बलुतं.दया पवार.(भाग १५).

बलुतं..

” तुम्ही स्वत : ला समजता कोण ? ” तरणाबांड काळ्या कुळकुळीत शरीराचा धिप्पाड काशाबा उत्तर देतो , ” आम्ही राजे आहोत ! ” ‘ कुणाचे ? ” ” आम्ही आमचेच राजे आहोत ! ” अर्थात त्या दिवशी काही मांडवल होऊ शकली नाही . पाण्याच्या वाटेवरून झालेला वाद मात्र खूप दिवस धुमसत होता .

गावाच्या पश्चिमेला महारांची विहीर . पाणी आणावयास जायचं असेल , तर गावातूनच – तेही मारुतीच्या देवळासमोरून – जावं लागे . महारांच्या खालच्या अंगाला गावची विहीर होती . त्या विहिरीपाशी लोकल बोर्डाची पाटी होती . तिच्यावर लिहिलेलं असायचं : ” ही विहीर सर्व जाती – धर्माच्या लोकांना खुली आहे . ” पण महार मंडळी त्या विहिरीवर केव्हाच दिसली नाहीत . महारांच्या विहिरीला मुबलक पाणी होतं , तेही काळंभोर . खूपच रुचकर . उन्हाळ्यातही माठातल्या पाण्यासारखं थंडगार . मला तर लहानपणी सतत वाटायचं , हे खळगुटे एवढे येडे कसे ? खरं म्हणजे आमची विहीर ही उंचावर आणि गावची विहीर खोलगट भागात . आमच्या विहिरीचं पाणी झिरपून त्या विहिरीत जात असावं . पण मला जे त्या लहान वयातही सुचत होतं , ते मराठा मंडळींना सुचणं शक्य नव्हतं . चांभार मात्र आमच्या विहिरीचं पाणी कधीच पीत नसत . त्यांना महारांच्या पाण्याचा बाट लागायचा . चांभार कुटुंबातील स्त्रिया मराठ्यांच्या विहिरीवर हंडाभर पाण्याची भीक मागत तासन् तास बसायच्या . मनाचा खूपच कालवा व्हायचा . गावाच्या विहिरीला छान फरशी होती . चाक गरगरत असायचं . त्याचा आवाज सतत कानांवर आदळायचा . आमच्या विहिरीला मात्र रहाट नव्हते . कठड्यावर उभं राहूनच पोहऱ्यानं पाणी शेंदावं लागे . उन्हाळ्यात दुपारी विहिरीवर जाऊन तासन् तास पाणी उपसून अंगावर घेणं हा आमच्या वयाच्या पोरांचा आवडता उद्योग होता .

पाण्याला जाता येता महार बायकांची सावली मारुतीवर पडते , देव विटाळतो , म्हणून एकदा गावकऱ्यांनी वाट बंद केली . विहिरीवर दुसऱ्या मार्गानं जायचं म्हणजे तळ्याच्या काठानं चिखलातून वाट तुडवायला लागायची आणि तीही मैलभर लांबीची . महारांनी ही वाट खुली करावी म्हणून गावाशी झुंज दिली . कोर्ट – कचेऱ्या झाल्या . ” आमची वहिवाट आम्ही सोडणार नाही ; वाटलं तर तुम्ही मारुतीला दुसरीकडं बसवा . असा आक्रमक मुद्दा महार मंडळी मांडत . हे भांडण चालू असताना एक चमत्कार झाला . तालुक्यात ह्याच दरम्यान एक ख्रिश्चन मामलेदार बदलून आलेला . हा खिश्चन मामलेदार दुसरा – तिसरा कुणी नसून एका काळचा महारच होता . महार मंडळींच्या दुखण्याची कळ त्याला समजली . महारांना न्याय द्यायचा हे त्याच्या मनात ठसलं . महार एकदा का खिश्चन झाला , म्हणजे त्याचा बाट गावाला लागायचा नाही . खिश्चन माणूस अधिकारी असला , म्हणजे मग विचारायला नको . सारा गाव त्याच्या सेवेला रुजू . धामणगावाला भेट द्यावी , आमचा प्रश्न धसास लावावा , म्हणून महार मंडळींनी मामलेदाराची भेट घेतली . आज तालुक्याचा मामलेदार म्हणजे किस झाडकी पत्ती म्हणून वागवितात , पण तो काळ म्हणजे ब्रिटिशांचा . मामलेदाराची गावाला भेट ठरली . ख्रिश्चन मामलेदारांनी जाहीर केलं की , ‘ मी काही गावात उतरणार नाही . ‘ महारांच्या चावडीवरच त्यांनी बैठक बोलाविली . आयुष्यात प्रथमच मामलेदार महारवाड्यात येणार . महारांना कोण आनंद झाला . गुढ्या – तोरणांनी त्यांनी महारवाडा सजवला . चावडीला रंगरंगोटी केली . महार मंडळींनी मामलेदारांचं वाजंत्री लावून स्वागत केलं . भारी किंमतीचा जरीचा पटका बांधला . पाटील – तलाठी महारवाड्यात येऊन सरबराई करू बघत होते . गावच्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली , तीही चावडीवर . मामलेदार गावात न येता महारवाड्यात उतरतो , हा गावकऱ्यांना घोर अपमान वाटला . पण राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं , तर न्याय मागायचा कुठं ? सारी मंडळी नाक मुठीत धरून महारवाड्यात आली . गावातल्या चार – पाच म्होरक्या मंडळीवर केसेस भरल्या गेल्या . सर्वांच्या माफीच्या सह्या घेतल्या गेल्या . पुन्हा महारांना त्रास देणार नाही , वाट बंद करणार नाही , असा लेखी जबाब प्रमुख म्होरक्यांकडून लिहून घेतला काळ जावजीबुवाकडे एका पत्राच्या नळकांड्यात हा लिहून घेतलेला जबाब होता .

जावजीबुवा त्याला प्राणापलीकडे जपे . पुढं मी जेव्हा शिकलो – सवरलो , तेव्हा जावजीबुवा मला हे सारं काढून दाखवी . माझ्याकडून वाचून घेई . त्याला मुचलका असं काहीसं तो म्हणे , त्याची छाती अभिमानानं नुसती फुलून गेलेली दिसायची . सोन्याच्या मोहरांचा पिढीजात हंडा आपल्या वारसांकडे द्यावा , तसा त्यानं मरताना हा ठेवा आपल्या मुलाकडे ठेवला आहे .

” मेलेल्या ढोराचं मांस तू खाल्लेलं आहेस काय ? खरंच , कशी काय चव असते ? ” असा प्रश्न अलिकडेच ‘ साहित्य सहवास मधील एका विचारवंतानं मला विचारलेला होता . त्या वेळेस मी गुदमरलो होतो . बावचळत बोललो , ‘ ज्या वयात मी हे मांस खाल्लं , त्यावेळी चव आठवण्याचं वय नव्हतं . पोटाचा खड्डा भरणं , एवढंच जाणत होतो . दुष्काळात विश्वामित्रानं कुत्र्याची तंगडी खाल्ली किंवा महायुद्धाच्या वेळी मराठा पलटणीनं घोड्याचं मांस खाल्लं , म्हणून मी माझ्या खाल्लेल्या मुर्दाड मांसाचं समर्थन करणार नाही .

ढोर मेलं म्हणजे महारवाड्यात नुसतं चैतन्य सळसळायचं , एवढं मात्र खरं . त्यात बैल जर कड्यावरून मरून पडला असेल , तर जादाच . असा बैल हा जादा ताजा असायचा . रानात कुठं ढोर मेलंय याची चाहूल महारवाड्यात यायला वेळ लागायचा नाही . आजच्या टेलेक्सपेक्षा त्या बातमीला वेग होता . आभाळात घारीगिधाडं विमानासारखी एकाच दिशेनं घिरट्या घालू लागली , म्हणजे नेमकी पड कुठं पडलीय हे महार मंडळी हेरायची . गिधाडांनी पडीची नासधूस करू नये म्हणून त्यांची धावपळ चालायची . गिधाडं तरी केवढी ? सहज पाच – पन्नासांचा घोळका . पंख फडफडत , तोंडानं मचाक मचाक आवाज करीत नुसता कलकलाट व्हायचा . अण्णाभाऊ साठे ह्यांनी त्यांच्या एका गोष्टीत गिधाडांना मखमली जाकिट घातलेल्या सावकारपुत्राची उपमा दिली आहे . दगड फेकला , तरी थोडा वेळ दूर उडून जातील ; पुन्हा लोचटासारखी पडीच्या दिशेनं सरकतील . त्यांना बहुधा महार मंडळींचा खूपच संताप येत असेल . त्यांच्या तोंडातला घास महार मंडळी हिसकावून घेत होती ना ! गिधाडांचे हिंस्त्र डोळे , त्याच्या धारदार चोची ! मला वाटायचं , माझाच पिच्छा करतात की काय ? ” बरेच दिवस महारवाड्यात वश्याट नाही . तोंडाची कशी चव गेलीय ” असं म्हणत म्हातारी माणसं खूपच खूष दिसायची . घरात असतील – नसतील तेवढी भांडी , पाट्या , घमेली , पराती घेऊन माणसं धावायची . कातडं सोलीपर्यंत त्यांना दम नसायचा . त्यात बायांचा कालवा फार . आमच्या वयाची मुलं मात्र वेगळ्या कारणासाठीच खूप असायची . कातड्याला लागून पातळ चिलबाटाचा थर असायचा . त्याच्या साह्यानं डफडी , ढोलकं बनवता यायचं . तवलीचा कचकोल किंवा रिकामा चिनपाट त्याला पुरे , चिलबाट ताणून बसवायचं आणि उन्हात वाळवायचं . एक – दोन दिवसांनी चर्मवाद्यासारखे सूर उमटायचे .

मेलेल्या ढोराला खांदा देणं हे काम म्हणजे आईचं दूध आठवणारं . प्रचंड मोठं लोढणं दोन माणसांनी खांद्यावरून वाहून आणायचं . जनावराचे चारी पाय करकचून बांधणे आणि त्यातून सुई ओवतात तसे लाकडी गुळगुळीत दंडाळ आरपार ओवणे . एखादी पालखी घेऊन जावी , तसं ते दृश्य दिसायचं . गाय असेल , तर तिचे केविलवाणे डोळे आकाशाकडे लागलेले बघताना पोटात कालवाकालवच व्हायची . आजही ते डोळे आठवतात . आईच्या आणि गाईच्या डोळ्यांत मला कमालीचं साम्य दिसायचं . आमच्या घरावर पाळी आली , म्हणजे ढोर वाहण्याचं काम आईवर यायचं . आईची ती दमछाक पाहवायची नाही . वाटायचं , आपण थोडं मोठं असतो , तर किती बरं झालं असतं । आईचा भार खांद्यावर झेलला असता .

कुठल्याही गोष्टीचे वाटे घालण्याची महारवाड्यात परंपरागत पद्धत आलेली . आणेवारीच्या हिश्श्यात ते बोलत . एक महारवाडा म्हणजे बंदा रुपया . त्यात कुणाच्या हिश्श्याला आठ आणे , तर कुणाच्या हिश्श्याला दिडकी , अशी विषम वाटणी . त्यात  समाजाच्या व्यवस्थेचच प्रतिविव दिसे . ज्या घराण्याचा विस्तार फैलावला असेल , त्यांच्या वाट्याला कमी हिस्सा यायचा . त्यांचे घरभावच त्यांच्या हिश्श्यात वाटेकरी असायचे . ज्यांचा महारवाड्यात मोठा वाटा त्यांचा खूपच मान – सन्मान . थोरलं घर म्हणून त्यांना ओळखायचं . आमचा दोन आणे हिस्सा होता . पैसा – दोन पैसा हिस्सा असणारे- त्यांचे हाल कुत्रा खात नसे . काहींच्या घरात अर्धं जनावर जात असे , तर कुणाच्या घरी आतडी , पारखंड – निकृष्ट माल . जनावरांची वाटणी गुडशांप्रमाणे होई . गुडसा हा काय शब्द आहे , म्हणून कुतूहल वाटेल . लक्ष्मीबाईना टिळकांच्या आत्मचरित्रात हा गुडसा शब्द आलेला . मराठी सारस्वतांना पण ह्या शब्दाचा अर्थ लागला की नाही , कुणास ठाऊक ! पण लक्ष्मीबाईंना ठाऊक होता . महार,ख्रिश्चनांना ओळख होती ना ? तेथे पाहिजे जातीचे , हेच खरं . काय सांगत होतो ? गुडसा प्रकरण . जनावरांच्या शरारातील हाडांचं हे नाव . काही गुडशांची नावं आजही आठवतात . कमरेजवळची मांडी तो धाऱ्या , घोट्यापासून वर तो चाकळ्या , आणि गुडघ्यापासून वर तो मेट्या . ह्या गुडशांवरून महारवाड्यात भांडणं होत . कधी मारामाऱ्या . बाया एकमेकींच्या झिंज्या उपटीत . त्यात आईमाईचा उद्धार . आजही ह्या समाजाचं भांडण म्हणजे गुडशांचं भांडण . सत्ता – स्पर्धेचं भांडण . भेगू असलेला गुडसा कुणाला मिळावा ? जाऊ दे .

विषयांतर झालं . तर काय सांगत होतो ? गुडसा प्रकरण . शिव्याही तशाच . शिंगटापासून सुरुवात करील ते शेपटापर्यंत खाईल , अशा शिव्या . ह्या गुडशांवरून लहानपणी पाहिलेल एक दृश्य आठवतंय . महारवाड्यात उंच असा एक खडक आहे . त्या खडकात ठायीठायी भांड्याच्या आकाराचे खोलगट मऊसूत भाग कोरलेले . लाकडी पाळं असावेत , तसे . काही म्हातारी मंडळी त्याच्या लहानपणाच्या आठवणी सांगायची . म्हणायची , ” ह्या खडकावर आम्ही जेवायला बसायचो . खोलगट भागात खडकावर भेगू असलेले गुडसे ठोकायला मजा यायची . काय तेव्हाचे गुडसे ! सारखी भदभदा धार लागायची . ” का कुणास ठाऊक , मला शाळेतलं इतिहासाचं पुस्तक आठवायचं . गुहेच्या तोंडाशी बसलेला आदिमानव . भोवताली अग्नी पेटवला आहे . आख्खं जनावर विस्तवावर भुरळलं जातंय . दातांनी लचके तोडतोय . त्या माणसाशी कुठं तरी नातं जोडलेलं आहे , असं वाटत राहायचं .

महार मंडळी भादव्याची पूजा करीत . हा भादवा कसा आला , ह्यासंबंधी चमत्कारिक दंतकथा चालत आलेली . तवलीत पिठाचे उंडे उकडणे आणि त्यांनी पूजा बांधणे हा प्रकार . गोष्ट सांगतात , की कोणे एके काळी गावातल्या पाटलाचा बैल महारान मारलेला . महिना भाद्रपदाचा . भाद्रपदात महार मंडळींचे खाण्यापिण्याचे खूपच हाल

क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या आत्मचरित्रातुन.)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading