बलुतं..
हाक मारतो . तो एकदम दचकतो . मला पाहून तो खूपच खजील होतो . मला तो आता साहेब समजत असतो . फारसं बोलतच नाही . त्याचं सारं चैतन्य जसं काय कोणी शोषून घेतलंय . माझ्याकडे नुसता एकटक बघत राहतो . पुढच्या स्टेशनवर गाडी जेव्हा थांबते , तेव्हा तो लगेच उतरून चालू लागतो . माझ्या लक्षात येतं , पायाच्या जखमांमुळं त्याला चालता येत नाही . तो जवळ जवळ खुरडतच चालू लागतो . ट्रेन दूर जाईपर्यंत प्लॅटफॉर्मवरच्या त्याच्या कमी कमी होत जाणाऱ्या ठिपक्याकडे मी पाहत राहतो . त्या रात्री मला झोप लागत नाही . हरीचा केविलवाणा चेहरा रात्रभर आठवत राहतो .

हरीला दोन भाऊ होते . थोरला दामू आणि धाकटा भावक्या . ह्या तीन भावांपैकी फक्त हरीलाच कसा महारोग चिकटला , ह्या विचारानं तसा मी बराच काळ हैराण . दामू लक्षात राहिला तो वेगळ्याच कारणामुळं . महारोग्यांची पोरं म्हणून त्यांना भोवताली ओळखलं जायचं . तेव्हा त्याच्या लग्नाचा तसा बिकट प्रश्न . ह्या घरात कुणीही जातवाला आपली लेक – बाळ देण्यास धजावत नसे . दामूला कुणी ‘ दामू ‘ म्हणून हाक मारलेली आठवत नाही . सारे त्याला दाम्याच म्हणत . हा दाम्या तसा अंगापिंडानं वयात आलेला . शरीरातील घुसमटलेली वासना बहुधा त्याल छळत असावी . हा राहायचाही घाणेरडा . हातावर धुंकून दोन्ही तळहातावर घासणे ही त्याची लकब . पाहणाऱ्याला ह्या कृत्याची किळस यायची . हरी गावकऱ्यांची गुरं राखोळीला घेऊन जायचा . तर हा दाम्या गावच्या घोड्या वळायचा . तालेवार असामी आवडीनं घोडे पाळीत . त्यात घोडीच जादा पसंत . आमच्या लहानपणी गावातल्या बामणाची घोडी खूप प्रसिद्ध . बामण तिल अंधारी द्यायचा म्हणतात . काळीजर्द – अंगावर माशी बसू द्यायची नाही . बामण तिला दारू , अंडी पाजतो , असा प्रवाद होता . एकदा निघाली की , रस्त्यात थरकायची . गोरापान बामण हातात छडी घेऊन तिच्यावरून वाऱ्यासारखा जाताना दिसे . बामणाच्या घोडीशी स्पर्धा करण्याकरिता पाटील मंडळीही घोडी पाळत . ह्याच दोन – चार घोड्या घेऊन दाम्या त्यांना धोंडाळीवर चरायला घेऊन जायचा . ह्या पैकी एका घोडीवर बसण्याचा मी लहानपणी प्रयत्न केलेला . कळवा सोडून त्यांचा लगाम करण्याचं मला हरीनं शिकवलेलं असतं . पण घोडीच्या पाठीमागे उभा राहिलो आणि घोडीनं मागच्या लाथा अशा काही झाडल्या की आईचं दूधच आठवलं ; दूरवर फेकला गेला होतो . एक दिवस गावात दाम्याबद्दल बोंबाबोंब झाली . दाम्या घोडीला नाल ठोकतात तसं खाली पाडतो , तिचे चारी पाय करकचून बांधतो आणि संभोग घेतो , ही ती बातमी . एवढं मोठं जनावर दाम्या बाईसारखं कसं वापरतो , याचा आम्हा मुलांना अचंबा वाटायचा . काही मुलं सांगत , ” अरे , हा घरातही घोडी आणतो . आपल्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर हुसकतो आणि तिथं हा घाणेरडा प्रकार करतो . ” धोंडाळीवर उंच दगडावर उभा राहून … घोडीला उभा करतो अशीही बोंब होती . पण तेव्हापासून गावातील येणाराजाणारा त्याला ‘ घोडीझव्या दाम्या ‘ म्हणून खिजवीत असे आणि तो मात्र म्हणणाऱ्याकडे निर्लज्जपणे पाहत हसत असे . त्या हसण्यापाठीही मला वेदना दिसायची . पाटील मंडळींनी मग एक केलं . तेव्हापासून घोडीच्या मायअंगाला बाळी टोचली .
दामूच्या लैंगिक विकृतीची ही घटना , तर दुसऱ्या टोकाला सीताची घटना . वासना आतल्या आत कोंडल्यामुळं तिची हिस्टेरियाची भयानक केस झालेली . अर्थात त्या काळी हिस्टेरिया हा काय प्रकार होता , हे समजत नव्हतं म्हणा . पण सीताला नवऱ्यानं सोडलं आणि तिला वेडाचे झटके येऊ लागले . तरुण वयात आलेली पोरं पाहिली की सीता बेभान व्हायची . लैंगिक हावभाव करायची ; चक्क लुगडं फेडायची आणि रानोमाळ पळायची . तिचे नातेवाईक तिला घरात कोंडून ठेवत . तिच्या नवऱ्यानं मुंबईला दुसरी आऊ ठेवलीय आणि सीताला तो नांदवायला नेणार नाही , हे जसं सीताला समजलं तसं तिचं वेड जास्तच झालं . गावानं काय करावं ? चक्क तिला डाव देण्याकरिता साखळदंडांनी मारुतीच्या देवळापुढं बांधून आणलं . स्त्रियांनी नागडं फिरणं म्हणजे त्यांच्या इभ्रतीला तो डागच होता . तिला वेडाचा झटका आला म्हणजे एक – दोन पुरुषांनाही ती सहज हेलपाटत असे . डाव देण्याचा प्रकार म्हणजे खूपच अमानुष . आठवला की अजूनही अंगावर सर्रकन् काटा उभा राहतो . गावात एक म्हातारा माणूस डाव देण्याकरता प्रसिद्ध होता . लांबलांबचे लोक त्याला डाव देण्याकरता आमंत्रण देत . फाशीचा दोर ओढणारा एखादा शेवाळलेल्या काळजाचा माणूस असावा , तसा तो मला दिसायचा . डाव देताना वेड्या माणसाच्या बाजूलाच खैराच्या लाकडाची धुनी पेटवली जायची . त्यात लोखंडी सळ्या लालजर्द तापविल्या जात . डाव देणारा हातात पेटती सळई घेऊन उत्साहानं पुढे सरसावयाचा . डाव कसे देतात हे बघण्यासाठी भोवताली गर्दी जमलेली . ह्याच गर्दीत मीही श्वास कोंडून उभा . सीताला जेव्हा माथ्याला , दोन्ही कानाजवळ , आखाळ्यांना आणि पायाला घोट्याजवळ डाव दिले गेले , तेव्हा तिनं आकाशभर मारलेल्या किंकाळ्या अजूनही आठवतात . पैशाएवढ्या जखमा झाल्या . डाव दिल्यावर एरंडाच्या पानांवर तूप लावून जखमेवर थंडावा देण्यास मात्र ते विसरले नव्हते . एवढं होऊनही सीताचं वेड गेलेलं नसतं . ती जादाच वेडी होते . सीतासारखे डाव शंकरला का बरं देत नाहीत , याचंही कोडं वाटायचं .
मी पाहिलेलं खेड्यातील नीतिशास्त्र वेगळंच होतं . महारवाड्यातील काही तरुण श्रीमंत शेतकऱ्यांकडे सालानं होते . अशा वेळी त्यांचा मराठा बायांशी हमखास संबंध यायचा . ह्या स्त्रिया त्यांचा उपभोग घेत ; पण त्यांना पाणी वाढताना किंवा भाकरी देताना वरून देत . त्या स्त्रियाही त्यांचा बाट धरीत , ह्या प्रकरणाची गंमत वाटायची . तर ठाकर मंडळींचं नीतिशास्त्र वेगळंच . त्यांचा कारभार बराचसा खुल्लम खुल्ला . अशा वेळी एखाद्या मुलीला परपुरुषापासून दिवस गेले , हे ठाकरांच्या पंचांना समजलं तर त्या मुलीला पंचांत आणलं जायचं . त्या वेळी असाच ऐकलेला एक फैसला आठवतोय . मुलगी चक्क म्हणाली , ” कुडाकडं केलं मायअंग – त्यात किडूक गेलं की काडूक गेलं , हे मला काय ठावं ? ” अशा वेळी पंचांची बोलती बंद व्हायची . तिला निर्दोष सोडलं जायचं . कधीकधी पोरं मांडीवर असायची , तिचं लग्न व्हायचं . मुलाचा बाप कोण , असा फालतू प्रश्न नवरा विचारायचा नाही .
न्यायनिवाड्यावरून आठवलं . त्या घटनेला मी साक्षी होतो . जे पाहिलं , ऐकलं , त्याचा माझ्या मनावर अजूनही खोलवर परिणाम झालेला . पांढरपेशा समाजाच्या नीतीच्या कल्पना म्हणजे , बाहेर वास उडू देऊ नये . अशामुळे चार भिंतींच्या आत एखादी घटना झाली , तर ती आतल्या आत बुझली जाते . तिचा समाजात बभ्रा होत नाही . पण महार समाजात एखाद्याच्या घरात असं काही झालं तर प्रथम घरातील सासूच अंगणात उभी राहायची . महारवाड्याला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात गर्जायची , ” काय गं , सटवे ! कुठं शेण खायला गेली होतीस ? ” त्या वेळीही अशीच एक चमत्कारिक घटना महारवाड्यात झालेली . सुनेनं काही वाईट प्रकार केलाय असं नव्हतं . त्या घटनेत सासराच सुनेच्या अंथरुणावर गेलेला . सून खूप नेकीची असते . नवरा नोकरीनिमित्त मुंबईला . मुंबईला राहावयास घर मिळत नाही . त्यामुळं नुकतंच लग्न झालेल्या बायकोला तो मुंबईला नेऊ शकत नव्हता . सासरा विधुर , चारचौघांत बसणारा – उठणारा . ज्या रात्री सासरा अंथरुणावर येतो , त्याच रात्री सून बोंब मारून उठलेली . सकाळीच स्वत : च्या माहेराला निरोप पाठवते . नवऱ्याला तार करून बोलावलं जातं . सारी मंडळी त्याचा निवाडा करायला पारावर बसलेली . महारवाड्यातील कर्त्या जावजीबुवानं विषयास तोंड फोडलेलं . ह्या गोष्टीचा निर्णय काय लागतो , म्हणून भाऊबंद जमा झालेले . जावजीबुवानं सांगितलेली गोष्ट अजूनही आठवतेय . जावजी सांगतो ,
” एक राजा असतो . त्यानं दरबारात एका रुमालात गारगोटी बांधून आणलेली . दरबारात सारे सरदार – पंडित उपस्थित . तो सांगत असतो . ‘ बघा हो ! गारगोटी किती बिलबिलीत ! ‘ सारे गार चाचपून माना डोलावतात . एक चतुर माणूस निर्भयतेनं म्हणतो , ‘ महाराज , गारगोटी नाही बिलबिलीत , भीड बिलबिलीत !
‘ त्यावर जावजीवुवा सर्वांच्या तोंडाकडं पाहतो . आपण प्रश्नांची दांडी पाडलीय , असा जावजींचा समज असतो . पण नवरामुलगा हा प्रश्न वेगळ्याच पद्धतीने हाताळतो . तो म्हणतो ,
” ही मी जी बायको केली आहे , ती माझ्यात आणि बापात समाईक केली आहे . मी काही म्हाताऱ्या बापाला दुखावणार नाही . पायजे असेल तर सासऱ्यानं मुलगी घेऊन जावी .
” ह्या उत्तरानं सारेच दिपून जातात . पुढं काय बोलावं ते कुणालाच सुचत नाही . आपण न्यायनिवाडा करू असं जे पंचांना वाटतं , ते त्या दिवशी हिरमुसतात . सासरा काय समजायचं ते समजतो . मी मात्र दिलेल्या निर्णयामुळं अंतर्मुख होतो ; शेवटी अशा प्रश्नाकडे पाहण्याचा हाही एक दृष्टिकोण असू शकतो . त्या दिवशी त्या माणसानं असा जगावेगळा निर्णय कसा बरं दिला , हे धारिष्ट त्यानं कसं बरं मिळवलं , हा प्रश्न माझ्या मनात बराच काळ सतावत राहिला , हे मात्र खरं .
मेहेत्तरांवर खजील होण्याचा प्रसंग तसा अनेकदा यायचा . आता सुदामबुवांचंच बघा ना . येसकर – पाळी बंद , असं जरी ठरलं गेलं , तरी सुदामबुवा गावात जाऊन पीठ मागायचा . झ्याट कुणाचं ऐकायचा नाही . म्हणायचा , ” मग पोसा मला आणि माझ्या बायकोला ! ” सुदामबुवा म्हणजे महारवाड्यातील वल्ली होती . त्याच्या एका हाती चिपळ्या आणि दुसऱ्या हाती तंबोरा . तो गावात जाऊन एकतारीवर भजन म्हणायचा . सुदामबुवाला मूठ मूठ पीठ मिळायचं . त्याचा पेहरावही तसा गमतीदार . डोक्याला लाल पागोटं , कपाळाला शेंदराचा टिळा , गळ्यात विठोबाची माळ . वशाट खाताना ती तो माळ घटकाभर खुंटीला लटकावून ठेवायचा . त्याचा अंगात बाहीजवळ फाटलेला जुना – पुराणा कोट . कोटाच्या आतल्या खिशात ‘ मावशी ‘ असायची . मावशी म्हणजे चिंध्यांची बाहुली . तिच्या पायात घुगूर बांधलेले . डोक्याला केसांचा बुचडा . ही मावशी त्याला काही कमी पडू द्यायची नाही . सुदामबुवाला म्हातारपणापर्यंत काही मूलबाळ झालं नाही . लोक म्हणायचे , ” याचा वंसबूड होणार ! ” त्याच्या चेहऱ्यावर मात्र दुःख नसायचं . सारखं चेहऱ्यावर चैतन्य खेळायचं . स्वत : चा वंसबूड व्हायला आला ; पण वांझोट्या बायांना मुलं देतो ; म्हणून भोवतालच्या भागात त्याची प्रसिद्धी . त्यामुळं त्याच्याभोवती नेहमी बायकांचा घोळका . सुदामबुवाजवळ भानामती होती . आज सत्यसाईबाबा हातातून उदी काढतो म्हणून कोण कौतुक ! सुदामबुवा हातातून शेंदूर काढायचा . प्रथम हवेत स्वच्छ मोकळे हात दाखवायचा . तुम्हाला तुमचा तळहात पुढे करायला सांगायचा . दोन्ही तळहात एकमेकांवर घासले म्हणजे तळहातांवर शेंदूर पडायचा .
खुशीत असला म्हणजे आपल्या वयाच्या पोरासोराच्याही हातावर शेंदूर पाडायचा . त्याच्या मावशी’वरून आठवलं . ह्या मावशीचा प्रताप मी लहानपणी डोळ्यांनी पाहिला . ह्या मावशीबरोबर तो संवाद करायचा . तिला साकडं घालायचा . वडील असताना वडिलांच्या ताप्यात हा सूर वाजवायचा . असंच एकदा ठाकरांच्या लग्नाची सुपारी मिळालेली . ताप्याबरोबर मीही गेलेलो . मला खूपच भूक लागलेली . लग्न
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातून )
