृत होऊन , येसाजी नाईक चिबे यांस वर्तमान सांगितले , तेव्हा येसाजी नाईक म्हणो लागले , ‘ जे मी आपला पुत्र व सून देतो . ‘ मग बहरिनाक सोननाक याचा पुत्र नाथनाक व देवकाई अशी उभयंता आश्विन वद्य अष्टमीस शेंदरी बुरजात गाडली . मग बुरजाचे काम सिद्धीस गेले . ” ‘५२ हक्कां’बद्दल असा हा ताम्रपट असला , तरी महार मंडळीत महारांच्या प्रामाणिकपणाबद्दल दुसरीही एक दंतकथा प्रचलित होती . बादशहाची तारुण्यात असलेली रूपवान अशी मुलगी दिल्लीला पोहचवायची असते . त्या काळात जाताना घनदाट जंगल . वाहनांच्या आजच्यासारख्या सोयी नाहीत . तिच्याबरोबर एका विश्वासू महाराला पाठविण्यात आले . हा महारही तरणाबांड असा ; राजाच्या मुलीला पोहोचवून आल्यानंतर त्याच्यावर दरबारात संशय व्यक्त केला जातो . बहुधा रस्त्यात मुलीला ह्यानं भ्रष्ट केलं असावं , असा आरोप असतो . जाण्यापूर्वी महार तरुणानं एक छोटीशी लाकडी पेटी राजाकडे ” माझी महत्त्वाची वस्तू , आल्यावर परत करा , ” म्हणून दिलेली असते . तो महार तरुण ती पेटी उघडण्यास सांगतो . त्यात त्याचं लिंग आधीच कापून ठेवलेलं असतं . राजा त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल खूश होतो . ” काय हवं ते माग , ” असं तरुणाला सांगतो . महार तरुण म्हणतो , ” मला स्वत : ला काही नको , पण आमच्या जातीला पिढ्यान् पिढ्या पुरेल , असं काही द्या . ” बादशहाने ही ५२ हक्कांची सनद बहाल केली..अशी ही गौरवशाली परंपरा म्हणजे महारकी .

लहानपणी पाहिलेल्या ह्या महारकीची काळजावर रेघ उमटलीय . हा भूतकाळ पुसता पुसत नाही . जाणार असेल , तर माझ्याबरोबरच जाणार . माझ्या चेहऱ्यावरचे हे लाचारीचे जे लेप दिसतात ना , ते तेव्हापासूनचे . आत कितीही खरडा , रक्त निघेल , पण ते पुसले जाणार नाहीत . महाराच्या कामाला तसं काही टाइम – टेबल नव्हतं . सतत चोवीस तास बांधलेला , पडल्या कामाचा चाकर . तिला बिगार म्हणत . ‘ बेगार’चं . रूप असावं . हे काम करायला विशेष अभ्यास किंवा कला नको . महारकीतली काही पिढीजात कामं तशी गळून पडलेली . पण काही कामं मानेवर जू ठेवावं तशी होतीच . गावचा सगळा सारा तालुक्याला घेऊन जाणे , गावात आलेल्या बड्या अंमलदाराच्या घोड्यापुढे धावणे , त्याच्या जनावराची देखभाल करणे , चारापाणी घालणे , दवं देणे , गावात कुणाचं मयत झाल्यास गावोगाव निरोप पोहोचविणे , मेलेले जनावर ओढणे , लाकडे फोडणे , गावाची यात्रा वाजवणे , नवरा वेशीवर ओवाळणे , इत्यादी कामं महारांची होती . ह्याबद्दल मिळायचं काय ? तर बलुतं .

लहान असताना आईबरोबर हे बलुतं मागायला हमखास जायचो . प्रत्येक घराचा करगूटबंद गडी निघायचा . रांडमुंड स्वत : च बाकीच्या महार मंडळींबरोबर मराठ्याच्या खळ्यावर अगर शेतात सुडी पडली असेल तिथं बलुत्याला जायची . बरोबर चवाळं असायचं . पेंढ्या देताना शेतकरी खूपच खळखळ करायचा . म्हणायचा , ‘ ए धेडपटांनो ! तुमच्या आयला , कामाच्या नावानं बोंब आणि बलुतं मागायला सगळ्यांच्या पुढं ! काय बापाची पेंड हाये काय ? ” तेव्हाची महारं काही लेचीपेची नव्हती . चांगली काळीकभिन्न . आडदांड . ती मराठ्यांशी ताठ्यानं बोलायची . गावकरी सुडीचा वरचा भाग देण्याचा प्रयत्न करायचा , तर महार मडळींना खालच्या तळाचं गुड हवं असायचं . खाली दाणेदार गुड असायचं . याची त्यांना जाणीव असे . शेवटी , सुडी उपशीत आली असता महार मंडळी आपलं चवाळ सुडीवर अंथरायची . हे एकदा अंथरलं , म्हणजे गावकरी खाली असेल तेवढं गुड महारांना द्यायचा . पण देताना तो तोंडानं सारख्या शिव्या बडबडत असायचा आणि महार मंडळी काही झालंच नाही ह्या वृत्तीनं भारा बांधायला लागायची .

महारकीच्या कामावरून एक घटना आठवतेय . आख्ख्या गावाचा सारा जमला की महाराला तो तालुक्याच्या गावी घेऊन जावे लागे . त्याला पट्टी म्हणत . ही पट्टी भरली म्हणजे कचेरीतल्या कारकुनाकडून पोहोचपावती घ्यावी लागे .अशीच एकदा शेजारच्या खेड्यातून एक विधवा म्हातारी पट्टी भरायला आलेली . बिचारी भोळी म्हातारी . कारकुनाला पट्टी देते ; पण पावती घ्यायची ती विसरून जाते . कारकुनही माणुसकीला जागत नाही . दुसऱ्या दिवशी म्हातारी पावती घेण्याकरिता कचेरीत धावत – पळत येते . कारकून ब्राह्मण असतो ; ताकास तूर लागू देत नाही . म्हातारी दोन्ही हातांनी आपलंच तोंड झोडीत गावाला परत जाते . अर्थात पैसे खाण्याबद्दल तिच्यावर रीतसर खटला होतो . म्हातारी पुष्कळ गयावया करते . माय पांढरीचे पाय धरते . पण कुणालाच तिची दया येत नाही . सर्व लोक तिची छी : थू करतात . तिला हातकड्या घालून तालुक्यात आणलं जातं . पट्टीचे पैसे खाल्ल्याचा गुन्हा कोर्टात सिद्ध होतो . कचेरीतला कारकून हात वर करून मोकळा होतो . दोन – तीन महिन्यांची सजा काटून ती परत येते .. असाही कधी महारकीच्या कामात जीवघेणा प्रकार व्हायचा .

एकदा बलुत्यावरून गाव आणि महारवाडा ह्यांत चांगलाच वाद पेटला . त्याचं असं झालं . परंपरा अशी होती , की गावातून बलुतं आलं , की लगोलग पेंढ्यांची वाटणी व्हायची . आपली किती मिळकत महारांना जाते , याची गावकऱ्यांना जाणीव व्हायची नाही . जशी कुत्री – माजरं जगतात , तशी महारंही , असा गावकऱ्यांचा साधा हिशेब . शिवाय महारापोरांनी खाल्लं की पुण्य लाभतं , हाही समज रूढ होताच . गावात महार असणं हे गावकरी भूषण समजत . एका गावची गोष्ट सांगतात . महार मंडळी गावच्या जाचाला कंटाळून परागंदा होण्यास निघालेली . गावकरी शिवेवर त्यांना आडवे झाले . त्यांची समजूत काढली आणि महार मंडळींना सन्मानानं घेऊन आली . गावात महार नाही , म्हणजे गावकऱ्यांना बहुधा अरिष्ट येण्याची भीती वाटत असावी . अशी ही घटना . तेव्हा तुटेपर्यंत महार आणि शेतकरी ह्यांत ताणलं जायचं नाही .

एका वर्षी गावच्या महारांनी ठरवलं , की औंदा काही वाटण्या करायच्या नाहीत . भोवतालच्या गावांना भंडारा घालावयाचा त्यांचा बेत असतो . अर्थात जेवणास महार मंडळीच येणार असतात . गावाजवळच्याच हाडकीत महारांच्या बलुत्यांची टोलेजंग सुडी रचली गेली . गावच्या पाटलाचीही एवढी टोलेजंग सुडी नव्हती . सर्व गावकऱ्यांचे डोळे फिरले . ” आपल्याच कष्टावर ही म्हारं माजली ” हा गावात सूर उमटला . झालं . पुढच्या वर्षी महारांना बलुतं बंद झालं . महारांची पंचवीस – तीस घरं आणि दीड – दोन हजारांचा गावचा उंबरा ; तशी ही विषम लढाई होती . गावात एकुलतं एक चांभाराचं घर होतं . पण महारांच्या भांडणात ते कधीच पडत नसत . त्या घराचा मोटनाड्याचा व्यवसाय गावावर अवलंबून होता . त्या मानानं महारवाड्यातील काही कुटुंब खूपच तालेवार , काहींच्या दारी खिल्लारी बैलांच्या गाड्या , घरात दूधदुभतं . ह्यांचा कोकणात हेड्यांचा धंदा होता . भोवतालच्या गावातून चांगले वळू , डांगी बैल हे खरेदी करत आणि घाटावरून उतरून विकण्यासाठी कोकणात जात .

लहानपणी पाहिलेली महार मंडळी आठवतात . खूप उंच – धिप्पाड , काळीकभिन्न . ह्यांना सारा गाव चळाचळा घाबरायचा . घावरण्याचं कारण म्हणजे ह्यांच्यापाशी असलेली विद्या- म्हणजे ‘ सोमा महार . ‘ हे एक प्रकारचं विष होतं . एकदा उमाआज्याकडं पाहिलेलं . छोट्या पुरचुंडीत बांधलेलं होतं . पांढरेशुभ्र होतं . महारांनी हे अस्त्र एकदा उपसलं , की गावातली गुरं पटापट मरत . आता हे अघोरी काम होतं , पण तो धनदांडगा महारांना छळायचा त्याच्या विरुद्ध हे अस्त्र पाजळलं जायचं . काय करीत होते महार ? एखादा जोंधळ्याचा गोंडा किंवा भाकरीचा लगदा ह्यात ते विष मिसळलं जायचं . आणि महारवाड्यातील मुठीएवढं पोरगही ते काम करी . महार एका दगडात दोन पक्षी मारत . विरोध करणाऱ्याचा काटा ढिला करायचा आणि जनावराची सागुती , त्याचं कातडं महारांना मिळायचं . एखाद्या वेळी महारांची जिरवायची म्हणून जनावरं महारांना न देता गावकरी शेतात खास खड्डा खोदून पुरून टाकीत असत .

ह्या प्रश्नावरून गाव मात्र कधी एक व्हायचा नाही . महारवाड्यासारख्याच गावातील फळ्या . दोन फळ्या तर जबरदस्त होत्या . त्या केवळ आडनावावरून पडलेल्या . आवारी आणि पापळ . आवारी हे बहुसंख्य , तर पापळ गावात कमी संख्येनं . त्यामुळं आवारी ह्यालाच पाटलाचा मान . पोळ्याच्या सणाच्या वेळी , यात्रेच्या वेळी हे आवारीच पुढं . पापळ हे बाहेरून आलेले . उपरे म्हणून आवारी त्यांना वागवीत . पापळ आले तेव्हा त्यांनी येताना एक महार आणला . तोच म्हणजे आमच्या गावातील रूपवते . आम्ही पवार मंडळी आवाऱ्यांकडे येसकर – पाळी , बलुतं मागायचो , तर रूपवते मंडळी पापळांकडे . ढोर मात्र कुणाचं का मेलेलं असेना , ते एकत्रच फाडत . अर्थात , त्याच्याही पाळ्या असत . गावातली मंडळी बिघडली , थोडीशी जरी कुरकूर झाली , तर महार मंडळी आपसांतली वेदिली विसरून लगेच एकत्र होत . ढोरं फाडण्याच्या लखलखीत सुऱ्या चावडीच्या कोपऱ्यात रचून ठेवल्या जायच्या . ‘ एकेकाचं टेंढाळच फोडतो ‘ असा आक्रमक पवित्रा महार घेत . त्यावर गावकरी महारांवर बहिष्कार पुकारीत . गाव बंद . रस्ता बंद . मोलमजुरी बंद . अशा वेळी गावातलाच एखादा शहाणासुरता माणूस मांडवलीचा प्रयत्न करायचा .

मांडवलीचा एक प्रकार आठवतोय . गाव आणि महारवाडा ह्यांत विस्तव जात नाही . महारवाड्याच्या हद्दीवर दगडांच्या – गोट्याच्या राशी रचून ठेवलेल्या . प्रत्येक ढिगाऱ्यावर प्रत्येक घरातील बाई कंबर कसून उभी राहिलेली . आता गावात खूनखराबा होईल , म्हणून महारांना देवळावर बोलावलं जातं . उघडीबंब , फाटक्या तुटक्या कपड्यांतली माणसं खांद्यावर लखलखत्या सुऱ्या घेऊन देवळापुढील पटांगणात जाऊन उभी राहतात . पाटील – कुलकर्णी आणि गावातील वजनदार मंडळी देवळात बसलेली . तिथूनच संवाद सुरू होतो :

क्रमशः

(स्त्रोत:दया पवार यांच्या बलुतं कादंबरीतून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading